माणूस, देव आणि "देऊळ"

"देऊळ" चित्रपट बघितला? कसा वाटला?
फोडा दत्त नाम टाहो...हे वादग्रस्त गाणं ऐकलंत? राग आला ऐकून की आवडलं?

माझ्यासाठी, कित्येक दिवसांपासून जाणवत असलेल्या, बोचत असलेल्या सगळ्या गोष्टीचा तरल पडद्यावरचा साक्षात्कार म्हणजे "देऊळ"...!


आपण आपल्याच नकळत "देव" (किंवा धर्म) ह्या संकल्पनेच्या किती आहारी जातो...त्यामुळे इतर आवश्यक गोष्टींकडे आपण कसे दुर्लक्ष करतो...आणि आपल्याच हातातलं खेळणं होऊन बसतो हे इतकं बोचऱ्या पद्धतीने जाणवलं की ह्या विषयावर लिहावंसं आवश्यक वाटलं. नाहीतर बरं नसतं वाटलं!


सर्वात पहिला सुखद धक्का होता तो...चित्रपटात "कुलकर्णी अण्णा" आहेत...ब्राह्मण पात्र आहे...पण ते व्हिलन नाहीयेत!!! गोड पावा वाजवणारे, गावासाठी तळमळ असणारे काही चांगले करू पहाणारे आहेत. दुसरा सुखद धक्का ते म्हणजे नाना पाटेकरांचा राजकारणी...तो सुद्धा "म्याडम म्हणतात" तसं "विकासाचं राजकारण" करू पाहतोय!!
पण...शेवटी सामान्य जनतेला जे हवंय आणि "वरिष्ठ जे सांगतात" ते ह्या राजकारण्याला करावं लागतं आणि अण्णा बिचारे हताश होऊन...गावाची झालेली विकासपूर्ण वाताहत पाहून गाव सोडून निघून जातात.
गावात एक दवाखाना निघावा म्हणून अण्णांनी केलेली सगळी मेहनत निष्पाप केश्याच्या दत्त-दर्शनाने अक्षरशः वाया जाते. "गावात दत्त प्रगटले आहेत" असं ऐकल्यावर भगवान दत्ताची खिल्ली उडवणारे केवळ राजकारण आणि पैश्याच्या मोहापायी देऊळ बांधायचा प्रस्ताव ठेवतात...आणि मग सुरु होतो देवाचा आणि देवळाचा बाजार. केश्याचा जीव असलेली करडी गाय जीव गमावते...आणि मग तो देखील कासावीस होतो!


देव कोण आहे? काय आहे? कशी निर्माण झाली असेल ही संकल्पना? खरंच लोकांना आलेल्या अनुभवातून...की आमच्या चाणाक्ष पूर्वजांनी लढवलेल्या शक्कलीतून? निराशेत एक आधार म्हणून, पापापासून परावृत्त करणारा एक धाक म्हणून?...

देव कशासाठी आहे? आम्ही डोकं बाजूला ठेऊन निष्क्रीयपणे बसून रहायचं आणि "त्याच्यावर" सगळं सोपवून द्यायचं...ह्यासाठी? की त्याच्या देवळाचा बाजार मांडण्यासाठी?


भारताच्या, आपल्या समाजाच्या विकासाची स्वप्नं पाहणारे आपण प्राधान्य कशाला देऊ? चांगले रस्ते, स्वच्च पाणी, २४ तास वीज, शाळा, दवाखाने...की मंदिरं?? रस्ता खराब झालाय हे आम्हाला दिसत असूनही त्याविरुध्द ब्र नं काढणारे आमचे लोक...त्याचं रस्त्यावर एखाद्या देवळाचा (अनधिकृत...) विस्तार करण्यासाठी केवढ्या बोंबा ठोकतात?!! 
चित्रपट संपल्यावर असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. उत्तर आपल्याला माहित आहे...पण दुर्दैवाने ते तसं नकोय! तसं उत्तर असायला नकोय...हा हताशपणा मनाला झोम्बल्याशिवाय रहात नाही!


चित्रपटाचा शेवट तर सुरेख जमलाय!
"माझ्या देवाची खरी भक्ती कुणीच करत नाही..." अश्या विषण्णतेने ग्रासलेला केश्या...मूर्ती चोरतो...आणि देवाचं विसर्जन करून मन शांत करून घेतो.
"देव चोरीला गेला! आता आपला बाजार बंद होणार..." अशी भीती असलेले गावकरी आणि नेते...नवीन मूर्ती स्थापन करतात...आणि बाजार परत सुरु होतो...!


सगळे खूश...आणि तरी मूळ प्रश्न...विकास म्हणजे काय...!? योग्य काय अयोग्य काय...हे प्रश्न बाजूलाच राहतत...!


आणि हा विचार करणारे अण्णा...दूर...बँगलोरला असतात!!!

2 comments:

  1. तुका म्हणे ऐशा ( देव धर्माला नावे ठेवणाऱ्या ) नरा ! मोजुनी माराव्या पैजारा !! हा चित्रपट ज्या हरामखोरांनी बनवला आहे ...त्यांना समोर आले तर चपलेने फोडून काढेन...

    ReplyDelete
    Replies
    1. ‎? देवाधर्माला नावं काय ठेवलीयेत ह्या चित्रपटात? नावं माणसाच्या "देवा-धर्माचा बाजार मांडण्याच्या" वृत्तीला ठेवली आहेत!!!

      Delete