जबाबदार कोण - भ्रष्ट नेता की अंधभक्त कार्यकर्ते ?

आज देशाच्या असलेल्या वाईट परिस्थितीबद्दल काही वेगळी पार्श्वभूमी द्यायला नको. आपण सर्व हे सगळं चांगलंच जाणून आहोत. प्रत्येकवेळी विषय निघाला की कॉंग्रेसला शिव्या घालून, सगळ्या नेत्यांना चोर म्हणून आपण विषय आटोपता घेतो आणि आपापल्या कामाला लागतो.

सहाजिक आहे. सामान्य माणूस दुसरं करणार तरी काय? आपल्या पोटापाण्याची सोय करणार, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज करणार की रस्त्यावर नारेबाजी करत फिरणार? अर्थातच आम्ही पहिले पर्याय निवडू.

प्रश्न सामान्य नागरिकांचा नाही...प्रश्न आहे राजकीय कार्यकर्ते किंवा विशिष्ठ नेता/पक्ष समर्थक ह्यांचा.

हे लोक काय करतात ? आपल्या नेत्याला, पक्षाला आपलं म्हणणं ऐकायला भाग पाडतात का ? की 'ते-वरचे' लोक जे म्हणतील ते निमूट ऐकतात ?

अर्थात जेव्हा कुणाला निवडून यायची वेळ येते तेव्हा - त्यातल्या त्यात बऱ्या नेत्याला/उमेदवाराला/पक्षाला मत द्यावं लागणार. तेव्हा आपण 'सगळेच चोर म्हणून आम्ही मतदान करणारच नाही' असं म्हणून घरात बसणं अगदीच अयोग्य आहे. परंतू निवडणूक झाली, निकाल लागला...की संपतं आपलं किंवा ह्या कार्यकर्त्यांचं काम ?

जो कुणी निवडून आलाय...त्याच्याकडून काम करून कुणी घ्यायचं? आपणच ना? पण आपण तसं नाही करत. जर आपल्याला आवडणारा उमेदवार निवडून आला असेल तर त्याने काहीही केलं तरी त्याचं समर्थन करतो आपण. आणि नको असलेला आला असेल...तर विरोध !!! हे असं का घडतं मला कळत नाही.

उदाहरणार्थ (केवळ...उदाहरणार्थ!!!) समजा मला राज ठाकरे आवडतात. आणि समजा मला नरेंद्र मोदी आवडतात. आणि समजा भाजप आवडतो. अर्थात...हे सगळे 'त्यातल्या त्यात बरे आहेत' म्हणून आवडतात. जेव्हा केव्हा निवडणूक करायची वेळ येईल तेव्हा मी ह्यांच्या समर्थक/उमेदवारांना मत देईन. पण तोपर्यंत काय ? आणि त्यानंतर काय? फक्त आणि फक्त ह्या लोकांचं समर्थन आणि कौतुक करत सुटायचं ?

समजा आमच्या भागात राज साहेबांचा मनसे उमेदवार निवडून आला...तर मी काय करतो ? त्यांच्या कार्यकर्त्यांना मला काय काय सुधारणा हव्या आहेत सांगतो का ? मनसे कार्यकर्ते राज साहेबांच्या मागे लागतात का कामं करून घ्यायला ?

सर्वात महत्वाचं...जर उद्या मनसे ने काही चुकीचं धोरण अवलंबलं...तर मनसे कार्यकर्ते काय करणार आहेत? त्या चुकीच्या धोरणाचं समर्थन ? का बरं ? नेत्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्ही पक्ष सोडा किंवा लगेच कॉंग्रेस इ समर्थक व्हा असं कोण म्हणतंय ? पण 'हे चूक आहे...हे थांबवा...' असं नको म्हणायला ?

एकदा आपण कुणाला मत दिलं, कुणाला 'त्यातल्या त्यात बरा' म्हणून निवडलं की त्याला इतकं defend का करतो आपण ? जणू काही तो आमचा जिवलग मित्र आहे आणि त्याचे अपराध पोटात घालणं आमचं आद्य कर्तव्य !

Bullshit !!!

गेल्या काही दिवसांपासून काही भाजपा भक्तांना मी अटल बिहारींचा एन्रॉन निर्णय, तेहेलका इ बाबत प्रश्न विचारतोय. सगळे एकदम भडकून उठतात ! लगेच मी 'काँग्रेसी' होऊन जातो ! आम्ही आमच्या नेत्यांना समर्थन देतो की त्यांच्या कामांना...कळत नाही !

भाजपा च्या चुका दाखवल्या म्हणजे मी एकदम भाजपा विरोधक कसा होतो ? त्यांच्या, अटलजींच्या चांगल्या कामाबद्दल मला कौतुक आहेच की ! पण म्हणून मी त्यांची चूक दाखवून नाही द्यायची ? हे असं करून मी आ बैल मुझे मार नाही करणार का ? असं वागणाऱ्या अंधभक्त आणि कार्यकर्त्यांमुळेच मोठे पक्ष आणि नेते निर्ढावतात.


आता भाजपा कॉंग्रेस इतकी भ्रष्ट नाही...म्हणून परवडली...हे मत असेल तर ठीक आहे. पण हे  मतदाना पुरतं असावं ना ? एकदा का ते लोक सत्तेत आले...की १०० %  पारदर्शक आणि ० % भ्रष्ट कारभार अशी आग्रही मागणी आपण नको करायला? की आपणच 'थोडा बहुत चलता है !' असं म्हणणार?


तसंच सुब्रमण्यम स्वामी, अण्णा हजारे-केजरीवाल इ च्या भक्तांसोबत होतं.

अश्याने देश पुढे जाणार आहे का? आज 'कदाचित' वरील मंडळी खरोखर चांगली असेल ही...पण जर आपण - त्यांच्या समर्थकांनी - त्यांच्या छोट्या छोट्या चुका सुद्धा मोठ्या करून त्यांना धारेवर नाही धरलं...तर उद्या चालून ते भ्रष्ट होणारंच !

थोडक्यात, स्वातंत्र्योत्तर काळापासून (...खरं म्हणजे...त्या आधीपासूनच) आम्ही व्यक्तीपूजेला एवढं महत्व देत आलोय की त्या व्यक्ती पलीकडे जाऊन, त्या व्यक्तीचे विचार आणि काम...बोलणं आणि कृती ह्यातलं साधर्म्य किती, देशाला ह्यांचा खरोखर फायदा किती, अश्या गोष्टींकडे आम्ही साफ दुर्लक्ष करतोय. आणि त्यामुळे जो कुणी सत्तेत येईल त्याला 'विरोधक' किंवा 'जाब विचारणारी' सर्वात विश्वसनीय यंत्रणा---स्वतः लोक---अस्तित्वातच राहिली नाहीये.

उरले फक्त राजकीय विरोधक---विरोधी पक्ष. ते सुद्धा, अर्थातच, त्याच माळेचे मणी.

मग आता स्वतःलाच विचारा...आज आपल्या देशाच्या दयनीय परिस्थितीला जबाबदार कोण?

3 comments:

 1. माझ्या मते या परिस्थिती ला जितके राजकारणी लोक जवाबदार आहेत तितकेच सामान्य नागरिक सुद्धा आहेत. कारण टाळी एका हाताने वाजत नाही.

  सामान्य लोकांना असेच वाटत असते कि निवडणुकीमध्ये त्यातल्या त्यात बऱ्या उमेदवाराला निवडून दिले की आपण आपले कर्तव्य पार पाडले.

  पण जनतेचे सेवक म्हणून हे निवडून आलेले लोक आपली जवाबदारी नीट पार पाडत आहेत की नाही या गोष्टीचा पाठपुरावा करणे कोणालाच नको असते.

  ReplyDelete
  Replies
  1. कल्याणी...तेच म्हणायचयं मला पण.

   Delete
 2. I do agree with U Bro...

  Aapan kharach proper feedback ghetla tr in real manner incredible India pahayla bhetel..!!

  ReplyDelete