सत्यमेव जयते...पण "जय" मिळणार कसा?


आमीरच्या "सत्यमेव जयते" बद्दल भरपूर चर्वितचर्वण झालंय आता. त्याच्या पहिल्या लग्नावरून, मुस्लीम असण्यावरून झालेला विरोध फारंच खेदजनक वाटला. तसंच त्याला मिळालेली लोकप्रियता खुष करून गेली! असं वाटलं की एवढा वेळ, इतक्या क्लिष्ट विषयावर घडणारी चर्चा लोक आवडीने बघतायेत, समर्थन करताहेत...हेही नसे थोडके!

तरी काही गोष्टी आहेत...ज्या आपण भाबडे भारतीय नेहेमी दुर्लक्षित करतो. त्या गोष्टींवर पहिल्याच भागानंतर मत प्रदर्शित करणं जरा घाईचं वाटलं. पण दुसरा भाग बघितल्यानंतर लिहिण्याचा मोह अनावर झाला!

"सत्यमेव जयते" हा शो आमिरने दाखवणं चांगलं की वाईट ह्या दोन्ही गोष्टी बाजूला ठेऊन..."सत्यमेव जयते" आणि आमीर ची तिसरी बाजू बघुया.

सर्वप्रथम आमीरचं "मी समाजसेवक नाही...अभिनेता आहे..." हे म्हणणं.
हे असं म्हणणं चूक अजिबात नाही. एक अभिनेता (आणि निर्माता) म्हणून त्याने जे धाडस दाखवलं त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. पण वरील विधान करून, त्याने जबाबदारी झटकून टाकली! वरील वाक्य करून, त्याने हे अगदी बेमालूमपणे हे स्पष्ट केलं की सरकारच्या चुकीच्या धोरणांवर, बेजबाबदार वर्तनावर तो काहीच बोलणार नाही...करणार नाही.
हे आमीरमधल्या अभिनेत्याने केलं ह्यात काहीच गैर नाही. पण हे त्याच्या "देशाचा खरा हिरो" बनण्याच्या प्रयत्नातला धूर्तपणा-फोलपणा दाखवणारं आहे. हा हिरो फक्त "गरजणारा" आहे..."बरसणारा" नाही!!
(...
परत बोलतो...त्याने हे करणं चूक नाही...पण तो मोठी जबाबदारी टाळतोय असं वाटतं...इतकंच.)

दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट...

दोन्ही भाग फारच क्लिष्ट, नाजूक विषयांवर होते. ते ज्या हळुवारपणे दाखवले, चर्चिले गेले...वाह...लाजवाब!
खूप अभ्यास करून...सरकारी आकडे, स्वतः संशोधन करून मिळवलेले तथ्य...ते सिद्ध करणारे आकडे...सगळंच थक्क करणारं आहे.
आमीर जितक्या प्रेमाने, आपुलकीने, पोटतीडकीने समस्यांबद्दल बोलतो ते सुद्धा खूप सुखद वाटतं.

पण प्रश्न आहे तो त्याने दिलेल्या समस्या-समाधानाचा.
आपल्या समाजामध्ये काही "Over Optimistic" लोक आहेत...हे लोक एक भोळा आशावाद बाळगून असतात.
हे लोक म्हणतात भारताच्या समस्या तेव्हाच सुटतील जेव्हा "सगळे लोक" चांगले होतील...!
उदाहरणार्थ...सगळ्यांनी भ्रष्टाचार थांबवा म्हणजे प्रश्नच सुटेल...तुम्ही पैसे देऊच नका म्हणजे घेणारा मागणारच नाही...! किती हास्यास्पद उपाय आहेत हे? भ्रष्टाचार "देणार्यामुळे" होतो की "घेणार्यामुळे" ? तातडीची गरज असणाऱ्याला कुणी काम करून देण्यासाठी पैसे मागितले आणि “पैसे दे नाहीतर गेला उडत” असं म्हटलं तर कुठला पर्याय रहातो?

अश्या कुठल्या भोळ्या आशावादावर जगणं म्हणजे...रामराज्य हवंय...शिवशाही हवीये...पण श्रीरामांच्या , शिवरायांच्या राज्यनिर्माणासाठी मेहेनत घ्यायला नकोय असं आहे.
मुळात समाज “चांगला”च असतो. समस्या निर्माण होते मुठभर असणाऱ्या गुंडांमुळे. त्यांना जरब बसवण्यासाठी असायला हवेत चांगले कायदे, नियम...आणि त्यांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था!!!

आमिरने दोन मुद्दे प्रस्तुत केले. दोन्ही वेळा वकिलांनी, कार्यकर्त्यांनी हे सांगितलं की आपली न्यायव्यवस्था किती निर्लज्जपणे परिस्थितीचा, पिडीतांच्या हतबलतेचा फायदा घेऊन दोषींना मोकळं सोडते.
आमिरने शेवटी दोन्ही समस्यांवर दोन उपाय सांगितले.

१...आपण ठरवा...तुम्ही ठरवा की तुम्ही असं करणार नाही...आणि आपल्या माणसांची काळजी घ्या...!
२...आमिर सरकारला पत्र पाठवेल, तुम्ही sms करा...आणि ते सर्व सरकारला कळवलं जाईल...!

उपाय १ योग्यच आहे. आणि हीच गोष्ट ह्या "शो"चा फायदा दाखवणारी आहे. लोकांनी जागृत होणं आवश्यकच आहे. पण ते पुरेसं मात्र नाही.

उपाय २ पुरेसा आहे? ह्याने सरकार ऐकेल? ही गोष्ट सरकारवर दबाव आणण्यासाठी पुरेशी आहे का?

कुठलाही समाज पुढे तेव्हा येतो जेव्हा त्या समाजातले प्रसिद्ध लोक आपल्या प्रसिद्धीचा वापर सरकारवर दबाव आणून चांगले कायदे आणण्यासाठी करतात...आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करून घेतात.

पहिल्या एपिसोड मध्ये आमीर ने Fast Track court ची मागणी केली. अन् दुसऱ्यामध्ये एक कायदा पास करण्याची.
ज्या न्यायव्यवस्थेने आधी सगळ्या केस वेगळ्या केल्या...(म्हणजेच ती व्यवस्था चांगलीच भ्रष्ट आहे)...त्याने ही मागणी मान्य करणं शक्य आहे का? जरी मान्य केली...तरी अशी भ्रष्ट व्यवस्था न्याय देईल?
हे डॉक्टर असा अवैध धंदा करतात....ते पोलीसांच्या मदतीशिवाय शक्य आहे का? न्यायालयात सिद्ध कोण करणार आहे हे सगळे गुन्हे?
मुलांच्या लैंगिक शोषणाची समस्या दिसते तेवढी सोपी-खाजगी नाही. ज्यांनी पेज-३ चित्रपट बघितला असेल त्यांना थोडीशी कल्पना असेलंच. कित्येक बालसुधार गृह, अनाथाश्रम, झोपडपट्ट्या ह्या समस्येचे शिकार आहेत. आणि अर्थातच...मोठ मोठी मंडळी ह्यात सामील आहेत. सरकार हे सगळं थांबेल “असा” कायदा आणेल का? त्यात पळवाटा नसतील? सरकार आपलं सामन्यांचं ऐकेल की ह्या "बड्या" मंडळींचं...ज्यांच्या पैस्यावर निवडणुका लढवल्या जातात?

आज मोठ मोठे गुन्हे केलेले---भ्रष्टाचार, आतंकवादला मदत-अश्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले मस्तपैकी मोकळे हिंडतायेत. मग ह्या गुन्हेगारांचं काय?!!!
हे दोन मुद्देच नाही...आपल्या समोरच्या प्रत्येक समस्येचं समाधान इथेच अडतं!
कायद्याची अंमलबजावणी होत नाही! कारण कायद्यात पळवाटा असतात! त्यावर काय करावं?

ह्या साध्या प्रश्नांची उत्तरं आमीर देत नाही! हे प्रश्न त्याच्या मनात आले नसतील असं शक्यच नाही!
पण ह्या प्रश्नांना...हुशार आमीर एकदम छान बगल देतो...

आणि आपल्याला म्हणतो...
“उपासमारीने, तहानेने व्याकुळलेल्या माझ्या मित्रांनो...जा...शेती सुरु करा...! विहीर खणा...! त्यासाठी जमीन तुम्हीच शोधा...सरकारकडून परवानगी तुम्हीच मागा...
मी समर्थनाचं पत्र लिहितो...!!!”
---ब्लॉगचा सारांश सांगतो:

१...मला "सत्यमेव जयते" जाम आवडला!!!
२..."सत्यमेव जयते" मुळे मला आमीर अजून जास्त आवडू लागला आहे...!
३...असेच...जरा प्रबोधनाचे शो करून त्याने अधिकाधिक पैसे कमवावे अशी माझी खरोखर मनोमन इच्छा आहे!
४...पण...
तो जे करतोय ते फक्त "नाजूक समस्यांवर प्रकाश टाकणं" इतकंच आहे, त्याने सांगितलेले समस्या समाधानाचे मार्ग अजिबात पुरेसे नाही. ही जाण सुजाण नागरिकांनी ठेवावी....आणि मूळ प्रश्नावर समाधान शोधावं...!

8 comments:

 1. ओमकार, छान लेख जमलाय.

  सामाजिक आणि ज्वलंत प्रश्न आमीर त्याच्या कसदार अभिनयाने आणि मुद्देसूद शैलीने मांडून लोकांचे मन जिंकत आहे.

  पण मग एक प्रश्न येतो, आमीर हे खरच सामाजिक उत्तरदायीत्वेतून करतोय ? तर उत्तर नाही असे मिळेल. कितीही झालं तरी आमीर हा कलाकार आहे. 'सत्यमेव जयते'च्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याने म्हणे ३ कोटी रुपये घेतलेत आणि असे एकूण १३ एपिसोड्स चित्रित झालेत. म्हणजे एकूण रक्कम ३ * १३ = ३९ कोटी !! हा आकडा खूप मोठा आहे. तसेच आमीर हा कमालीचा व्यावसायिक नट आहे आणि स्टार प्लस वाले त्याच्याहीपेक्षा.

  त्यामुळेच आमीर काहीतरी सादर करेल आणि लोकं त्याला डोक्यावर उचलून घेतील असाच हा फॉरमाट आहे. यात सामाजिक भान आहे पण जास्त व्यावसायिक फायदा हे नक्की.

  तुझे पुन्हा धन्यवाद, चांगला लेख वाचायला दिल्याबद्दल.

  ReplyDelete
 2. सर्वत्र उदो उदो होत असताना आमीरच्या (पैसे कमविण्याच्या )कार्यक्रमाचे चांगले विश्लेषण केले .तुम्ही दाखवलेत ते खरे सामाजिक भान आहे .वेगळा आणि लोक डोक्यावर उचलून घेतील असा फॉरमाट हवा होता म्हणून हे विषय बाकी समस्यांशी काही देणे घेणे नाही .

  ReplyDelete
 3. एक वाचक आणि पत्रकार या पोझिशनमधून ही कॉमेंट करत आहे, कृपया राग मानून घेऊ नये.
  १. अमीर खान चांगला नट आहे ही बाब खरीच, पण या शो मधून तो जे दाखवतोय, ते कदाचित दुस-या कोणत्याच नटाने दाखवलं नाहीये.. पेशापलीकडे जाऊन सामाजिक भान दाखवण्याचा त्याचा प्रयत्न चांगला नाहीये का? एक नटाने हे असलं काहीतरी करणं हीच खरी कौतुकाची गोष्ट आहे.
  २. सध्या समाजात त्याची जी प्रतिमा आहे, जे वजन आहे ते पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्याने जर त्याच्या "सो कॉल्ड" ओळखींचा वापर केला तर कदाचित आहे त्या व्यवस्थेत बदल घडेलही!
  ३. आणि कायद्यात पळवाटा असणारच हो! आणि त्या त्याने गेल्या एपिसोडमध्ये दाखवूनही दिल्या. पण म्हणून फक्त रडत बसायचं की होप फॉर द बेटर असं म्हणून पुढे चालायचं? जनतेच्या पाठींब्याने आणि एकीने अख्खं सरकार कोसळू शकतं हे आपण पाहिलंय, अनुभवलंय. (२६/११ आठवा!) तसा काहीसं आत्ता नाही का होऊ शकत?
  ४. आणि आमीर ने किती पैसे घेतले, वगैरे वगैरेचं प्रॉफिट अॅन्ड लॉस स्टेटमेंट आपण का मांडतोय?! ते तो आणि चॅनेलवाले बघतील की!! या गोष्टींमुळे त्या शोमधल्या वास्तवाचं महत्त्व कमी नाही ना होत?! वास्तव आहे ते आहे, ते कसं बदलायचं याचा विचार आपण करूया ना! आणि तो म्हणतोय ते मार्ग पटत नसले तर आपण काही मार्ग शोधून काढूया!
  प्रत्येक गोष्टी प्रमाणे या शो लाही २ बाजू आहेतच!! पण त्यातल्या कुठया बाजूवर फोकस करायचं हे शेवटी आपल्या हातातच आहे! अगर दिल पे सही बात सही तरीकेसे भी न लगी, तोभी बात नाही बन सकती!
  शेवटी पुन्हा एकदा, वरील सगळ्या गोष्टी मनात आल्या तश्या लिहिल्या आहेत. त्यात कोणालाच दुखावण्याचा, वा भांडण उकरण्याचा हेतू नाही. तसे कोणाला वाटल्यास क्षमस्व.

  ReplyDelete
  Replies
  1. गायत्रीजी...आपण ब्लॉग लिहितो कारण आपल्याला अशी चर्चा करायची आहे...त्यामुळे भांडण वगैरे असं नाही वाटणार :) क्षमस्व काय? काहीतरीच!! आणि आपण खूप योग्य बोलताय...कुणालाच वाईट वाटायचं काहीच कारण नाही!

   आपला मुद्दा १ ... संपूर्ण समर्थन! आणि हे मी वर १-२ दा म्हणालोदेखील आहे.

   मुद्दा २...पुन्हा समर्थन...बघा मी काय म्हणालोय...
   "कुठलाही समाज पुढे तेव्हा येतो जेव्हा त्या समाजातले प्रसिद्ध लोक आपल्या प्रसिद्धीचा वापर सरकारवर दबाव आणून चांगले कायदे आणण्यासाठी करतात...आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करून घेतात."
   जर असं आमिरने केलं...तर मस्तंच होईल! (पण तसं घडणं अवघड आहे असं वाटतं... :( )

   मुद्दा ३...पळवाटा नसलेला कायदा आमिरने लोकांना सांगायला हवा...असं मला वाटतं!

   असे कायदे आहेत...कृपया हे पहा...
   https://www.facebook.com/photo.php?fbid=424250584261150&set=a.181299678556243.41716.100000286362050&type=1

   ४...पुन्हा...संपूर्ण समर्थन...! त्याने पैसा कामावावाच...! त्याने कुठलीही दान-धर्माची भावना ठेऊन शो काढूच नये...अशी अपेक्षाच नाहीये माझी. आणि अशी अपेक्षा पूर्णपणे मूर्खपणाची आहे असं माझं मत आहे.

   तुम्ही म्हणालात तेच मला म्हणायचंय...फरक इतकाच...की "तो मार्ग देतोय" असं मला वाटत नाही. तो फक्त वस्तुस्थिती सांगतोय अतिउत्तम पणे!

   गरज वाटतीये म्हणून ब्लॉगचा सारांश सांगतो:

   १...मला "सत्यमेव जयते" जाम आवडला!!!
   २..."सत्यमेव जयते" मुळे मला आमीर अजून जास्त आवडू लागला आहे...!
   ३...असेच...जरा प्रबोधनाचे शो करून त्याने अधिकाधिक पैसे कमवावे अशी माझी खरोखर मनोमन इच्छा आहे!
   ४...पण...
   तो जे करतोय ते फक्त "नाजूक समस्यांवर प्रकाश टाकणं" इतकंच आहे, त्याने सांगितलेले समस्या समाधानाचे मार्ग अजिबात पुरेसे नाही. ही जान सुजाण नागरिकांनी ठेवावी....आणि मूळ प्रश्नावर समाधान शोधावं...!

   प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद! :)
   सत्यमेव जयते!!!

   Delete
  2. HI guys.. first of all i really appreciate your out of box thinking on some serious issue.. i read the views of omkar and some of the replies like vijay ..Gayatri.. My point is one should focus on issues and not the person. who is doin wat is important but more valuable thing would be its impact.. whether its Amir, Anna, Ramdev or anybody.. we people should bother about the issue... so next time disuss abt wat has been done rather than who has done what??

   Delete
  3. Abhilash...very true bro!
   The CAUSE is important...NOT the person.
   We Indians tend to support/oppose a person rather than the cause.

   If you have noticed, I have raised Qs about WHAT Aamir is doing...and said that it is not sufficient. Please read this...the solution we propose for the issue...

   https://www.facebook.com/photo.php?fbid=424250584261150&set=a.181299678556243.41716.100000286362050&type=1

   Delete