तथाकथित 'असंस्कृत' भारतीय

परवा दादर स्टेशन वर लोकल मधून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या लोकांची धडपड आणि गोंधळ बघत होतो. बरोबर एक मित्र होता. म्हणाला - 'काय फालतू लोक आहेत साले! जरा व्यवस्थित उतरले - चढले तर किती शांतपणे होईल सगळं! साला आपली भारतीयांची लायकीच नाही काही! असंस्कृत लेकाचे!'
क्षणभर मला त्याचं पटलं. इंग्लिश चित्रपटात किंवा परदेशी जाऊन आलेले लोक सांगतात - इतर देशांमध्ये खूप शिस्त आहे लोकांमध्ये. तिकडच्या रेल्वे मध्ये म्हणे अगदी शांत, शिस्तीत चालतं सगळं. माझा मित्र सुद्धा हे सगळं सांगत होता.
मी विचारलं - तिकडे गर्दी इतकीच असते का रे? म्हणजे - तुडुंब भरलेल्या रेल्वे इ - असं चित्र असतं का तिकडे?
'नाय रे!' तो म्हणाला. 'फारच कमी गर्दी असते. तिकडची सिस्टीम साली फार भारी आहे!'

---आणि माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकलं :)

आपल्या कडे बुद्धीवाद्यांनी आणि उच्चभ्रू लोकांनी "सामान्य भारतीय हा असंस्कृत, घाणेरडा, बेजबाबदार आहे" असा समज इतका जबरदस्त पसरवला आहे की कुठेही काहीही घडलं की सगळी जबाबदारी साधारण ८०% सामान्य भारतीयावर टाकून सगळे मोकळे. मुंबईच्या लोकलमध्ये होणाऱ्या गडबड गोंधळाला जबाबदार फक्त ती गर्दी आहे का? ही अशी गर्दी झाल्यावर गडबड होणं साहजिक नाही का? अशी गर्दी होऊच कशी दिली जाते? मुंबईतली लोकसंख्येची घनता इतकी प्रचंड मोठी झालीये की अजून पर्यंत अराजकता कशी नाही माजली असं वाटतं मला ! त्यासाठी आपल्या मुंबईकरांना सलामच ठोकला पाहिजे! रस्ते खराब, बेस्टमधून प्रवास म्हणजे एक भयंकर प्रकार, लोकलमध्ये तोबा गर्दी तरीही आमची लोकं निमूट काम करताहेत. सगळं व्यवस्थित सुरु आहे. हे सगळं मुंबईकर असंस्कृत आणि बेजबाबदार असते तर शक्य होतं का?
अर्थात, सामाजिक शिस्त आपल्याकडे कमीच आहे. त्याबद्दल दुमत नाही. रस्त्यावरून चालताना भान नसणं, वाट्टेल तिथे थुंकणं अश्या सवयी आपल्या लोकांमध्ये भरपूर आहेत.

प्रश्न आहे - ह्या सवयी का आल्या आपल्या लोकांमध्ये?

जर भारतीय लोक खरंच थर्ड क्लास मानसिकतेचे असतील...तर तो दोष कुणाचा ? देशाला, समाजाला फर्स्ट क्लास मानसिकतेचं करायचं काम कोणाचं ?

लोकांना "शिस्त" लावणं - ठराविक नियमानुसार लोकांनी वागावं आणि कुणी तसं वागलं नाही तर दंड/शिक्षा करून संतुलन कायम ठेवणं हे आपल्या यंत्रणेचं काम आहे. ही शिस्त इतरांना लावण्यासाठी वेळ सामान्य लोकांकडे नाहीये - आम्हाला आमची पोटापाण्याची चिंता आहे साहेब! आमच्या मुलामुलींच्या भविष्याची सोय करायचीये, कुटुंबाची काळजी घ्यायचीये, दुखणी-खुपणी आहेत. ह्या सगळ्यातून समाज घडवणं आणि शिस्त लावणं हे आम्हाला नाही जमणार - म्हणून आम्ही यंत्रणा उभी केली. आम्ही दर वर्षी ही यंत्रणा चालावी म्हणून पैसे गोळा करतो - कर भरतो. त्यातून ह्या यंत्रणेने काम भागवावं आणि आम्हाला व्यवस्थित सुविधा पुरवाव्यात ही अपेक्षा.

परंतु ही यंत्रणा कुठेतरी कमी पडतीये. उदाहरणार्थ, मुंबईमध्ये तोबा गर्दी झालीये - अजूनही होतीये - तरी यंत्रणा त्यावर काही नियंत्रण आणायचा विचार आणि तशी कृती करताना दिसत नाही. वाढलेल्या लोकसंख्येला पुरेश्या सोई-सुविधा तयार होताना दिसत नाहीत. आता जर लोकसंख्येच्या प्रमाणात लोकल रेल्वे नसतील - तर साहेब लोकांची घाईगडबड होणारच ना ! रस्त्यावर थुंकण्याची 'प्रथा' जेव्हा नुकतीच सुरु झाली होती - तेव्हा जर ह्या यंत्रणेने त्यावर कडक शासन करण्याची सोय केली असती तर आज सगळीकडे २४/७ रंगपंचमी दिसली नसती. मुळात - रस्त्यावर किती लोक थुंकतात ? मी एकदिवस जरा १५ मिनिटं रस्त्याच्या बाजूला उभा राहून मोजायचा प्रयत्न केला. दर १५-२० माणसागणिक १-२ लोक थुंकायचे. म्हणजे हे प्रमाण जास्तीत जास्त १०% असेल. आता ह्या काही लोकांमुळे आख्खी भारतीय जनता घाणेरडी आहे असं जर उच्चभ्रू लोक म्हणायला लागले तर ते अगदीच असंयुक्तिक आहे. हेच उच्चभ्रू लोक - "कोर्पोरेट ऑफिस कॉम्प्लेक्स सारखी ठिकाणं स्वछ कशी ?" ह्यावर उत्तर देत नाहीत ! "तिथे स्वच्छता करणारी माणसं आणि लोकांना शिस्त लावणारी यंत्रणा धड काम करतात" हे मान्य करणं ह्या उच्चभ्रू लोकांना जड जातं ! कारण ते मान्य केलं तर "अग्ली इंडियन्स" ला शिव्या कश्या घालता येतील ?

मुळात आमचे इंडियन्स - अग्ली झालेच कसे ? हा दोष कुणाचा ? आपला समाज नेहेमी जातीय विद्वेषाच्या दलदलीत फसावा अशी तजवीज कोण करून ठेवतंय ? "जर माझी "ओळख" असेल, तर मी सिग्नल तोडला, गुंडगिरी केली तरी चालून जाईल" अशी मानसिकता भारतात एका रात्रीत नाही पसरली ना...ती हळू हळू तळागाळापर्यंत गेली - कुणी नेली ? मी मुलीना छेडेन, हात धरेन तरी माझं वाकडं होणार नाही - कारण माझी, माझ्या वडिलांची एका नामी वकीलासोबत ओळख आहे - जो जज साहेबांचा खास माणूस आहे - हे माझ्या गावात माहीत झालं...हे असं कसं झालं ? हा सिस्टीमचा, सिस्टीमचा गैरवापर करणाऱ्यांचा दोष नाही का ?

आणि हो - एक फारच उत्तम युक्तिवाद आहे. 'यंत्रणा म्हणजे कोण? आपलेच लोक ना? आपल्याच लोकांमधून यंत्रणा बनते! मग जर यंत्रणा खराब - तर त्यामागचं कारण - आपणंच खराब !'

मला ह्यावर हसावं की रडावं कळत नाही. उद्या हेच लोक - "चोर म्हणजे माणूसच ना?" असं म्हणतील ! बलात्काराच्या बाबतीत अशी विधानं झाली सुद्धा होती. काय म्हणावं ह्याला?

दोन गोष्टी ह्या उच्चभ्रूंनी आणि त्याहून महत्वाचं - आपण सामान्यांनी लक्षात ठेवाव्यात -

१) जी व्यक्ती 'यंत्रणेच्या मध्ये आहे' ती 'यंत्रणे बाहेर'च्या व्यक्तीपेक्षा अगदी वेगळा विचार आणि व्यवहार करते. आणि ते स्वाभाविक आहे.

२) यंत्रणेतील 'लोक' खराब/वाईट/कुचकामी असू शकतात. परंतु यंत्रणा व्यक्तीसापेक्ष नं ठेवता व्यक्तिनिरपेक्ष करता येऊ शकते. म्हणजेच, एकदा का कुणी त्या सिस्टीमचा भाग झालं की स्वतःच्या हितसंबंधाना बाजूला ठेवूनच काम करावंच लागेल अशी "यंत्रणा"/"सिस्टीम" उभी करता येऊ शकते. - आणि अशी यंत्रणा असेल तर आणि तरच कामं धड होतात.

माणूस जेव्हापासून समूह बनवून राहू लागला यंत्रणा तेव्हापासूनच निर्माण झाली. कशी राजा कधी शासन कधी स्वराज्य...स्वरूप वेगवेगळी असली तरी समूह यंत्रणेनुसार वागतो. रामाचं रामराज्य आणि शिवबाचं स्वराज्य "चांगलं" का ? कारण सगळे लोक चांगले होते ? नाही. प्रशासनात चांगले लोक होते. त्याच प्रशासनाचं नंतर काय झालं हे आपल्याला माहित आहे.

म्हणजेच - यंत्रणा समाजाच्या प्रगल्भतेवर नाही - समाजाची प्रगल्भता यंत्रणेवर अवलंबून असते. यथा राजा तथा प्रजा !

अर्थात - शेवटी जबादारी येऊन पडते ती 'आम जनता'वर - आम जनतेमधल्या जागरूक Think-tankवर . यंत्रणा धड काम करत नसेल - तर यंत्रणेत बदल, सुधारणा घडवून आणणे ही जबादारी जनतेची आहे. ते बदल घडवण्यासाठी - समूळ बदल घडवण्याची मानसिक तयारी आपल्या जनतेमध्ये असणं ही खरी गरज आहे.

आपली सर्वांची  "समाज प्रगल्भ झाला पाहिजे" ही अपेक्षा रास्तच आहे. समाज प्रगल्भ झाला पाहिजे. ते कोण करू शकतं ? एनजीओ/सिव्हील सोसायटी ? नाही...त्यांची तेवढी कुवत/अधिकार अजिबात नाही. मग कोण ? सरकार...! अरे सरकार बनवलंच त्यासाठी जातं ! की लोकांना शिस्तीत ठेवा !

पण सरकार समाजातून घडतं ! म्हणून - समाजातल्या सुविचारी, सजग, जागरूक नागरिकांनी सरकारशी सतत संपर्क ठेवला पाहिजे. जिथे सरकार चुकेल तिथे झोडला पाहिजे - धड काम करून घेतलं पाहिजे. --- हे आहे सिव्हील सोसायटीचं काम.

आपण एकूण देश ला १०० मानू - सरकार केवळ १-५% आहे - सिव्हील सोसायटी ५% आहे आणि उरलेला देश (चागल्या वाईट संघटना, सामान्य नागरिक इत्यादी) ९०%.

सरकारकडे ह्या ९०-९५% लोकांना योग्य-अयोग्य दिशा देण्याचे सगळे मार्ग आहेत. सिव्हील सोसायटी कडे आहेत का ? नाही !!! "अख्खा समाज प्रगल्भ करणे" हे सिव्हील सोसायटीचं काम नाही पण - सरकारकडून चांगले नियम, कायदे तयार करून घेऊन, त्याची अमलबजावणी करून घेऊन समाजाला प्रगल्भ बनवून घेणं...सतत प्रगल्भ करत राहणं - हे काम सिव्हील सोसायटीचं !

आपलं काम "रत्यावर थुंकू नका रे बाबा" किंवा "बलात्कार करू नका गलीच्छ भारतीयानो!" किंवा "नकारे धार्मिक कट्टरता बाळगू" असल्या विनवण्या करणं नाही...आपलं काम सरकारला हे म्हणणं की- थुंकणाऱ्याना, स्त्रियांना त्रास देणाऱ्याना जबरी शिक्षा/दंड करा, सगळीकडे शिस्त ठेवा, "खरं" धर्मनिरपेक्ष शासन करून धार्मिक तेढ निर्माणच होऊ नका देऊ !

भारतात जी काही जातीय/धार्मिक कट्टरपंथी विचारधारा रुजू झालीये ती फक्त आणि फक्त सकारात्मक, नि:पक्षपाती आणि पारदर्शक सरकारी यंत्रणा नसल्याने.

म्हणजे कसं होतं बघा - कुठल्यातरी व्यक्तीवर वारंवार अन्याय होतो. तसाच अन्याय विशिष्ठ समूहावर व्हायला लागतो. - हा अन्याय का होतो, त्यामागे राजकारण कसं असतं हा मुद्दा वेगळा पण अन्याय होत रहातो.आणि मग तो समूहच हळू हळू "अ-भारतीय" होऊ लागतो. जातीय/धार्मिक होऊ लागतो.

मग असा मोठा समूह कुणान् कुणाकडून "वापरला" जायला लागतो. कट्टरवाद जन्माला येतो. आक्रमक हिंदुत्व ह्यामुळेच (किंवा अन्यायाच्या भावनेमुळे) जन्मलं. जम्मू-कश्मीर मध्ये असंच "घडवण्यात आलं". नक्षलवाद असाच फोफावला.

हे थांबणार कसं ? इतिहासावर "फक्त" चर्चा करून नाही - तर इतिहासातून असं का घडलं हे समजून घेऊन, मूळ कारणांचा अभ्यास करून --- ती कारणं "समूळ नष्ट" करण्याच्या प्रयत्नातून.

सकारात्मक, नि:पक्षपाती आणि पारदर्शक सरकारी यंत्रणा तयार करणे...हा एकमेव उपाय !

सक्षम सरकार असेल - दूरदर्शी विचार करणारे नेते असतील तर सुसंकृत समाज निर्माण होतच राहील. ती प्रक्रिया अखंड सुरूच राहील.

3 comments: