"बामणाला मारा" विरुद्ध "ब्राह्मणा जागा हो!!!"


"जात" "धर्म" "भाषा"...आपल्या भारतात ह्या गोष्टी प्रचंड सामर्थ्य बाळगून आहेत. दुर्दैवाने, वैयक्तिक बाबी असलेल्या ह्या गोष्टीना "सार्वजनिक" सामर्थ्यच फार लाभलंय...आणि त्यानी सगळी "वाट" लागलीये!

आपल्या आजूबाजूच्या असलेल्या प्रश्नांवर रडत बसण्यापेक्षा, 'आपण काहीतरी करायला हवं' अश्या मताचा मी, मिळेल ती संधी साधून चांगल्या विचारांच्या, भरपूर वाचन असलेल्या, हुशार लोकांच्या संपर्कात येऊन काही करता येईल का हे चाचपडत असतो. ह्या सगळ्यात फेसबुक प्रचंड मदत करत आहे ! अर्थात ही मदत "चांगल्या" लोकांना होते...तशीच "वाईट" लोकांना सुद्धा!

"ब्राह्मण लोक वाईट आहेत...त्यांना झोडपला पाहिजे" असा विचार करणारी काही "मंडळी" आहेत हे पूर्वी पासून माहित होतंच. परंतू माझ्या फेसबुकवरच्या ऑनलाईन सोशलिझम मुळे "ब्राह्मण द्वेष ही प्रचंड मोठी समस्या आहे...आणि आपलं येत्या काही वर्षात काही खरं नाही..!!!" अशी धास्ती मनात बसायला लागली.

"काही ठराविक मंडळी" (त्यांचं नाव गाव पत्ता सांगून अजून प्रसिद्धी देण्याइतका मी काही 'हा' नाही...म्हणून ह्यापुढे त्यांना का. ठ. मं. म्हणेन ;) ) समर्थ रामदास, स्वातंत्रवीर सावरकर अन् अश्यातच दादोजी कोंडदेव अश्या लोकांवर चिखलफेक करून आणि त्या सोबत 'सगळे ब्राह्मण खराब' अशी बोंबाबोंब करून आपलं पोट भरतात---हे करणं हाच त्यांचा काम धंदा---असं मज पामरास प्राचीन काळापासून ठाऊक होतं. पण त्यामुळे "अपनी अब खैर नाही" प्रकारची दहशत नाही वाटली...कारण माझे डोळे अन् कान आजूबाजूला 'खरंच' काय घडतंय हे दाखवत होते...मी जन्माने ब्राह्मण आहे म्हणून मला कुणी शिव्या घालत नाहीये, माझा तिरस्कार करत नाहीये...हे मला नीट कळत होतं.

दुर्दैवाने माझ्या काही हिंदुत्वप्रेमी, देशप्रेमी मित्र-मैत्रिणींना असं नाही वाटत आहे...ह्या का. ठ. मं.च्या आपल्या समाजाला विभागण्याच्या ह्या कारास्थानामुळे ते लोक चिंताग्रस्त होताहेत...आणि म्हणूनच त्या का. ठ. मं. चा डाव सफल होतोय की काय अशी भीती वाटतीये...!

ते तसं होऊ नये...का. ठ. मं. चा विजय होऊ नये...म्हणून हा लेखन प्रपंच...!!!

आता ही का. ठ. मं. "असं का करतात बुवा" ह्यावर विचार करण्यापुर्वी एक छोटीशी गोष्ट विचारात घ्या...

कुठलाही समाज सर्वसाधारणपणे ३ भागात विभागला गेला असतो. 
५% - २५% - ७०% मधे...टक्केवारी कमी अधिक असेल...भावार्थ समजून घ्या!!!

५%--- राजकारणी, सत्ताधीश, लक्ष्मीपती, उद्योगपती...खूप "Powerful" माणसं.

२५%--- ह्या ५% लोकांची दुसरी आणि तिसरी फळी...ह्या ५% लोकांचे चेले...

ह्यांचं काम असतं वरील ५% लोकांच्या योजनांची अंमलबजावणी करणं. म्हणजे हे ५% लोक त्यांना हवा असलेला परिणाम साधण्यासाठी हाताखालच्या २५% लोकांना पैसा आणि इतर साधनं पुरवून...आपला चेहरा लपवून हवं नाही ते साध्य करून घेतात.

७०%--- ह्यामधी तुमी आनि मी...!!!
सामान्य लोक..!!! आम जनता...!!! The Mango People...!!!

तुम्हाला काय वाटतं...हे का. ठ. मं. कुठल्या प्रकारात येत असतील?
...नंबर २ च्या... २५%...!!!

५% लोकांपैकी काही लोक...ह्या का. ठ. मं. च्या पोटापाण्याची सोय करून त्यांना मुर्खासारखी बकबक करायला सांगतात.
५% लोकांचा हेतू नंतर बघू! पण ह्या "का. ठ. मं." चा हेतू असतो "वरिष्ठांची आज्ञा पाळणं...अन् पैसा कमावणं"...!!!

कुणी तरी फुटकळ राजकीय नेता टी व्ही वर काही तरी बरळणे...कुठल्या तरी संघटनेने प्रक्षोभक पत्रकं वाटणे...पुतळे हलवणे...इ इ...ही कामं कोण करतं? २५% लोक...!!!

आता "आपण जे बोलतोय" ती "फालतू बडबड आहे"..."जे करतोय ते चूक आहे."..हे ह्या २५% टाईपच्या...का. ठ. मं. ना माहित नसतं का?
हाहाहा...करेक्ट...!!! तुम्ही बरोबर ओळखलं!!! त्यांना सबकुछ मालूम असतं!!! पण वो लोग भी क्या करेगा? पापी पेट का सवाल है!!!

पहिला प्रश्न हा...

आपण ह्या का. ठ. मं. लोकांशी वाद घालून काय होणार? त्यांची मतं बदलणार आहेत का? की काम थांबणार आहे?

त्यांना थांबवायचे प्रयत्न करायलाच हवेत...पण ते योग्य आणि परिणामकारक पद्धतीने...त्यांच्या मूर्खासारख्या विधानांना उत्तरं देत बसण्याने आपलाच वेळ अन् रक्त वाया जातं...!!!
माझे कित्येक मित्र ह्या का. ठ. मं. शी वाद घालत बसतात, त्यांच्या बडबडीमुळे चरफडत बसतात...

बंधुनो...तीच तर त्या मुर्खश्रींची इच्छा!!! कशाला फसता त्या डावात?

दुसरा प्रश्न...जर आपण वरील टक्केवारी बघाल...तर लक्षात येईल की आपला समाज द्वेषाने प्रेरित अन् पिडीत आहे हे कशावरून ठरतं? ५ अन् २५ लोकांच्या कारास्थानावरून की ७० लोकांच्या वागण्यावरून?

ह्या ७० पैकी ५ लोक ब्राह्मण आहेत असं गृहीत धरू...
उरलेल्या ६५ पैकी किती लोक विनाकारण...केवळ तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून...किंवा ह्या का. ठ. मं. च्या दुष्कृत्यामुळे  ब्राह्मणांचा  तिरस्कार करत असतील?

ह्या का. ठ. मं.च्या हास्यास्पद विधानांमुळे, कारस्थानामुळे किती लोक खरंच द्वेष करायला सुरुवात करत असतील?  ह्या का. ठ. मं. च्या एका कार्यकर्त्याने माझ्या एका मित्राला मागे सांगितलं की "आम्ही ज्या जातीच्या नावावर काम करतो...त्यातले १% सुद्धा आम्हाला मानत नाहीत!"

तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न...

आपण...तुम्ही आणि मी...सर्वसामान्य लोक...काय करू शकतो...?

५% किंवा २५% लोकांच्या कामांना थांबवू शकतो की ह्या ७०% लोकांमध्ये काही गैरसमज पसरणार नाहीत ह्याची काळजी घेऊ शकतो?

"त्यांना" थांबवणं आपल्याला अशक्य आहे! किमान आपल्या सारख्या सामान्य माणसासाठी तरी अशक्य आहे. आपल्याला शक्य आहे आपल्या समाजाची बांधिलकी टिकवून ठेवणं! गैरसमज पसरू नं देणं! असं समजू की ह्या का. ठ. मं. च्या कामामुळे खरंच द्वेष पसरतोय...तर मग आपण काय करायचं त्यावर? आपापसात त्यांना शिव्या घालायच्या? की तो पसरणारा द्वेष थांबवायचा? ते ब्राह्मणांविरुद्ध षडयंत्र रचत असतील...तर ब्राह्मणांनी काय उत्तरं द्यायचं? कसं द्यायचं? समाजापासून वेगळं राहून? की समाजाच्या जवळ जाऊन...आपल्या वागण्यातून हे दाखवून की "ते लोक चूक बोलताहेत...आम्ही वाईट नाही आहोत!" ?


आता मी वर म्हणालो तसं ही का. ठ. मं. "असं का करतात बुवा" हे बघू.

ही का. ठ. मं. असं करतात ५% च्या सांगण्यावरून. ५% असं का करतात?

आमचे काही ब्राह्मण तरुण पार चेकाळले आहेत! कुठेही २-४ ब्राह्मण भेटले (म्हणजे...कुठल्यातरी फेसबुक ग्रूप वर भेटले)...की "आपल्या विरुद्ध किती भयंकर षडयंत्र रचलं जातंय" ह्यावर अत्यंत तडफदार भाषण देतात...काही वृत्तपत्रातली प्रक्षोभक भाषणांची कात्रणं किंवा फोटो...कुठल्यातरी नेत्याने केलेलं भडक विधान... (२५% पैकी कुणीतरी असं काहीसं करतं!) ह्याची उदाहरणं देऊन हे सिद्ध केलं जातं की आपलं काही खरं नाही! काही तरी करा...नाही तर अपुन सब खल्लास!!!

आणि हे "काहीतरी" करायचं म्हणजे काय? तर इतरांपासून स्वतःला तोडून टाका...!!!
फक्त ब्राह्मण ब्राह्मण करा...!!! देश-धर्म खड्ड्यात गेला! आपलं आपलं जगा !!!
मग काय....कौतुकाचा वर्षाव!!! लाईक अन् कमेंट!!!

अरे बाबानो...तेच तर पाहिजे आहे ना "त्यांना"...५% लोकांना...!!! समाज जितका विभागला जाईल...तितकं चागलं आहे त्यांच्यासाठी...! आणि तुम्ही तेच करताय...! आज ते "बामणाला मारा" म्हणतायेत...उद्या दुसऱ्या कुणाला शिव्या घालतील!!!

काही मुठभर माणसं आपला धर्म, आपला समाज फोडण्याचा प्रयत्न करताहेत...आपल्यात दरी पाडून ती वाढवण्याचा प्रयत्न करताहेत...आणि आपण त्यांच्या डावाला फसत आहोत...!

अर्थात...आज जातीभेद हा आपल्यात आहेच. त्या ७०% पैकी काही लोक जाती आधारित द्वेष करतही असतील. पण "किती?"...आणि "किती प्रमाणात?"

तुम्ही-मी---आपण हा विचार करायला हवा की आपल्या कॉलेजच्या दिवसात कुणी assignments ची देवाण घेवाण करताना कधी जात पहिली होती का? घराबाहेर शिक्षणासाठी राहिलेले लोक नक्की सांगतील की त्यांचे जिवाभावाचे मित्र सगळ्या जातीधर्माचे असतात...शाळा-कॉलेज असो की नोकरी धंदा असो...तुरळक जातीभेद पाळणारे...सगळ्याच जातीतले काही मोजकेच लोक सोडले...तर "परस्थिती फार गंभीर आहे" असं वाटण्यासारखं सध्या तरी काही नाहीये.

हा...एक मात्र नक्की...जर ह्या २५% लोकांच्या कामाचा "योग्य" प्रकारे बंदोबस्त झाला नाही तर पुढे चालून मोठी समस्या नक्कीच निर्माण होईल. तो बंदोबस्त करणं सामान्य माणसाच्या हातात नाही...पण दरी नं पडू देणं नक्कीच हातात आहे.

आपल्या इतिहासातअनेक विचारवंतानी समाजाला ते सांगितलं जे सांगणं "आवश्यक" आहे...ते नाही सांगितलं जे "ऐकायला आवडेल".

आज माझे ब्राह्मण मित्र आरक्षणका. ठ. मं. ची कारस्थानं ह्याने हताश झाल्यासारखे वाटताहेत. आणि दुर्दैवाने त्यांना "आवश्यक" जे आहे...योग्य जे आहे ते सांगणारे फार कमी आणि "आवडेल" ते सांगणारे अधिक आहेत. इतरांना शिव्या घालूनआहे हे असंच राहील...तुम्ही ह्या फंदात नं पडता "आपलं आपलं" जगा...देश सोडून निघून जा...अशी जबाबदारी झटकणारी विधानं पटकन आवडताहेत त्यांना.
नेहेमी १९४८ ...गांधी वध आणि त्यानंतरची ब्राह्मणांची कत्तल ह्याच्या वार्ता करणारे आम्ही हा विचार करत नाही की शिखांच्या कत्तलीच्या वेळी कोण आलं होतं त्यांना वाचवायलापण उठून उभी राहिलीच ना ती जमातकशी उभी राहिलीदेश सोडण्याच्या गप्पा करूनकी फक्त शीख-शीख बोंबलून?
सावरकर, टिळक, दादोजी ह्यांची आज दयनीय अवस्था झाली ती त्यांच्या पुढच्या पिढीने समाजाचं नेतृत्व केलं नाही म्हणून. आणि आजही तोच संदेश दिला जातोय. शिखांनी सैन्य भरती सोडली नाही...धर्म सोडला नाही...एकजूट ठेवली आणि समाजाला मदत करत राहिले...पैसा, सत्ता हस्तगत केली....हे सगळं समाजापासून तोडून घेतल्याने होणं अशक्य आहे...आणि "सगळे आमचा द्वेष करतात...आम्ही काहीच करू शकत नाही ते बदलण्यासाठी" असं म्हटल्याने समस्या आणखी वाढणार आहे.

"इतर लोक वाईट आहेत...ते तसेच राहणार आहेत..." हे असं म्हणणं म्हणजे परिस्थिती बदलण्याची इच्छा आणि धमक नसण्याचं द्योतक आहे. आमचे पूर्वज हे शिकले नाहीत...आजचा ब्राह्मण देखिल काही पुळचट लोक...जे फक्त तडफदार भाषा वापरतात...पण करत काही नाहीत अश्या लोकांच्या सांगण्याने तसंच वागू लागला...समाजाच्या अजून दूर जाऊ लागला...तर आपली खरंच खैर नाही!!!

जातीय दंगलीप्रक्षोभक विधानानंतर उठणारे पडसाद ही एक भयावह वास्तविकता आहे. ती कुणीच नाकारू शकत नाही. पण ह्यावर उपाय काय?
"समाज आम्हाला शिव्या घालणारच...काही लोक आमच्यात फुट पाडणारच" असं गृहीत धरूनप्रश्नापासून पळून जाणंकी असे गैरसमज पसरणार नाहीत...पसरू नये...फुट पडू नये असे प्रयत्न करत राहणं?

सारांश हा...की ब्राह्मणांनी...किंवा कुणीही...स्वतःला मूळ प्रवाहापासून तोडून घेऊन ह्या का. ठ. मं. च्या डावाला बळी पडू नये. 

"बामणाला मारा" चा विरोध..."ब्राह्मणा जागा हो!!!" अशी आरोळी नं ठोकता...
"लोकहो जागे व्हा...एकत्र या!!!" असं आवाहन करूनच व्हायला हवा...!!!

9 comments:

 1. ही बाब खरोखरच विचार करण्याजोगी आहे. माझ्या मते ऐश्वर्य (फिल्मी का असेना! आणि फिल्मी नग्नता!!) ही एक भुरळ घालण्याची किल्ली असते आणि तिच्याकडे सर्व आशाळभूत नजरेने पाहत असतात. मराठी पेहराव आणि संस्कृतीचा पुरस्कार किंवा प्रसार करण्याचा कधी कोणी प्रयत्न केलाच नाही. वरून बॉलीवूड चे मुंबईतील अस्तित्व! धंदेवाईक तर मराठी लोक कधी नव्हतेच - कधी केलाच प्रयत्न तर त्यांना विरोध हा प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्वकीयांचाच जास्त होतो. सदैव नकारात्मक विचार आणि समोरील व्यक्तीच्या चुकांची निंदा करण्यातच मराठी भाषिक धन्यता मानत आला. सकारात्मक विचार हा तरुणाईचा एक मुख्य गुणधर्म! जे काही चांगले आहे त्यासाठी प्रयत्नशील असण्याची एक आवड या काळात असते. दिशाहीन झाल्याने फक्त काहीतरी वेगळे म्हणून सुरवातीला आकर्षण व नंतर मानसिक आधीनता अशा प्रवासातून हे सगळे घडते! याला अपवाद असतीलही! पण फक्त अपवादच!! संघटीत विचार, आत्मविश्वास आणि सकारात्मकता हे खत असेल तर या परिस्थितीतून मार्ग निघेल. नकारात्मक विचारांचा त्याग व्हावा!!

  ReplyDelete
 2. द्विजाची कैफियत

  हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
  कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
  हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
  कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
  हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
  कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
  हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
  कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
  हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
  कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
  हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
  कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
  हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
  कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
  हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
  कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
  हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
  कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
  हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
  कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
  नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
  शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
  हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
  कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
  आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
  रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
  ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
  जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
  जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
  पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
  आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
  शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
  आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
  भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
  त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
  म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
  काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
  मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
  धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
  त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
  वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
  यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
  धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
  ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
  स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
  समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
  सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
  अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
  जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
  मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
  आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
  शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
  जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
  द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
  द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
  वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
  पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
  शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
  हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
  सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
  गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
  हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
  उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
  यश खेचून आणायचे आहे
  होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
  द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे

  - कवी योगेश

  ReplyDelete
  Replies
  1. भारीच कविता आहे कि , मला कविता आवडत नाहीत , त्यांची मी तिन्गले करतो पण हि कविता वाचायला लागल्यावर शेवटपर्यंत वाचत गेलो आणि शेवट झाल्यावरच कल्ले कि आयला आपण एवढी मोठी कविता पूर्ण वाचली . शाब्बास रे फाकड्या

   Delete
  2. Khup sunder ani agadi barobar kaifiyat mandali ahe !!!

   Delete
 3. कविता मस्त आहे ! लेख हि मस्त आहे !

  ReplyDelete
 4. Very very thoughtful & balanced ! The message is damn practical..
  Ultimately what matters to mango people , aam janta is whether they get good services or not for the tax they pay.. So instead of wasting time in quarreling among each other, we ,the people should show the road to those who go against the interest of public development...without waiting for the term end. Thats the only way to keep them loyal to the work they are assigned for.

  It is the game of these politicians to make common people fight against each other.. There is no point in falling in their traps..Good & bad people are there in every caste..
  You have done a great job by opening up on this topic. 10/10 for bringing out a correct & most practicle perspective!

  ReplyDelete
 5. वर्ण द्वेषातून एकाद्या वर्णाच्या सर्वच लोकांची कत्तर करणार्या पुरुषाला जो पुज्य मानतो तो कायम समाजापासून तुटतच राहणार.

  ReplyDelete
 6. समाजाला जागे करण्याची वेळ आली आहे ....

  ReplyDelete