बलात्काराबद्दल थोडंसं

भारतात एकापाठोपाठ एक अमानवीय बलात्काराच्या घटना घडताहेत. त्यावर अनेक प्रतिक्रिया येतात, बलात्कार होण्याची कारणं आणि त्यावर उपाय चर्चिले जातात. एकंदर सर्वांचा धागा एकच असतो - आजची पिढी / आजचा माणूस संस्कारहीन झालाय, पाश्चिमात्य संस्कृती (छोटे कपडे, उशिरा बाहेर फिरणं इ) मुळे हे असं होतंय इत्यादी.

काही ठराविक विचार आणि त्यावर माझे प्रश्न -

१) मुली provocative कपडे घालतात, पब मध्ये उशिरा-उशिरा पर्यंत थांबतात, मुलांशी जवळीक साधतात - मग बलात्कार होणार नाही तर काय होईल ? ह्यांना धड नाही रहाता येत का ? मुलांना उत्तेजन दिल्या जातं मग बलात्कार घडतात. मुलींनी धड कपडे घालायला हवेत ! वेळेत घरी यायला हवं !

२) आजकाल अनेक जोडपी सार्वजनिक ठिकाणी, निर्जन स्थळी फालतू चाळे करतांना दिसतात. मग काय ! ४-५ टुकार तरुणांची नजर पडणार आणि रेप होणार !

३) भारतात वेश्याव्यवसाय बेकायदेशीर आहे. त्यामुळे वासनांध जनावरं बलात्कार करतात.

४) फालतू चित्रपट, चित्रपटामध्ये दाखवली जाणारी अश्लील दृश्ये ह्याने मुलांच्या मनावर परिणाम होतो आणि मुलं बलात्कार करतात.

५) भारतात सेक्स-एज्युकेशन मिळत नाही - म्हणून पोरं ब्ल्यू-फिल्म्स बघतात - विकृती वाढते - रेप घडतात !

--- हवे तसे कपडे घालणं हा काय गुन्हा आहे ? पब मध्ये उशिरापर्यंत थांबणारी मुलगी काय चूक करते - ती तिचं स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही का ?
छोटे कपडे घालणं चांगलं की वाईट हा विषय वेगळा आहे - पण तसे कपडे घालणं हे बलात्कारामागचं कारण आहे असं म्हणून Rape Victim लाच Rape Cuprit कसं ठरवू शकतो आपण ? म्हणजे लोकांच्या घरी चोरी झाली तर हा दोष लोकांचा ! कारण त्यांनी तिजोरी पुरेशी सुरक्षित नाही वापरली ! "तुमचे पैसे तुम्ही सांभाळा - पोलिसांना नका विचारू !" असं नाहीये का हे ?

--- सार्वजनिक ठिकाणी फालतूपणा करणं गैरच. भारतीय संस्कृतीला ते शोभतच नाही. पण बलात्कारांच्या मागे हे कारण आहे ?
किती बलात्कार लैंगिक चाळे करताना सापडलेल्या तरुणींवर झाले आहेत ? की काल कुणाला तरी बघितलं आणि आज कंट्रोल सुटला असं होतं ह्या गुन्हेगारांचं ?

--- मुळात भारतात वेश्याव्यवसाय कायदेशीरच आहे !  आणि असायलाच हवा. त्यावर मी सहमत आहे. परंतु त्याने बलात्कार अजिबात कमी होणार नाहीत. ह्या लोकांना असं म्हणायचंय की "वेश्यागमन 'बेकायदेशीर' आहे म्हणून तिकडे नं जाता लोक बलात्कारासारखा गुन्हा करतात" ! शांतपणे विचार करा की हे किती तर्कसंगत आहे ! एक बेकायदेशीर गोष्ट करायची नाही म्हणून कुणी गुन्हा करेल - तो ही बलात्कारासारखा - हे अजिबात पटण्यासारखं नाही.

--- आपल्या अनेक मंदिरांवर प्रणय किडा चितारलेल्या आहेत. त्या मंदिरांमध्ये तर स्त्रियांना अजिबात शिरता येऊ नये…! पण तसं काही घडत नाही ! सनी लियोन ज्या देशातून आलीये - तिथे घाणेरडे चित्रपट सर्रास बनतात. तिथे बलात्काराचं प्रमाण का कमी आहे ? ते लोक आपल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत का ? असा अक्खा देश खूप सुसंस्कृत आणि दुसरा देश असंस्कृत असं होऊ शकतं का ?

--- सेक्स एजुकेशन भारतात फारच कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. पण त्यामुळे ब्ल्यू फिल्म्स बघून पोरं बलात्कारासारख्या गलिच्छ गुन्ह्यापर्यंत कसे येउन पोहोचतील ? ब्लू फिल्म्समुळे पोरं "वात्रट" होतात… निर्दयी जनावरं नाही ! आणि समजा डोक्यात जराशी विकृती आली - तरी त्यांची त्यांच्या मनातले गलिच्छ विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याची हिम्मत "एकदम" कशी होते ?

---

बलात्कारावर उपायांचा विचार करायच्या आधी आपण बलात्कार कोण करतात ह्याचा विचार करायला हवा.

बलात्कारी माणूस अगदी एका रात्रीतून बलात्कारासारखा घृणास्पद गन्हा करत नाही. तोल सुटून आणि मानसिक संतुलन बिघडून काहीतरी विचित्र करून बसणारे काही माणसं असतीलही - पण तसले बलात्कारी फारच तुरळक आहेत. म्हणजेच - बलात्कार करण्याची वृत्ती , इच्छा आणि हिम्मत असणारा माणूस - शेफारलेला गुन्हेगार असतो. त्याने आधी मुलींची छेड काढली असेल, सतावलं असेल, कुणाचा हात धार कुणाला धमकाव असे धंदे केले असतील - आणि हे करून सुद्धा त्याचं काही वाकडं नाही झालं म्हणून त्याची आणखी मोठा गुन्हा करायची हिम्मत वाढली असेल. त्याला बघून त्याचे साथीदार ही चेकाळत असतील !

हे मी सांगत नाहीये - गेल्या वर्ष-दोन वर्षात पुढे आलेल्या सगळ्या बलात्काराच्या घटनेमधील प्रमुख गुन्हेगारांचा बायोडाटा हेच सांगतो.
निर्भया घ्या, मागे झालेला शाळकरी मुलीवरचा बलात्कार घ्या किंवा नुकताच मुंबईत झालेला सामुहिक बलात्कार घ्या - सगळ्यांची 'हिस्ट्री' रंगीतच आहे. ह्या पार्श्वभूमीवर वरील कारणं आणि उपाय बघा - योग्य वाटतात का ते ?

बलात्कार अगदी ३-४ वर्षाच्या मुलीपासून व्यवस्थित कपडे घालणाऱ्या तरुणीपर्यंत सगळ्यांवर होताहेत.

अविवाहित टपोरी पोरांपासून उतारवयाला आलेल्या मास्तरांपर्यंत सगळ्यांनी बलात्कार केले आहेत.

बस पासून शाळेच्या वर्गापर्यंत सगळीकडे बलात्कार झाले आहेत.

मग बलात्कारामागे छोटे कपडे, लैंगिक गैरवर्तन, ब्लुफिल्म्स, सेक्स-एज्युकेशन  ही कारणं कुठे लागू पडतात ? हे निर्ढावलेले विकृत लोक वेश्यावासाय बेकायदेशीर आहे म्हणून कोवळ्या मुलींवर बलात्कार करतात असं कसं समजू शकतो आपण ? त्यामुळेच वेश्याव्यवसायाच्या कायदेशीर करण्यामुळे बलात्कार कमी होतील हे कार्य-कारणभावशी सुसंगत नाही वाटत. 
---

आपल्या भारतीय मनावर चाणाक्ष राजकारण्यांनी आणि भ्रष्ट "विचारवंतांनी" - "भारतीय लोकच वाईट" - हा महाभयंकर inferiority complex इतका जबरदस्त बिंबवलाय की "बलात्कारापासून भ्रष्टाचारापर्यंत - सगळी चूक लोकांचीच!" असंच आम्ही समजून चालतो. म्हणजे पिडणारेही तुम्हीच आणि पिडीतही तुम्हीच ! बसा एकमेकांना दोष देत आणि उपदेश करत ! सरकार मस्तपैकी मजा बघत बसणार !
हे कसं होतंय…एका ५० विद्यार्थ्यांच्या वर्गात १ - २ उनाड पोरं आहेत आणि कुणालाच अभ्यास करू देत नाहीयेत. आणि आपण म्हणतोय…चला आपण सगळ्या ५० मुलांसाठी 'सत्संग' सुरु करु. त्यांच्यासाठी मूल्यशिक्षणाचे वेगळे तास सुरु करू. कारण ? साले सगळे मुलं फालतू आहेत !
शिक्षक आणि त्या २ उनाड पोरांच्या पालकांना काहीच बोलू नका ! सगळ्या पोरांना उपदेश करत रहा !

वर चर्चिले गेलेले उपाय भारतीयांना एक सुसंकृत आणि सभ्य जीवनमान जगण्याकडे उद्युक्त करणारे आहेत ह्यात वाद नाही. परंतु निर्दयी गुन्हेगारी वृत्ती असणाऱ्या माणसाकडून तुम्ही सभ्य वर्तनाला सभ्य प्रतिसाद अपेक्षून चालणार नाही.

बलात्काराच्या समस्येवर उपाय आहे -

१) तक्रार करणं सोपं आणि विश्वासार्ह करणं - ह्या सगळ्या टपोरी पोरं, गलिच्छ शिक्षक इ गुन्हेगार ह्यांच्या विरुद्ध त्यांच्या पहिल्या खोडीच्या वेळीच तक्रार केली गेली असती तर पुढचा अनर्थ टळला असता. पोलिस, वकील तक्रार करायला आलेल्या मुलीला "आधी कुठे स्पर्श केला? मग काय केलं? नेमकं कुठे काय केलं?" असले प्रश्न विचारून मुलीला नको-नकोसं करून टाकतात. अश्या पोलिसांकडे मुली / बायका तक्रार करायला कश्या जातील ? समाजाच्या त्या मुलीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात पोलिस, कोर्ट मुळे सकारत्मक बदल व्हावेत - जे आज नकारात्मक होताहेत.

२) तक्रारीवर 'काम' होणं - नुसती तक्रार होऊन भागणार नाही. तक्रार केल्यावर त्यावर कार्यवाही होणं प्रचंड महत्वाचं असतं. त्याने गुन्हेगाराला धडा मिळतो, इतरांना जरब बसते आणि सामान्य नागरिकाला दिलासा मिळतो - की - आपण helpless  नाही !

म्हणजेच आमचे पोलिस तत्पर व मदत करणारे असावेत आणि आमची न्यायव्यवस्था कार्यक्षम असावी.

आता हे कसं करणार हा मोठा मुद्दा आहे ! त्यावर अनेक मतं आहेत अनेक सूचना आहेत...!
त्यावर चर्चा होऊ शकते. त्या सूचनांवर अंमलबजावणी करायला सरकारच्या पाठी लागता येऊ शकतं.

परंतु मूळ समस्येवर समाधान शोधावं…समस्येच्या लक्षणांवर नाही.

मी स्वतः 'चरित्र निर्माण म्हणजेच राष्ट्र निर्माण' ह्या वाटेवर जाउन आलोय. मी वर म्हणालो तसं "पिडणारे आपणच आणि पिडीतही आपणच" असा विश्वास राजकीय लोक आणि स्वयंघोषित विचारवंतानी आमच्या गळी उतरवलाय. माझ्यावर ही त्याचा पगडा होता - २-३ वर्ष रस्त्यावर काम केल्यावर कळालं --- भारतीय लोक फार चांगले आहेत ! जितके जास्त गरीब आणि अशिक्षित - तितके जास्त चांगले ! आजची सिस्टीम लोकांना हतबल करून टाकत आहे आणि गुन्हेगाराना आश्रय देत आहे हे वास्तव आहे.

हे माझ्या डोळ्यांनी बघितलं, स्वतः अनुभवलं म्हणून इथे बोललो.

सर्वात शेवटी - लोकांना शिस्त लावण्याची, चुकीचं वागल्यास शासन करण्याची आणि समाजाला नियमांचं पालन करायला लावून अधिकाधिक समृद्ध करण्याची जबाबदारी कुणाची असते ? सरकार आणि विचारवंतांची.  समाज दिशाहीन प्रवास कसा काय करतोय ? जर समाज भरकटत जात असेल तर कोण कमी पडतंय ? हा विचार तुम्ही आणि आम्ही करायला हवा.
जिथेजिथे कुणी स्त्रीवर अत्याचार करत असेल - तिथेतिथे - साला त्या बाईचीच चूक आहे, आपली जनरेशनच बिघडली आहे असं नं म्हणता - जो कुणी अत्याचार करतोय त्याला अद्दल घडवायला आपण सर्वांनी पुढे सरसावलं पाहिजे. सरकार कमी पडत असेल तर आपण सरकारला नीट काम करायला भाग पाडलं पाहिजे. ह्याने बाकीच्या १० जणांना जरब बसेल.

ह्याने "कायद्याचं राज्य" उभं राहील.

No comments:

Post a Comment