हिंदुराष्ट्र कशासाठी?

इंटरनेटमुळे माहिती अगदी वेगाने पसरतीये. पण "माहिती" पसरतीये..."ज्ञान" नाही. दोष इंटरनेटचा नाही...आमच्या टाळक्याचा आहे.

आम्ही पटकन निष्कर्ष काढतो आणि मोकळे होतो. "कॉपी-पेस्ट...!!!"

भरपूर "Like" मिळवण्याच्या हव्यासात...आणि पोकळ कौतुकाच्या भूकेपोटी आम्ही आमचे विचार "विचार नं करताच" ठाम करतो आणि व्यक्त करतो. ते एकदा ठाम झाले...की मग प्रश्न विचारणारा, शंका काढणारा एकतर मूर्ख किंवा दीडशहाणा!!! तो एकतर नेभळट किंवा अविचारी!!!

फेसबूकचे माझ्यावर अनंत उपकार आहेत! खूप छान मित्र मिळाले...काही अभ्यासू तर काही विश्वासू! :)

सध्या त्यांच्याशी एका "ज्वलंत" विषयावर नेहेमी चर्चा सुरु असते.


"हिंदुराष्ट्र कशासाठी?"...!


मुळात...प्रत्येकाची हिंदुराष्ट्राची संकल्पना वेग-वेगळी! कुणाला मुसलमान-ख्रिश्चन नकोयेत...कुणाला ते "असले तर चालतील...पण हिंदूंप्रमाणे वागायला हवे" आहेत!!!

कुणी सावरकरांच्या हिंदुराष्ट्राच्या स्वप्नाने प्रेरित झालेला...तर कुणी शिवाजींच्या भगव्याने!!!

ज्या तत्वांवर सावरकर वागायचे, ज्या गरजा त्यांना "तेव्हा" भासल्या...त्या गरजा, ती तत्व...आज...५ दशकांनंतर स्वतः सावरकर मानतील आणि पाळतील का हा माझ्या समोरचा पहिला प्रश्न. ही "मोठी" लोकं काय प्रचंड मोठ्या मनाची होती! आपल्या विचारात बदल करायला, ती काळानुरूप अधिक परिपक्व करायला अजिबात मागे पुढे पहात नसत.

पण आम्ही भारतीय  आहोत. मोठी नावं...त्यांचं कर्तुत्व ह्याकडून शिकून घेऊन, त्यांच्या चुका समजून घेऊन आम्ही "आहोत तिथून पुढे" जात नाही. जिथल्या तिथेच घुटमळत बसतो! चरफडत बसतो!


मग जर कुठल्या मुसलमान मुलाने हिंदू मुलीला पळवून नेली...जर एखाद्या ठिकाणी दंगा घडला...कुठल्याश्या नालायक नेत्याने जाती-धर्मावरून नवीन पिलू सोडलं...की झालं!!! आम्हाला एकंच उपाय माहीत...!
हिंदुराष्ट्र!!! सावरकर म्हणाले ना!!! मग काय? शिवाजींनी घडवून आणलं ना...! मग तर प्रश्नंच नाही!

ह्या लोकांना जर शिवाजी महाराजांचं "स्वराज्य" हिंदू राज्य की धर्मनिरपेक्ष राज्य...असं विचारलं तर काही जण चपापतात आणि काही धिटाईने "हिंदू" म्हणतात. मग त्यांना आपण "नाही...! ते सर्वांना समान वागणूक द्यायचे...कधीही कुठलाही धर्म लादायचे नाही...इ. इ." सांगितलं तर मग ते म्हणतात "आम्हालाही तेच करायचंय. पण "निधर्मी" राज्यात ते अशक्य...म्हणून हिंदू राष्ट्र हवं"

हा? "निधर्मी"??? ह्यांना कंठशोष करून जरी सांगितलं की Secular म्हणजे धर्मनिरपेक्ष..."कुठल्याही धर्माला उजवी डावी वागणूक नं देता...सर्वांना समान मान देऊन...केवळ ठरवलेल्या नियमानुसार न्याय देणारी सत्ता..." तरी ते आपलं "निधर्मी"चं टुमण सोडत नाहीत! जाउद्या!

"धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी हिंदुराष्ट्र हवंय" ह्याच्या इतका हास्यास्पद युक्तीवाद कुठला असेल?

अर्थात...हे जे लोकं म्हणतात, त्यांच्या हेतूबद्दल शंका नाही...पण जिथे हिंदुराष्ट्राची परिभाषाच ठरत नाही...तिथे अश्या राष्ट्राच्या नीतीचं काय बोलणार?

आपला धर्म खूप सहिष्णू आहे...अगदी सत्य! पण आपलं राष्ट्र...एक "हिंदूराष्ट्र" झाल्यावर असहिष्णू होणार नाही...पुढील काही शतकात असं घडणारच नाही ह्याची काय शाश्वती आहे?

आज असलेला मुस्लीम-ख्रिश्चन विरुद्ध रोष...एकदा राजकीय दुजोरा मिळाल्यावर उग्र रूप धारण करणार ह्याची खात्री कोण देईल?

मुळात..."हिंदुराष्ट्र" हवंय ही मागणी हिंदुप्रेमातून होते की मुस्लीम-ख्रिश्चन विरुद्ध असलेल्या रोषातून असा प्रश्न पडतो कधी कधी.


ज्या संस्था स्वतःला हिंदुंच्या कैवारी मानतात...(आणि असतीलही...त्यांचा, त्याच्या कार्याचा उपमर्द करण्याची माझी अजिबात लायकी नाही...) त्यांनी आपल्या धर्माची, धर्मातील लोकांची स्थिती सुधारण्यावर भर का देऊ नये? "लव्ह-जिहाद" बद्दल खूप ऐकलंय. थोड्या बहुत अंशी अनुभवलंयसुद्धा.

पण इथेसुद्धा गोम आहे.

विरोध कशाचा...हिंदू मुलीने मुस्लीम मुलाशी विवाह करण्याचा...की एका चांगल्या मुलीने, केवळ सुडाने, फसवण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेल्या मुलाशी लग्न करण्याचा आणि त्याला मदत करणार्या वृत्तीचा?? जर केवळ अंतर धार्मिक विवाहाला विरोध असेल....तर काय बोलणार??? पण जर खरंच आपल्या मुलींबद्दल तळमळ असेल...फसवणूक होऊ नये असं वाटत असेल...तर आपले संस्कार दृढ करा! मुलींना मोकळीक नक्कीच द्या...पण योग्य संवाद ठेवून...जगातल्या वाईट गोष्टींचीजाणीव देखील करून द्या...आणि अश्या रस्त्यावर जाऊन फसलेल्या मुलींना परत घरी आणा! काही खूप आदरणीय लोकांनी अशी कामं केलीयेत...ही कामं आमच्या संघटना करू शकतात ना? आपली, आपल्या मुलांची जबाबदारी आपणच घ्या...सरकार कशाला हवंय? अर्थात...सरकारचं काम आहेच सर्वांना सुरक्षा देण्याचं. पण "सध्य:स्थितीत" हे सरकार षंढ आहे...म्हणून काय आपण भारताची मूळ विचारसरणी बदलून...आख्खी घटना बदलून...धर्मनिरपेक्षतेच्या मूळ तत्वाच्या चिंधड्या उडवणार काय?

हे लोकं बोलतात "निधर्मी सरकार मुस्लीम-ख्रिश्चन चं लांगुलचालन करतं...म्हणून हिंदुराष्ट्र हवंय!"...परत...निधर्मी नाहीरे बाबानो..."धर्मनिरपेक्ष!!!"

असो...सध्याचं सरकार "लांगुलचालन" करतंय की नाही माहीत नाही...पण "समस्या" समाधान करत नाही हे निश्चित. कारण सरळ आहे...त्यांना आपण असेच भांडत रहायला हवे आहोत. आणि आपण ते करतोय!


हे लोक काश्मीरचं उदाहरण देतात, ख्रिश्चन धर्म्प्रचाराकांवर रोष बाळगतात...पाकिस्तानबद्दल सहानुभूती बाळगलेल्या मुस्लिमांबद्दल बोलतात...
कधी भूतकाळात घडलेल्या आपल्या मंदिरांच्या संहाराबद्दल तर महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलतात...आणि असा आव आणतात की बस्स...! काही वर्षातच भारताचं काही खरं नाही!

अस्मिता जपा...! तेज वाढवा...!


कश्मिर...हा एक राजकीय प्रश्न आहे...! आपल्या काही चुकांमुळे तो जास्त चिघळला असं काही हुशार लोकं म्हणतात. ह्या समस्येचं समाधान आपण हिंदुराष्ट्र झाल्याने कसं निघणार...ते हे लोकच जाणोत! (समस्यासमाधान देतील ही..."हाकलून द्या" वगैरे भाषा वापरून...! काय बोलणार?)

"काही" मुस्लीम असतीलही तसे. म्हणून काय अब्दुल कलाम ना विसरणार आपण? की स्वातंत्र्यसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या मुस्लीम देशभक्तांना?

मी स्वतः कितीतरी मुस्लीम मुलांसोबत बोललोय. देशाला "देव" मानणार नाहीत...पण तेवढंच प्रेम बाळगून आहेत जेवढं आपण बाळगतो. आज जर काही मुस्लीम पाकिस्तानबद्दल प्रेम बाळगून आहेत...तर सरकारने त्यांना शिक्षा द्यावी...पण आजचं सरकार ते करण्यास काही कारणासाठी असमर्थ असेल...तर तुम्ही त्यांच्या मागे लागा...आणि हवा तो परिणाम साधा. किंवा...स्वतः एक समर्थ सरकार तयार करा!

ख्रिश्चन धर्म्प्रचाराकांकडून आपण शिकायला हवं! शांतपणे आपल्या धर्मासाठी काम कसं करावं हे त्यांच्याकडून शिकावं! नाही तर आमचे लोकं...! नुसता धांगडधिंगा!!! परिणाम फार कमी! केवढी समाजसेवा केलीये त्यांनी...! धर्मप्रचार म्हणून केली...पण केली ना? आमच्या संघटनांसाठी हे अवघड आहे का? कशाला हवंय हिंदुराष्ट्र?

आमचे लोक ख्रिश्चनांना शिव्या घालतात. कधी आपली धार्मिक स्थळे बघितालीयेत का? तिथे शिस्त लावण्याचा प्रयत्न केलाय का आमच्या "हिंदुत्ववादी नेत्यांनी"?? आमचं धार्मिक ज्ञान वाढवण्यासाठी किती कष्ट घेतलेत ह्यांनी?

ह्यांना "अभिमान" आहे ना धर्माचा? म्हणतात की आमचा धर्म इतका महान आहे की सर्व जगात "सहिष्णुता" पसरवेल.
ह्यांना आमचा धर्म माहितीये काय? ३३ कोटी देव का बरं? आपले सण-वार-उपवास कुठल्या सिद्धांतांवर सुरु झाले? हे जाणून घेण्याचा प्रयत्न किती हिंदू लोकं करतात? जे लोकं हे जाणतात...ते ह्या ज्ञानाचा किती प्रसार करतात? आमची संस्कृती टिकवण्यासाठी "हिंदुराष्ट्र" कशाला हवंय? एवढ्या संघटना आहेत...अधिवेशनं भरवण्यासाठी पैसे आहेत...तर आमचा धर्म वाचवण्यासाठी...लोकं वाचवण्यासाठी "हिंदुराष्ट्र" कशाला हवंय?
ह्यावर एक हास्यास्पद उत्तर आहे! "सरकार "त्यांना" सहाय्य करतं...आम्हाला नाही!!!" अहो तुम्हाला सरकार हवंय कशाला....७०% जनता आहे तुमच्यासोबत...मग? घोषणा देण्यासाठी लोकं जमवता तुम्ही...मग काम करायलाही जमवा!

...इथे आमच्या संघटनाना विरोधकरून, निष्क्रीय किंवा चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न अजिबात नाहीये...हे कृपया समजून घ्या...संघ, दल...इ..इ...लोकांनी चांगलं काम केलंय. मान्य...पण ते तसंच सुरु ठेऊन...अधिक परिणामकारक का नाही करता येणार?

कित्येक शतकांपूर्वी जे घडलं त्या जखमा भरून निघणार नाहीत आपल्या...पण नवीन जखमा कशाला करून घ्यायच्या? परत असं घडणार नाही ह्याची काळजी निश्तिच घ्या...पण त्यासाठी "संघटना" आहेत ना? राष्ट्र धार्मिक कशाला करायचं???

पण आपण तिकडे लक्ष नं देता, केवळ द्वेषाने प्रेरित होऊन एकच विचार करत राहिलो...तर हे ही नाही आणि तेही नाही असं होईल.


मुळात राष्ट्र आणि धर्म ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. राष्ट्र म्हणजे एक समाज...एकमेकांसोबत रहाण्यासाठी काही नियम ठरवून राहत असलेला एक समाज.
धर्म ही एक वैयक्तिक बाब. "मला कसं जगायचंय...कुठलं तत्वज्ञान मला आत्मसात करायचंय..." ह्या विचारांचा परिपाक म्हणजे धर्म.

तेव्हा ह्या गोष्टी दूर राहिलेल्याच बर्या. तरच देश सफल होईल.


आपण पाकिस्तान-मुस्लीम-ख्रिश्चन धर्मप्रसार ह्याच्यात इतके गुरफटत चाललोय की आपल्या ध्येयापासून विचलित नं होता...राजकीय इच्छाशक्ती आणि चालाखीच्या जोरावर पुढे जाणाऱ्या लोकांकडून, अमेरिका सारख्या राष्ट्राकडून, आपण शिकत नाही!


काहीही झालं की "धर्मनिरपेक्ष सरकार म्हणजे व्यर्थ...आणि हिंदुत्ववादी सरकार म्हणजे चुटकीसरशी सगळं सरळ...!" असा विचार अगदी चुकीचा आहे...एवढंच काय ते माझं म्हणणं आहे. आजचे धर्मनिरपेक्ष नेते निष्क्रीय, वाईट आहेत…उद्याचे देखील तसेच राहतील...असाच जर ग्रह असेल...तर हिंदुत्ववादी नेते "वाईट" असणार नाहीत कशावरून?

शेवटी एक practical समस्या सांगतो. हिंदुराष्ट्र होण्याने...आपली धर्मनिरपेक्षता जाण्याने काय नुकसान होईल...ते सांगतो.

कितीही "स्वदेशी"चं महत्व माहित असू दे...आज ते अशक्य आहे. संपूर्ण स्वयंपूर्णता अशक्य आहे. १९९२ पूर्वी आपण किती दर्जेदार वस्तू वापरत होतो? ज्या होत्या त्या जागतिक दर्जाच्या होत्या का?

आज आपण जी कमाई करतोय...ती globalization मुले आलीये. परकीय गुंतुवणुकीमुळे आलीये.
आज...कितीही नाही म्हटलं तरी सगळं जग एक "golbal village" झालंय.

आपला देश अशा अस्थैर्यातून गेला तर काय होईल ह्याची कल्पना आहे का कुणाला? एका "धार्मिक" देशात...किती परकीय गुंतवणूक होणार? ज्या देशांवर आपण खनिज तेलासाठी अवलंबून आहोत...ती राष्ट्रं... "मुस्लीम" राष्ट्र आहेत...लक्षात येतंय का?

मित्रांनो...समस्या आहेत...हिंदू धर्मासमोर समस्या आहेत. संस्कार जपायचेत, तेज वाढवायचंय...वाईट शक्ती-संघटना संपवायच्या आहेत...निष्क्रीय सरकार...इतर धर्म...आपली निष्क्रियता...भरपूर समस्या आहेत.
पण त्यासाठी...आपलं एकत्र येणं आवश्यक आहे. धर्म आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र...एकत्र येणं आवश्यक आहे!!!
हे करत असतांना...देशाची धर्मनिरपेक्ष सार्वभौम बैठक विस्कटून टाकणं घातकच ठरणार!!!
---

थोडक्यात...

१...आज "हिंदू" धर्मासमोर असलेल्या समस्या हा..."धार्मिक" प्रश्न आहे. तो आपण "धार्मिक" संघटनांच्या मदतीने सोडवायला हवा.

२...आतंकवाद, धार्मिक तणाव इत्यादी समस्या आजच्या सरकारच्या कृतीशून्यतेमुळे वाढल्या आहेत. त्यांचं समाधान करण्यासाठी "सक्षम" सरकार हवंय. "हिंदुत्ववादी" सरकार नव्हे.

३...आजपर्यंत ज्याप्रकारे "धर्मनिरपेक्षता" भारतात चित्रित झालीये...ती धर्मनिरपेक्षता नाही. तो स्वार्थी खेळ आहे. आपल्याला एकमेकांसोबत भांडत ठेवण्यासाठी "सगळ्या" पक्षांनी खेळलेला.

४...बर्याच जणांना असं वाटतं की "बहुतांश मुस्लीम/ख्रिश्चन वाईट आहेत"...असं "जर खरं मानलं" तर,
...१) त्यांच्यामुळे "देशाचं" जे नुकसान होतं ते एक "सक्षम" सरकार भरून काढू शकतं...आणि रोखू शकतं...!...(जे आपल्याकडे येणं आवश्यक आहे...!)
हे "सरकारचं" काम आहे...धार्मिक संघटनांचं नाही!!!

...२) त्यांच्यामुळे "हिंदुधर्माचं " जे नुकसान होतं ते आपल्या "धार्मिक संघटना" भरून काढू आणि रोखू शकतात...!...(ज्या आपल्याकडे भरपूर आहेत...!)
हे "धार्मिक संघटनांचं" काम आहे...! "सरकारचं" नाही!!!
---
हा आहे माझ्या युक्तिवादाचा सारांश!!!

5 comments:

 1. मित्रा... खूप छान लिहीलत....आणि हिंदू म्हणून सहिष्णू म्हणून कोणी वाचेल आणि सोडून देईल...

  पण का असाच लेख तुम्ही मुसलमानांवर लिहू शकता का??
  १. की तु हिंदुना का छळतो...
  २. मंदिरं का पडता...
  ३. मुली का पळवता....
  ४. काश्मीर का पाहिजे....
  ५. का तुम्ही संपूर्ण जग हिरवं करायला निघालेत...
  ६. का तुम्ही एवढे कट्टर आहात...
  ६. का तुम्ही १४०० वर्षांपुर्व्ही जे लिहिलं ते अजून कट्टर पाने पाळता...
  हे कोणी त्यांना विचारणार नाही .... कारण ते त्यांच्या धर्मात लिहिलं आहे...
  हेच प्रश्न क्रिस्ती लोकांसाठी....

  तुम्ही लिहिलं आहे ते हिंदू विचारधारेतून.... तुम्ही लिहिलं आहे ते हिंदूला पटेल ही..... पण मुसलमानांची कृत्ये अभ्यासून मग इस्लाम वर असंच लिहू शकता का....

  ReplyDelete
  Replies
  1. पुष्कराज...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

   १ आणि २ फार पूर्वीच्या घटना आहेत...निदान भारतात तरी आता असं घडत नाही.
   ४...राजकीय प्रश्न!
   ६ आणि ७...त्यांच्या धर्मात लिहिलं म्हणून धर्मप्रचार आणि कट्टरता आहे...आपण आपला धर्म कट्टरपणे पळत नाही (जर तसं आवश्यक वाटत असेल तर) ही आपली चूक आहे!

   आता...३, ५, आणि काही अंशी ६ आणि ७ देखील...ह्याबद्दल तेच बोलतो जे मी वर बोललोय...
   मी ह्या मुद्द्याशी/समस्यांशी पूर्णपणे सहमत आहे. ह्या समस्या आहेतंच. आणि हे त्यांना विचारून सुटेल असं मला देखिल नाही वाटत. पण ह्याचं समाधान...भारत हिंदुराष्ट्र झाल्याने नाही होणार. किंबहुना हे प्रश्न सोडवण्यासाठी देश धार्मिक करणं चुकीचं आहे ना?
   हे "धार्मिक" प्रश्न आणि संकटं आहेत...ते धार्मिक संघटनांनी, धार्मिक चळवळीने सोडवावे...राजकीय नाही...!

   राहिला प्रश्न इस्लाम बद्दललिहिण्याचा...कृपया माझा दुसरा लेख वाच...तो ह्या लेखा आधीच लिहिला होता...

   http://expenziv.blogspot.in/2011/12/to-my-muslim-brothers-and-sisters_18.html

   मत नक्की कळव! :)

   Delete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. खूप युक्तिवाद लढवून तुम्ही हा लेख लिहिला आहे
  या लेखाला जे हिदुद्वेष्ट्ये आहेत ते तुमची पाठ जरूर थोपाटतील पण हिंदुराष्ट्र आणि धर्मनिरपेक्षता
  सांगताना जो युक्तिवाद वापरलात तो चुकीचा कारण एक तर हिदुराष्ट्र आणि धर्मनिरपेक्षता ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत
  नेमक हेच समजावून न घेता तुम्ही हा लेख लिहिलात आमची धर्मनिरपेक्षता म्हणजे आम्ही तुम्हाला त्रास देत माही तुम्ही देवू नये आणि तुम्ही तो दिलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ईतकी साधी सरळ आहे म्हणजेच तुम्ही आमची मंदिर पडायची आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ती आम्ही सहन करायची हे नाही होणार. याला म्हणतात हिंदुराष्ट्रवाद.

  ReplyDelete
  Replies
  1. राम प्रहार जी...

   मी ह्याच्याशी "संपूर्ण" सहमत आहे...ही "हिंदुत्व" आणि "धर्मनिरपेक्षता" ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि मला ह्या गोष्टीची प्रचंड धन्यता वाटते की मी इतक्या महान विचारसरणीच्या धर्मात जन्मलो.

   पण हिंदुराष्ट्र...ही संकल्पना आजकाल प्रत्येकजण आपल्या हिशोबाने वापरतो. आणि...हे तुम्ही देखिल मान्य कराल. ही संकल्पना सावरकरांनी वापरलेल्या संकल्पनेपेक्षा फार वेग-वेगळ्या रुपात आपण सगळेच बघतो.

   तेव्हा तुम्ही जी धर्मनिरपेक्षतेची जोड हिंदुराष्ट्र ला देताय...त्याची शाश्वती कोण देणार?

   मी जसं वर म्हणालो..."आजचे धर्मनिरपेक्ष नेते निष्क्रीय, वाईट आहेत…उद्याचे देखील तसेच राहतील...असाच जर ग्रह असेल...तर हिंदुत्ववादी नेते "वाईट" असणार नाहीत कशावरून?"

   आपण शेवटी जे म्हणालात...ते एकदम पटलं...! कुणी आपल्याला त्रास दिला तर त्याला केवळ उत्तरंच नाही, असा धडा शिकवायला हवा की त्याच्या आजूबाजूचे १०० लोक पुन्हा डोळे वर करणार नाहीत. पण...सरकारने जे दुष्कृत्य घडेल त्यावर न्यायालीन कारवाई करावी...आणि "धडा" शिकवणं हे आपला समाज, धार्मिक संघटना ह्यांनी करावं. ते करण्यासाठी सरकार नको...माझं म्हणणं हे आहे.

   Delete