सत्यमेव जयते...पण "जय" मिळणार कसा?


आमीरच्या "सत्यमेव जयते" बद्दल भरपूर चर्वितचर्वण झालंय आता. त्याच्या पहिल्या लग्नावरून, मुस्लीम असण्यावरून झालेला विरोध फारंच खेदजनक वाटला. तसंच त्याला मिळालेली लोकप्रियता खुष करून गेली! असं वाटलं की एवढा वेळ, इतक्या क्लिष्ट विषयावर घडणारी चर्चा लोक आवडीने बघतायेत, समर्थन करताहेत...हेही नसे थोडके!

तरी काही गोष्टी आहेत...ज्या आपण भाबडे भारतीय नेहेमी दुर्लक्षित करतो. त्या गोष्टींवर पहिल्याच भागानंतर मत प्रदर्शित करणं जरा घाईचं वाटलं. पण दुसरा भाग बघितल्यानंतर लिहिण्याचा मोह अनावर झाला!

"सत्यमेव जयते" हा शो आमिरने दाखवणं चांगलं की वाईट ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेऊन..."सत्यमेव जयते" आणि आमीर ची तिसरी बाजू बघुया.

सर्वप्रथम आमीरचं "मी समाजसेवक नाही...अभिनेता आहे..." हे म्हणणं.
हे असं म्हणणं चूक अजिबात नाही. एक अभिनेता (आणि निर्माता) म्हणून त्याने जे धाडस दाखवलं त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. पण वरील विधान करून, त्याने जबाबदारी झटकून टाकली! वरील वाक्य करून, त्याने हे अगदी बेमालूमपणे हे स्पष्ट केलं की सरकारच्या चुकीच्या धोरणांवर, बेजबाबदार वर्तनावर तो काहीच बोलणार नाही...करणार नाही.
हे आमीरमधल्या अभिनेत्याने केलं ह्यात काहीच गैर नाही. पण हे त्याच्या "देशाचा खरा हिरो" बनण्याच्या प्रयत्नातला धूर्तपणा-फोलपणा दाखवणारं आहे. हा हिरो फक्त "गरजणारा" आहे..."बरसणारा" नाही!!
(...
परत बोलतो...त्याने हे करणं चूक नाही...पण तो मोठी जबाबदारी टाळतोय असं वाटतं...इतकंच.)

दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट...

दोन्ही भाग फारच क्लिष्ट, नाजूक विषयांवर होते. ते ज्या हळुवारपणे दाखवले, चर्चिले गेले...वाह...लाजवाब!
खूप अभ्यास करून...सरकारी आकडे, स्वतः संशोधन करून मिळवलेले तथ्य...ते सिद्ध करणारे आकडे...सगळंच थक्क करणारं आहे.
आमीर जितक्या प्रेमाने, आपुलकीने, पोटतीडकीने समस्यांबद्दल बोलतो ते सुद्धा खूप सुखद वाटतं.

पण प्रश्न आहे तो त्याने दिलेल्या समस्या-समाधानाचा.
आपल्या समाजामध्ये काही "Over Optimistic" लोक आहेत...हे लोक एक भोळा आशावाद बाळगून असतात.
हे लोक म्हणतात भारताच्या समस्या तेव्हाच सुटतील जेव्हा "सगळे लोक" चांगले होतील...!
उदाहरणार्थ...सगळ्यांनी भ्रष्टाचार थांबवा म्हणजे प्रश्नच सुटेल...तुम्ही पैसे देऊच नका म्हणजे घेणारा मागणारच नाही...! किती हास्यास्पद उपाय आहेत हे? भ्रष्टाचार "देणार्यामुळे" होतो की "घेणार्यामुळे" ? तातडीची गरज असणाऱ्याला कुणी काम करून देण्यासाठी पैसे मागितले आणि “पैसे दे नाहीतर गेला उडत” असं म्हटलं तर कुठला पर्याय रहातो?

अश्या कुठल्या भोळ्या आशावादावर जगणं म्हणजे...रामराज्य हवंय...शिवशाही हवीये...पण श्रीरामांच्या , शिवरायांच्या राज्यनिर्माणासाठी मेहेनत घ्यायला नकोय असं आहे.
मुळात समाज “चांगला”च असतो. समस्या निर्माण होते मुठभर असणाऱ्या गुंडांमुळे. त्यांना जरब बसवण्यासाठी असायला हवेत चांगले कायदे, नियम...आणि त्यांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था!!!

आमिरने दोन मुद्दे प्रस्तुत केले. दोन्ही वेळा वकिलांनी, कार्यकर्त्यांनी हे सांगितलं की आपली न्यायव्यवस्था किती निर्लज्जपणे परिस्थितीचा, पिडीतांच्या हतबलतेचा फायदा घेऊन दोषींना मोकळं सोडते.
आमिरने शेवटी दोन्ही समस्यांवर दोन उपाय सांगितले.

१...आपण ठरवा...तुम्ही ठरवा की तुम्ही असं करणार नाही...आणि आपल्या माणसांची काळजी घ्या...!
२...आमिर सरकारला पत्र पाठवेल, तुम्ही sms करा...आणि ते सर्व सरकारला कळवलं जाईल...!

उपाय १ योग्यच आहे. आणि हीच गोष्ट ह्या "शो"चा फायदा दाखवणारी आहे. लोकांनी जागृत होणं आवश्यकच आहे. पण ते पुरेसं मात्र नाही.

उपाय २ पुरेसा आहे? ह्याने सरकार ऐकेल? ही गोष्ट सरकारवर दबाव आणण्यासाठी पुरेशी आहे का?

कुठलाही समाज पुढे तेव्हा येतो जेव्हा त्या समाजातले प्रसिद्ध लोक आपल्या प्रसिद्धीचा वापर सरकारवर दबाव आणून चांगले कायदे आणण्यासाठी करतात...आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करून घेतात.

पहिल्या एपिसोड मध्ये आमीर ने Fast Track court ची मागणी केली. अन् दुसऱ्यामध्ये एक कायदा पास करण्याची.
ज्या न्यायव्यवस्थेने आधी सगळ्या केस वेगळ्या केल्या...(म्हणजेच ती व्यवस्था चांगलीच भ्रष्ट आहे)...त्याने ही मागणी मान्य करणं शक्य आहे का? जरी मान्य केली...तरी अशी भ्रष्ट व्यवस्था न्याय देईल?
हे डॉक्टर असा अवैध धंदा करतात....ते पोलीसांच्या मदतीशिवाय शक्य आहे का? न्यायालयात सिद्ध कोण करणार आहे हे सगळे गुन्हे?
मुलांच्या लैंगिक शोषणाची समस्या दिसते तेवढी सोपी-खाजगी नाही. ज्यांनी पेज-३ चित्रपट बघितला असेल त्यांना थोडीशी कल्पना असेलंच. कित्येक बालसुधार गृह, अनाथाश्रम, झोपडपट्ट्या ह्या समस्येचे शिकार आहेत. आणि अर्थातच...मोठ मोठी मंडळी ह्यात सामील आहेत. सरकार हे सगळं थांबेल “असा” कायदा आणेल का? त्यात पळवाटा नसतील? सरकार आपलं सामन्यांचं ऐकेल की ह्या "बड्या" मंडळींचं...ज्यांच्या पैस्यावर निवडणुका लढवल्या जातात?

आज मोठ मोठे गुन्हे केलेले---भ्रष्टाचार, आतंकवादला मदत-अश्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले मस्तपैकी मोकळे हिंडतायेत. मग ह्या गुन्हेगारांचं काय?!!!
हे दोन मुद्देच नाही...आपल्या समोरच्या प्रत्येक समस्येचं समाधान इथेच अडतं!
कायद्याची अंमलबजावणी होत नाही! कारण कायद्यात पळवाटा असतात! त्यावर काय करावं?

ह्या साध्या प्रश्नांची उत्तरं आमीर देत नाही! हे प्रश्न त्याच्या मनात आले नसतील असं शक्यच नाही!
पण ह्या प्रश्नांना...हुशार आमीर एकदम छान बगल देतो...

आणि आपल्याला म्हणतो...
“उपासमारीने, तहानेने व्याकुळलेल्या माझ्या मित्रांनो...जा...शेती सुरु करा...! विहीर खणा...! त्यासाठी जमीन तुम्हीच शोधा...सरकारकडून परवानगी तुम्हीच मागा...
मी समर्थनाचं पत्र लिहितो...!!!”
---ब्लॉगचा सारांश सांगतो:

१...मला "सत्यमेव जयते" जाम आवडला!!!
२..."सत्यमेव जयते" मुळे मला आमीर अजून जास्त आवडू लागला आहे...!
३...असेच...जरा प्रबोधनाचे शो करून त्याने अधिकाधिक पैसे कमवावे अशी माझी खरोखर मनोमन इच्छा आहे!
४...पण...
तो जे करतोय ते फक्त "नाजूक समस्यांवर प्रकाश टाकणं" इतकंच आहे, त्याने सांगितलेले समस्या समाधानाचे मार्ग अजिबात पुरेसे नाही. ही जाण सुजाण नागरिकांनी ठेवावी....आणि मूळ प्रश्नावर समाधान शोधावं...!

गरज...सगळ्या कायद्यांचा "बाप" असलेला कायदा आणण्याची


भारतात लोकशाही आहे असं म्हणतात.

काय आहे लोकशाहीची व्याख्या?
"लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य"
बरोबर?

मग राज्यकारभाराशी संबंधित, रोजच्या निर्णय प्रकियेत लोकांचा सहभाग हवा की नको? असायला हवा.
पण सामान्य माणूस आपलं पोट पाणी सांभाळणार की राज्यकारभारात लक्ष घालणार? ह्या प्रश्नावर/समस्येवर उत्तर/समाधान म्हणून आपण निवडणूक प्रक्रिया आणली. आम्ही लक्ष नाही घालू शकत...म्हणून आम्ही काही लोकांना निवडतो...ते लोकं आमच्यासाठी कारभार पाहतील. ते लोक चांगले कायदे तयार करतील, कायद्यांची अंमलबजावणी करतील, देश सुरळीत चालवतील.

पण सगळीच गडबड झाली. हे लोक आता "राज" करतायेत आपल्यावर. त्यांना हवे तसे कायदे बनवतात...त्यातून पळवाटाही स्वतःच काढतात...आणि स्वतःचेच घडे भरून घेतात!

आपण, सामान्य जनता, कुठली मागणी करतोय तर ऐकायची ह्यांना गरजच नाहीये...कारण कुठलाच नियम, कुठलाच कायदा, आपलं...सर्व सामान्य जनतेचं म्हणणं आपल्या लोकप्रतिनिधींवर बंधनकारक करतंच नाही!

जनलोकपालचंच उदाहरण घ्या. मुळात मी जनतेला "राईट टू रिकॉल लोकपाल" नसलेल्या ह्या कायद्याच्या विरोधात आहे.
पण तो मुद्दा नाही. आता हा कायदा मान्य व्हावा असं बऱ्याच जणांना वाटतं. अण्णाजी आणि त्यांची टीम म्हणते की अख्खा भारत त्यांच्या समर्थनार्थ उभा आहे. असं असूनही हा कायदा आमचे लोकप्रतिनिधी पास करत नाहीयेत!
लोकप्रतिनिधींच्या निर्लज्जपणाची आणि आपल्या अगतिकतेची किती परिसीमा आहे ही?!!!

असे आणखी ५० नवीन कायदे आवश्यक असतील भारताच्या सुधारणेसाठी....! कितीतरी असे कायदे आहेत ज्यांच्यात लोकांच्या मर्जीनुसार सुधारणा होणं आवश्यक आहे...! आणि प्रत्येकवेळी जनलोकपालसारखी मोहीम सुद्धा उभी राहणार नाही!

अवघड काम आहे!!
ह्याला काही उपाय?

एक उपाय असू शकतो...!

अख्या भारताने...एकाच कायद्यासाठी लढा उभा करायचा!
असा कायदा जो बाकीचे कायदे मंजूर करायला सरकारला भाग पाडेल! असा कायदा जो आपलं म्हणणं लोकप्रतिनिधींवर बंधनकारक करेल. नवीन कायदे असो किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा असोत...आपण एक अशी सिस्टीम तयार करायची ज्याने आपलं मत नोदावता येईल..देशभरातून त्यावर मत नोंदणी होईल...आणि मग त्यानुसार कृती घडेल...!!


जर आपली मोठी मोहीम तयार करून, त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी असेल तर असा कायदा मंजूर करून घेऊन, राजकारणात, देशाच्या विकासात आपण अप्रत्यक्षपणे नेहेमी सहभाग नोंदवू शकतो...आणि लोकप्रतिनिधींना आपला वचक राहू शकतो.


हा कायदा काय असेल, कसा असेल त्याचा विचार नंतर करा...

पहिला प्रश्न हा आहे...की...असं होऊ शकतं का? अशी मोठी मोहीम...प्रत्येक भारतीय सुरु करू शकतो का?
अश्या मोहिमेसाठी, साहजिकच "Paid media" आधार देणार नाही. अश्या मोहिमेसाठी इंटरनेट आणि  word of mouth च प्रचार आणि प्रसाराचं साधन असेल. ह्या साधनांचा वापर करून लढा उभारणं अवघड, वेळ-खाऊ आणि चिकाटीचं काम असेल. देशभक्तीवर खूप भरभरून बोलणारे आपण...खरंच कृती करू का?

हा कायदा समजून घ्यायला वेळ देऊ आपण? शंका विचारून समाधान करून घेऊन...काही सूचना देऊन हा कायदा अधिक परिणामकारक करून, त्याचा प्रचार करू का आपण सगळे?

जर खरंच काही करावंसं वाटत असेल...तर हा कायदा समजून घेण्यासाठी क्लिक करा...

SRT | सचिन रिटायरमेंट तेंडूलकर | सचिन राजकारणी तेंडूलकर

प्रत्येक कॉलनी मध्ये लहान मुलांचा ग्रुप बनलेला असतो. दिवस भर उंडारायचं, खेळ खेळ खेळायचं, आरडा ओरडा करायचा, सगळी कॉलनी डोक्यावर घ्यायची...उच्छाद मांडायचा...असं त्याचं ब्रीद असतं.
पण त्यातंच एखादं गुणी बाळ असतं. ते सगळ्यांसोबत राहून जरा "वेगळं" असतं. शांत, सभ्य, दंगा मस्ती नं करणारं. आपल्या वानर सेनेला आवरण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करणारं...
हे बाळ सगळ्यांना आवडतं. सगळी मोठी माणसं त्याचं उदाहरण आपल्या चिरंजीवांना देतात. त्यांचे चिरंजीव ह्या बाळाचा हेवा करतात...त्याला मान देतात.

पण ते बाळ? गुणी बाळ? ते सुखी असतं का?
ह्या बाळाची एक सल असते मनात. जी कुणालाच दिसत नाही.

अपेक्षांचं ओझं...अन् अपेक्षा पूर्ण केल्यावर सुद्धा..."हे तर आमच्या बाळाकडून अपेक्षितच!!" असा काहीसा नं बोलता व्यक्त होत असलेला भाव...

साला कितना भी करो...कम ही पडता है...असा डायलॉग सलमान खान "हर दिल जो प्यार करेगा" मध्ये बोलत असतो. हे असंच काहीसं ह्या बाळाचं होतं.

त्याला काय हवंय...त्याची स्वप्न काय...त्याचं "म्हणणं" काय...कुणाला फरक नाही पडत...
कारण ते एक "गुणी बाळ" असतं!

अर्थात सचिनची इतकी दयनीय अवस्था कधीच नाही झाली. त्याला समर्थन देणारे, तो बोलला नाही तरी त्याची बाजू मांडणारे त्याचे "सामान्य" पंखे आणि हर्षा भोगले सारखे "स्पेशल" ए सी खूप आहेत.

पण मुळातच दुसऱ्या कुणीतरी काय करावं काय करू नये ह्यावर भाष्य करणारे आणि बोंबलणारे "आपण" आहोत तरी कोण?

त्याने केलेल्या पेप्सी च्या जाहिरातीवरचा आक्षेप तर एवढा हास्यास्पद वाटतो! आमचा एवढा विरोध आहे ह्या "विदेशी", "आरोग्याला धोकादायक" पेयाला तर आम्ही आंदोलन करायला हवं...ह्या कंपनीच्या विरोधात. किंवा...आवाहन करायला हवं ह्या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना...सोडून द्या म्हणावं तिथे काम करणं!
सामाजिक जबाबदारी आणि योग्य अयोग्यचं भान ठेवण्याची जबाबदारी फक्त सचिनवर आहे काय?
मला पक्की खात्री आहे की तो सुद्धा पीत असणार पेप्सी-कोक. त्याचीच जाहिरात करतोय तो...असं तर नाही करत की जी गोष्ट तो करत नाही त्याचा प्रचार करतोय! अर्थात, इतरांनी...गोपीचंद वगैरेनी अश्या जाहिराती नाही केल्या...ते उत्तमच! त्यामुळे ते सचिनपेक्षा जास्त आदरणीय होतीलच. पण सचिनवर आपण असं बंधन कसं घालू शकतो? किंवा अशी अवाजवी अपेक्षा कशी करू शकतो? आपला काय अधिकार आहे?

तसंच फेरारीच्या कराच्या बाबतीत. सरकारने कर माफ करायचं ठरवलं...ते नियमात बसंत नव्हतं...सरकारने नियम बदलायचं ठरवलं...लोक ओरडले...मग फियाटने कर भरला.
ह्यात सचिनने कुठलं पाप केलं बाप्पा? त्याने आपणहोऊन कर भरला असता तर तो मनाने मोठा वगैरे ठरला असता. पण त्याने "चूक" तर काहीच नाही केली ना? (मी त्याच्या जागी असतो...तर १.१३ करोड रुपये कमवायला मला किती क्रिकेट सामने खेळावे लागले, किती जाहिराती कराव्या लागल्या, ह्या सगळ्या पैश्यात माझ्या बायको-मुलांचं, आई-वडिलांचं काय काय होऊ शकतं हा विचार १.१३ करोडवेळा नक्कीच केला असता!!!)


सचिनची रिटायरमेंट...!
भारतात...धर्म, राजकारण, बॉलीवूड आणि क्रिकेट...व त्या अनुषंगाने सचिनची रिटायरमेंट ह्यावरच चर्चा घडतात.
हा...आता भ्रष्टाचार (thanks to Kalmadi and team, Annaji and team) , आतंकवाद (thanks to Kasab and team) आणि सचिनची राजकारणी खेळी (thanks to Congress and team) हे विषय वाढले आहेत!

एकतर त्याने कधी खेळावं, कधी थांबावं हा त्याचा प्रश्न. जर त्याच्यामुळे टीमचं खरंच नुकसान होत असेल, तर टीम ठरवणारे काय तो निर्णय घेतील. आपण...खेळाचे चाहते म्हणून आपलं म्हणणं व्यक्त करणं ठीक...पण तावातावाने त्यावर वाद घालायचे...आणि सचिन स्वार्थी आहे अन् पैश्याच्या मागे आहे...असं म्हणायचं ह्याला काही अर्थ आहे का राव?
लता मंगेशकरांच्या आवाजात "आता" फक्त तांत्रिक अचूकता राहिली आहे...गोडवा शून्य झालाय असं माझं बऱ्याच वर्षापासून म्हणणं आहे. ह्याला समर्थन देणारे काही मित्र देखिल आहेत. वीर-झारा मधलं "हम तो भाई जैसे है" हे गाणं मे एकदाच ऐकलंय. पण  म्हणून काय मी बोंबलत बसू तुम्ही गाणं म्हणणं बंद करा म्हणून?

लतादिदिंचा गाणं म्हणणं हा श्वास आहे! ते त्या नाहीच थांबवू शकणार! सिनियर बच्चन साहेब अभिनय नाही थांबवू शकत...! तसंच सचिनचं!!!

त्याला खेळवायचा की नाही...हे बोलणारे आपण कोण?

आता तर त्याच्या राजकारणातल्या प्रवेशावरून गह्जबच झालाय!

त्याला विरोध का? तर म्हणे त्याने आजपर्यंत सामन्यांच्या प्रश्नांवर भाष्य केलं नाही.
अपेक्षा चूक नाही. त्याच्या सारख्या प्रसिद्ध व्यक्तीने समाजकारणावर भाष्य करून, समस्यांवर उपाय सांगून, जनजागृती करून तरुणांना, समाजाला नवी, योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करायलाच हवा. पण ते केलं तर चांगलं आहे...नाही केलं म्हणून सचिन वाईट होत नाही! त्याने "मुंबई भारताची" असं विधान केलं...ते जरा स्फोटकंच होतं. पण ते एक विधान आपल्याला पटलं नसेल...तर हा भ्रष्ट, "निकम्मा", नाकर्ता राजकारणी झाला का?

गरज नाही त्या गोष्टींवर तो बोलत नाही...हे त्याचं आधीपासूनचं फार कौतुकास्पद तत्व आहे...आणि त्याने, हे वरील आणि इतर १-२ अपवादात्मक उदाहरणं सोडली, तर त्याचं नाही त्या फंदात नं पडण्याचं तत्व फार उत्तमरीत्या पेललं आहे. मागे त्याच्या १०० व्या शतकानंतर, त्याला इतर खेळांबद्दल काही प्रश्न विचारले तर प्रत्येकवेळी तो बोलला "आपल्याला काही कळत नाही त्यातलं! आपण नाही बोलत त्यावर!" :)

मस्तंच!

माझं काम हेच माझं दैवत - मी बरा - माझं काम बरं- ...अशी विचारसरणी असलेलं सचिनसारखं एखादं पात्र जर राजकारणात उतरलं..."आता राजकारण हेच माझं काम" अश्या भावनेने उतरलं...तर काही चांगलं घडेल अशी "थोडीशी" आशा मला वाटते.

तो नं येता दुसरा कुणी आला...तरी तो सचिनइतकाच किंवा सचिनपेक्षा वाईट असणारंच!

मग कशाला एवढी बोंबाबोंब होतीये कळत नाही!

काही नाही...! आम्हाला आमच्या समोर असलेले प्रश्न सोडवायचे नाहीत...! मोठ मोठ्या गप्पा मारायच्या आहेत...!
"हे योग्य-ते अयोग्य...असं माझं स्पष्ट मत आहे! ते दुसरं तिसरं मत ऐकायच्या, वाचायच्या भानगडीत आपण नाही पडणार" (...आणि फक्त मोठ मोठ्या गप्पा मारणार) ... असं म्हणणाऱ्या लोकांनी भरलेल्या भारतात...काही वेगळं होण्याची अपेक्षा करणंच व्यर्थ आहे!!!

---

टीप:
१) माझ्यासाठी "क्रिकेट" सर्वस्व अजिबात नाही.
२) मी सचिनचा चाहता मुळीच नाही. त्याची खेळण्याची शैली अर्थातच मला आवडते. पण मी बऱ्यापैकी सचिन-विरोधी चमू मधलाच आहे. माझ्या मित्रांना हे चांगलंच ठाऊक आहे!
३) १ आणि २ वरून हे स्पष्ट होतं की "सचिन" माझा "देव" मुळीच नाही...!!
:)