Milk of the Tigress विरुद्ध अमृत !

देशभक्ती, 'आपल्या' लोकांवर प्रेम, मातृभूमीसाठी असणारी कळकळ ह्या गोष्टी भारतवर्षात तुरळक अजिबात नाहीत. आम्ही सर्वच वर्षातून १-२ दिवसतरी ह्या भावनेच्या प्रवाहात चिंब भिजतो.

परंतु काही लोक आहेत जे ट्वेन्टी-फोर-सेवन ह्याच प्रवाहात असतात. 'ने मजसी ने' ह्या काव्यातील ओजस्वी अन् प्रखर राष्ट्रप्रेम त्यांचा श्वास असतो. 'इन्कलाब जिंदाबाद' चे नारे जरी देत नसतील तरी तो जोष प्रत्येक क्षणी प्रफुल्लित असतो.

ह्याच देशभक्तीची, आपल्या संस्कृतीच्या अभिमानाची परिणीती आपल्या भाषांवारच्या प्रेमात होते. आणि मग नवीन स्वातंत्र्यसमर सुरु होतं.

इंग्रजी विरुद्ध मराठी / हिंदी इ च्या रुपात.

{काही मराठी/हिंदी प्रेमी इंग्रजीचा तिरस्कार त्यांच्या मातृभाषेच्या प्रेमापोटी करतात की इंग्रजी येत नसल्याच्या frustration मुळे...हा माझ्यासाठी एक चिंतनाचा विषय आहे ;) असो...!}

मी इयत्ता ७ पर्यंत मराठी, ८ ते १० सेमी-इंग्रजी माध्यमांमध्ये शिकलो. इंग्रजीची खरी चव चाखली ती त्या ३ वर्षात. पुढे पुढे जस जसं ह्या वाघिणीच्या दुधाचं व्यसन जडलं {व्यसन---जरा निगेटिव्ह शब्द आहे. बऱ्याच जणांना इंग्रजी बद्दल आपुलकी ही भावना निगेटिव्ह वाटते म्हणून वापरलाय :) } तस तसं टाईम्स चं वाचन वाढलं, इंग्रजी कादंबऱ्या, वैज्ञानिक साप्ताहिकं इ चा ओघ घरी वाढत गेला. आणि नकळतच पु लं, शिवाजी सावंत, वि स खांडेकर ह्यांचा चाहता असलेला मी, लक्षात ठेवायला अवघड असणारी इंग्रजी लेखकांची नावं घोकायला लागलो.

सुदैवाने मराठी वाचन आधी पासूनच होतं, त्यामुळे मराठी बऱ्यापैकी चांगली येतंच होती. त्यामुळे आपली मातृभाषा चांगली येत असणाऱ्याला दुसऱ्या भाषा लवकर शिकता येतात ही गोष्ट सुदैवाने माझ्या इंग्रजी भक्तीत खरी ठरली. अर्थात मी इंग्रजीवर किंवा मराठीवर प्रभुत्व कधीच नाही मिळवलं, तसा हेतू सुद्धा कधीच नव्हता. पण इंग्रजी बोलून चालून ठीक-ठाक येते अश्यांपैकी मी एक आहे हे ही नसे थोडके !

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या आजूबाजूला फुटणारा 'मराठीला वाचवा' चा टाहो, 'इंग्रजीला वाळीत टाका' चा एल्गार जरा त्रास देत राहतो.
अश्या गोष्टी नेहेमी 'भावनिक आवाहन' करून दामटल्या जातात...थोडासा धुराळा उठतो आणि परत जैसे थे होतं. पण सामाजिक प्रश्न 'भावनिक' प्रकारे कितीदिवस हाताळणार आपण ? हा विचार कुणीच करू पाहत नाही.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणारे लोकमान्य इंग्रजीला 'वाघिणीचं दूध' म्हणत. का म्हटले असतील तसं?

तेव्हाचं असुदेत. आजची परस्थिती बघुया.

इंग्रजी अस्खलित यावी असं आमच्या माय-बापाना वाटतं. त्यासाठी ते आम्हांस कॉन्व्हेंट मध्ये टाकतात. का होत असावं असं?

जरा आपल्या शाळेपासून सुरु करून...तो प्रवास आपल्या व्यवसाय/नोकरी पर्यंत करू.

शाळेतल्या मिळणाऱ्या ज्ञानाचा 'उपयोग' असतो आपल्याला मिळणारं शहाणपण आणि पुढे होणारी पोटापाण्याची सोय.
शहाणपण कुठलं...शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक भान.

शैक्षणिक गुणवत्ता मिळवण्यासाठी मराठी माध्यमातल्या शाळांमध्ये काय मदत होते?

मराठीतून शिकणारा Mathematics Olympiad, Science Olympiad मध्ये भाग घेऊ शकतो का ? IIT-JEE ची तयारी इंग्रजी माध्यमातला विद्यार्थी ज्या सहजतेने करेल तितक्याच सहजतेने मराठी माध्यमातला करू शकतो का ?

पुढे सायन्सन किंवा इंजिनीअरिंग किंवा मेडिकल घेतलं, तर जगभरातले रिसर्च पेपर्स मराठीत सापडणार आहेत का ?

कॉमर्स घेतलं तर Share trading पासून ते investment banking पर्यंत आजच्या latest trendची up to date माहिती देणारे, नावाजलेले किती पुस्तकं मराठीत असतील ? ज्याचं मराठी एकदम झकास आहे पण इंग्रजी जेमतेम आहे अश्याला हे किती झेपणार आहे ?

त्या वयात...टीन-एज संपल्यानंतर...तो student इंग्रजी शिकणार काय ? तेव्हा इंग्रजी शिकेल की त्याच्या आवडीच्या विषयात प्राविण्य मिळवेल ?
हे झालं शिक्षणाबद्दल.

देशाच्या रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या ISRO, DRDO सारख्या संस्थांमध्ये इंग्रजी कुचकामी असणारा काम करू शकतो का ? अत्याधुनिक technologies समजून घेऊन आपले indigenous arms, satelites बनवण्यासाठी एकदम मजबूत इंग्रजी यायला नको का?

आज आपल्या देशाच्या GDP चा 57.2% भाग Service Industry चा आहे. ह्यात फार मोठा हातभार IT, IT-ES लावतं. २००७-०८ मध्ये आपण केलेल्या एकूण निर्यातीतला २५% भाग Outsourcing Industry चा होता. हे कश्याच्या जोरावर आहे ? आपल्या इंग्रजीवरच्या प्रभूत्वावर.

अर्थात इंग्रजी अजिबात नं शिकलेले परंतु तरी सुद्धा प्रगती करणारे राष्ट्रदेखील खूप आहेत. काय आहे त्या राष्ट्रांची strength ? Service Industry? Nope!!! ती राष्ट्र Manufacturing Industry वर चालतात की Service Industry वर? Manufacturing Industry वर!!! म्हणजेच त्यांच्याकडे खूप आधीपासून रिसर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रभुत्व प्राप्त करून...ते सगळं त्यांच्याच भाषेत करून इंग्रजीवरची भिस्त त्यांनी काढून टाकली...किंवा बनूच दिली नाही.

आपली तशी परिस्थिती आहे का ? नाही ! कधी होऊ शकते का ? मला तरी ते अशक्य वाटतं ! आणि जरी शक्य असेल, तरी आधी ते करावं, तेवढी गुणवत्ता मिळवावी आणि मग इंग्रजीचा वापर कमी / बंद करावा.

First DESERVE...Then DESIRE!!!

जे देश आज पर्यंत केवळ Manufacturing Industry वर चालत होते...त्यांनी सुद्धा त्यांच्या तरुणांना इंग्रजी शिकवायला सुरु केलं आहे. कारण त्यांनी इंग्रजीचं महत्व ओळखलं आहे.
राहिला प्रश्न मराठी वाचवण्याचा...

आपले लोक नेहेमी एकप्रकारची looser mentality घेऊन काम करतात. स्वदेशीचं महत्व पटवायचंय...तर विदेशी वस्तूंना नावं ठेवा आणि स्वदेशीमुळे आपल्या लोकांचा रोजगार वाढेल असं सांगा. मराठीचं महत्व सांगायचंय...इंग्रजी म्हणजे 'वैचारिक गुलामगिरी' असं सांगा.

साहेब...मध्यमवर्गीय बघतो स्वतःचा खिसा आणि खिश्याचं भविष्य !
त्यांना हे 'वैचारिक गुलामगिरी' वगैरे सब झूठ वाटतं!

तुम्ही quality स्वदेशी products, परवडतील अश्या किमतीमध्ये द्या, त्यांचं आकर्षक मार्केटिंग करा...आणि मग बघा !

मराठी टिकवायचंय ? मराठी शाळांना मराठी आणि इंग्रजी दोन्हीही धड शिकवायला सांगा. मराठी मुलांना जर उच्च प्रतीचं इंग्रजी शिक्षण मराठी सोबत मिळालं तर कशाला जातील महागड्या convent schools मध्ये ?

मराठी तरुण English, Japanese, German, French ह्या सगळ्या भाषा का शिकतो ? मराठीवर प्रेम नाही म्हणून ? इतर भाषिक मराठी का नाही शिकत ? त्यांना मराठी आवडत नाही म्हणून ? अर्थात असं काहीच नाहीये. सवाल पापी पेट का है !

आपण सामन्यांनी कितीही ठरवलं की मराठीला प्राधान्य द्यायचं...तरी ते यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा मराठी शिकल्याने पोटा-पाण्याची समस्या सुटेल. आज इंग्रजी येत नसेल नोकरीमध्ये वाट लागते. शिवाय घरी आणि मित्रांमध्ये मराठी आणि ऑफिसमध्ये इंग्रजी असं जमत नसतं. अस्खलितपणा सातत्याने येतो.

म्हणजेच...मराठी सक्षम करायची असेल तर आपल्याला "स्वावलंबी" व्हावं लागेल. म्हणजेच महाराष्ट्रातल्याच कंपनीत, मराठीतूनच व्यवहार इ इ व्हावं लागेल. आणि त्या साठी औद्योगिक स्वयंपूर्णता हवी. त्यासाठी सरकार तसं हवं...!

हे मी आपली जबाबदारी झटकण्यासाठी म्हणत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. कुठलीही भाषा बघा...तिचा विकास औद्योगिक विकास आणि सामाजिक प्रगतीसोबतच होतो.

थोडक्यात काय...जर खरंच मराठीची कळकळ असेल...तर भावनिक आवाहनं थांबवून, इंग्रजीचं महत्व ओळखून मधला मार्ग शोधा...आणि...लोकांना त्यांच्या समस्येचं समाधान द्या !!!

तसंही...अमृताला दुधाची धास्ती वाटायची गरज नाही ! गरज आहे ती वाघिणीचं दुध पिऊन सशक्त होण्याची आणि त्या शक्तीच्या जोरावर अमृताचं रक्षण करण्याची!

5 comments:

 1. एखादेवेळी घरी विचार की "मी लहान असताना कुणी माझा भाऊ जत्रेत हरवला होता का?" मीही विचारतो..... :P
  :)
  Agreed 100/100 मित्रा.....

  ReplyDelete
 2. इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेला विरोध नाही. शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झाले आहे कि प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत शिक्षण झाल्यास व्यक्तिमत्व विकास चांगला होतो..... एवढ्यास साठीच मराठी भाषेतून शिक्षणाचा आग्रह......

  ReplyDelete
  Replies
  1. अर्थात...! फक्त प्रस्थापित मराठी भक्त हे मराठी भक्ती पेक्षा इंग्रजीचा द्वेष जास्त करतात. त्या विषयी ब्लॉगच्या सुरुवातीला बोललोय.

   Delete
 3. वाघिणीचे दुध हि एक मोठी चित्तरकथा आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मराठी अभिमानी होते, म्हणून चौगुले नावाच्या इंग्रजीचे वर्ग चालवणाऱ्या ठगाने 'त्यांनीच इंग्रजीला वाघिणीचे दुध म्हणले' अशी थाप लोकांना मारली.
  असो, चिपळूणकर यांचे मूळ लिखाण पुढीलप्रमाणे आहे.

  " इंग्रजीस वाघिणीचे दुध म्हणोन काही विद्वान नावाजतात खरे! पण येथ पहावे तो, या दुधावर पोसपोसून मेषपात्रेच निपजत आहेत, असे दृष्टोत्पत्तीस येते."

  ReplyDelete