हितगुज

सुख-दुखाच्या परिभाषा बदलल्याहेत आताशा...
मनाला विचित्र व्यसन जडलंय...
सुख "अनुभवायची" इच्छाच मेलीये जणू...
पण सुखी असल्याचं दाखवणं भाग पडलंय!!

सुन्न करणारी सायंकाळची कातर वेळ
समुद्रावरून येणारा स्निग्ध वारा
आजकाल मन म्हणतं अश्यावेळी...
सहवास नको...एकांत बरा...!

जगाच्या पाठीवर कुठे समाधान सापडेल का हो?
दु:खाच्या गाठीवर कुठला रामबाण सापडेल का हो?
रडणारी, आक्रंदणारी  मनं, ओढून ताणून जगणं...अन् एकदाचं मरणं
ह्यातून वाचवणारा...एखादा उभार-उधाण सापडेल का हो?

तुच्छ वासनेपोटी वेशीवर टांगली गेलेली लज्जा
भ्याड काळजाची खोटी उरफाटी काळजी
हे सत्य बघण्यापेक्षा...दिवास्वप्नात कोण मज्जा!!
कलीयुगातलं बांडगुळ मी...अन् स्वप्न सत्ययुगीन काळची!!!

हे सगळं मलाच का दिसतं?
हतबलतेचा काळोख माझंच मन का कोंदतं?
माझेच प्रश्न पुन्हा पुन्हा...
माझंच मन मलाच विचारतं...!

नदीकाठी त्या संध्याकाळी..
माझ्याशीच मी हितगुज साधलं...
पाण्यातल्या दोन कासवांनी...
आपसूकच माझं लक्ष वेधलं....

मन कोवळं ठेव... हळवेपण जप...
तरी काठिण्याचं कवच असुदे पाठीशी...
दूरचं एखादं स्वप्न साकारताना...
असुदे कितीतरी स्वप्नांचा चुराडा गाठीशी...

असा अगम्य संदेश देणारी
ती दोन नदीकाठची कासवं होती...
अन्...माझ्या गालावरून ओघळणारी...
दुसर्याकुणाची तरी आसवं होती...

6 comments: