प्रिय सावरकरजी…आम्हांस क्षमा करा…
मूळ लेख : प्रिय सावरकरजी…आम्हांस क्षमा करा…

प्रिय सावरकरजी…आम्हांस क्षमा करा…

आज तुमच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी सभा, भाषणं घडतील. तुमच्या नावाचा जयघोष होईल. प्रतिमेला पुष्पमाला अर्पण होतील. आणि…त्यातल्या काही ठिकाणी तुमच्या नावे अर्धसत्य सांगितलं जाईल. गोलगोल - गोडगोड शब्दांत व्यक्तिपूजा पसरवली जाईल. तुमच्या विज्ञानवादी, जातीयवाद - कर्मकांड - चातुर्वर्ण्य विरोधक, अस्पृश्यतानिवारक विचारांना आणि आचारांना धूर्तपणे अंधारात ठेऊन "कामापुरते" आणि "सोईपुरते" सावरकर चर्चिले, वंदिले आणि पुजिले जातिल. इतकी वर्ष आमच्या डोळ्यादेखत तुमच्या विचारांचा, लेखांचा, भाषणांचा, ग्रंथांचा असाच सोयीस्कर गैरवापर होत गेला…आजही होईल…आणि आम्ही काहीच करू शकणार नाही…क्षमा करा…!

तुमचा भ्याड आणि गलिच्छ वापर केला गेला - गांधींना शिव्या घालण्यासाठी, आंबेडकरांना बाजूला सारण्यासाठी. आमच्या हिंदूधर्माचा, हिंदुत्वाचा हवा तसा अर्थ पसरवण्यासाठी. हिंदुधार्मियांना कृतीशिलतेपासून दूर ठेऊन व्यक्तिपूजेत गुंतवण्यासाठी. आणि तात्याराव…आम्ही काहीच केलं नाही. क्षमस्व !

धर्माभिमानी म्हणून मिरवणार्यांनी आपल्या स्व्धर्मियांना तुम्ही सांगितलेल्या विज्ञाननिष्ठेच्या मार्गावर मार्गक्रमण करूच दिलं नाही. तुमच्या भक्तीचा आव आणून तुमचे गोडवे (हव्या त्या गोष्टींचेच!) गायला लावून तुमच्या मार्गावर चालण्यापासून मोठ्या हुशारीने परावृत्त केलं गेलं. अंधश्रद्धा, पोथीपुराणप्रामाण्य, चातुर्वर्ण्य व्यवस्था, अस्पृश्यता ह्यावर कठोर आसूड ओढणारे सावरकर आमच्या समोर येउच दिले गेले नाहीत. हिंदू संघटन नसण्यामागे, आपल्या देशाच्या कमकुवत स्थितीमागे ७ बंदी हे प्रमुख कारण आहे आणि हिंदूंच्या व देशाच्या हिताचा विचार करावयाचा असेल तर ह्या ७ बंदी मोडीत काढल्या पाहिजेत हे तुमचं आग्रहाचं आणि कळकळीचं प्रतिपादन आमच्यापर्यंत पोहोचूच दिलं गेलं नाही. "गाय हा फक्त एक उपयुक्त पशु आहे!" - गायीला दैवत्व दिल्याने धर्माचं किंवा राष्ट्राचं नुकसानच झालंय हे तुम्ही कित्येक उदाहरणांनी पटवून दिलंत ! गायीचं मूत्र आणि शेण आम्हांस पवित्र वाटतं परंतु डॉ. आंबेडकरांसारख्या विद्वानाच्या हातून आम्हाला गंगाजल देखील नकोनकोसं होतं असे परखड बोलणारे वास्तववादी सावरकर - एकीकडे दुर्बल भक्ती आणि दुसरीकडे किळसवाणी जातीयता ह्या वर धारदार वाणीने हल्लाबोल करणारे सावरकर आम्हाला माहितंच नाहीत !

"आज पेशवाई असती तर ह्या समाजसुधारकांस हत्तीच्या पाई दिलं असतं" असा ठराव त्यावेळी धर्ममार्तंडांनी तुमच्या विरोधात केला होता. त्याचा तुम्ही खरपूस समाचार घेतलाच ! पण आज त्यांचीच पिल्लावळ तुमचा गैरवापर करू पहातीये - इतरांपासून - इतर हिंदूंपासून स्वतःला वेगळं आणि "उच्च" सिद्ध करण्यासाठी. आणि त्यावर आम्ही मूग गिळून गप्प बसलो आहोत. माफी असावी !

धर्माची जबाबदारी पारलौकिक सुखाच्या/लाभाच्या प्राप्तीत. इहलोकातील कार्यप्रणाली ही बुद्धीप्रामाण्यावर आधारित नियमांनुसारच असावी असं स्पष्ट मत तुम्ही वेळोवेळी दिलंत. देशाचा कारभार कुठल्याही धर्मग्रंथावर आधारित नं रहाता लोकशाही प्रक्रियेद्वारे बनलेल्या नियमांवर आधारित असावा असा उपदेश देणारे सावरकर - खऱ्या अर्थाने सेक्युलर असलेले सावरकर - आज यशस्वीपणे लुप्त केले गेले आहेत. आणि आज आमच्या समोर आणले गेलेले सावरकर सेक्युलरीझ्मला शिव्या घालणाऱ्या लोकांकडूनच वापरले जाताहेत. हे - स्वातंत्र्यवीरा - तुमचं कमी आणि आमचंच जास्त दुर्दैव आहे.

सावरकर - आज तुमच्या जयंतीच्या ह्या मंगलदिनी, एक दृढनिश्चय करतोय.
खरे सावरकर - नाही - 'सावरकर' नाही - सावरकरांचे "खरे विचार", "खरा उपदेश" आणि "त्यांची विज्ञानाधिष्ठीत कृतिशीलता" लोकांसमोर आणण्यासाठी जे जे आवश्यक आणि जे जे शक्य आहे ते सगळं शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन.

वंदेमातरम !
२८ / ०५/ २०१३

No comments:

Post a Comment