मतदार राजाला सलाम

या देशातला अशिक्षित, गरीब मतदार अतिशय सुजाणपणे मतदान करतो या सत्याची जाणीव  ही सुशिक्षित समाजाला सहसा होत नाही. हा मतदार दारू, नोटा कपडे यावर मते देतो ही सुशिक्षितांची आवडती समजूत असते. पण ही समजूत कितपत खरी आहे हे कळण्यासाठीआता आपण लोकसभेच्या निवडणुकांचा आढावा घेऊयात.

लोकसभेची पहिली निवडणूक १९५२ साली झाली त्यात कांग्रेस आणि नेहरुभोवती स्वातंत्रलढ्याचे आणि त्यागाचे वलय होते त्यामुळे कांग्रेसला  ४९० जागांपैकी ३६४ जागा मिळाल्या. समाजवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर कार्य करत असल्याने  सोशालिस्ट  पक्षाला १२, किसान मझदूर पार्टीला  ९ जागा आणि इतर समाजवादी, कम्युनिस्ट याना २३ जागा मिळाल्या.

दुसरी निवडणूक १९५७ आणि तिसरी निवडणूक १९६२ साली झाली. प. नेहृच्या नेतृत्वाखाली देशातल्या सामान्य माणसाला जाणवत होते की आपली परिस्थिती सुधारत आहे. अन्यधान्याची जी अतीव बिकट परिस्थिती १९४७ साली होती तिथून पुष्कळ सुधारणा झाली. नवनवीन कारखाने झाल्यामुळे रोजगार मिळू लागला होता. त्यामुळे या दोन निवडणुकात कांग्रेस ला ३७१ आणि ३६१ जागा ५२३ पैकी मिळाल्या.

१९६२ चे चीन युध्द आणि १९६५चे पाकिस्तान युध्द आणि १९६५/१९६६ या साली पडलेला दुष्काळ यामुळे परिस्थिती फारच बिकट झाली होती आणि सामान्य माणसाला ते पसंत नव्हते. त्यामुळे कांग्रेसच्या जागा २८३ वर घसरल्या, जनसंघ १४ वरून ३५ वर, स्वतंत्र पक्षाला ४४, सामाज्वाद्याना ४२ आणि कम्युनिस्टाना ४१ जागा मिळाल्या आणि कांग्रेसने  ९ प्रांतात विधानसभा बहुमत गमावले आणि  तेथे "संयुक्त दल " या नावाखाली विरोधी पक्षांची मंत्रीमंडळे आली.

१९७१ साली इंदिरा गांधीनी "गरिबी हटावो", बँक राष्ट्रीयीकरण, कांग्रेसचे तुकडे हे जनसामान्यापर्यंत पोचविले आणि लोकाना काही आशेचा किरण दिसला .त्यामुळे कांग्रेसला ५४५ पैकी ३५२ जागा आणि बहुतेक प्रांतात बहुमत दिले.

१९७१ चे युध्द, बगलादेशातून आलेले शरणार्थी आणि १९७३/१९७४/१९७६ या वर्षी पडलेला दुष्काळ, भयानक महागाई  त्यामुळे सामान्य  माणसाचे जगणे बिकट झाले. त्यातच  इमर्जन्सी, अटका इ. दडपशाही १९७५ ते १९७७ होती. १९७७ च्या निवडणुकीत पैसा, पोलीस, ताकत, सरकार सर्व कांग्रेसच्या कडे होते. निवडणुकीच्या ५० दिवस आधीपर्यंत विरोधी पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते तुरुंगात होते, संघावर बंदी होती. जनता पार्टी नावाचा पक्ष निवडणुकीच्या ४५ दिवस आधी ४ मुख्य विरोधी पक्षानी विलीन होऊन स्थापन केला होता, पण तरीही सामान्य मतदारांनी कांग्रेसला आणि इंदिराजीना धडा शिकवायचा हे ठरवून कांग्रेसला १५४ जागांवर आणले आणि जनता पार्टीला २९५ जागा दिल्या. स्वतः इंदिराजी आणि संजय गांधी पराभूत झाले.

त्यानंतर जनता पार्टीने २-३ वर्षे गोंधळ घातला, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता आणि महागाई वाढत होती, त्यामुळे मतदाराने इंदिरा गांधीना १९८० च्या निवडणुकीत ५४५ पैकी ३५३ जागा देऊन परत आणले आणि जनता पार्टीला ३१ जागांवर आणून धडा शिकविला.

इंदिरा गांधीनी पुढची चार वर्षे चांगला कारभार केला, ऑक्टोबर १९८४ ला त्यांची हत्या झाली आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वर झालेल्या राजीव गांधीना ५४५ पैकी ४०४ जागा देऊन आजोबा आणि आईपेक्षा मोठे यश दिले.

राजीव गांधीनी जरी इतर काही चांगल्या गोष्टी केल्या तरी महागाई वाढत गेली आणि सामान्य माणसाला ते बरोबर कळते. त्यामुळे १९८९च्या निवडणुकीत कांग्रेसला १९७ जागांवर आणून धूळ चारली आणि राजीव गांधीना बाहेरचा रस्ता दाखविला. पण कोणीच आवडले नसल्याने बहुमत कोणाला दिले नाही. जनता दल आणि व्ही.पी. सिंग, भाजपा आणि कम्युनिस्टाच्या कुबड्या घेऊन अधिकारावर आले. पुढचे दोन वर्षे कोणाचेही राज्यकारभारावर लक्ष नव्हते, महागाई वाढत गेली, मध्ये चंद्रशेखर यांचे ४ महिन्याचे विनोदी मंत्रीमंडळ येऊन गेले.

१९९१ च्या निवडणुकीत कांग्रेसच्या जागा २४४ वर गेल्या भाजपा १२० पर्यंत वाढला. पण कोणीच चांगले न वाटल्याने बहुमत कोणालाही दिले नाही. पी.व्ही.नरसिंहरावाच्या सरकारने कारभार फार चांगला केला पण नेता म्हणून जे वलय लागते ते त्याना नव्हते आणि महागाई वाढत गेली. त्यामुळे १९९६  च्या निवडणुकीत कांग्रेस १४० आणि भाजप १६१ जागा मिळाल्या आणि आशावादी मतदाराने भाजपाला निरोप पाठविला की आम्ही तुम्हाला कांग्रेसला पर्याय म्हणून देतो पण चांगले वागा, चांगला कारभार करा.

देवेगोवडा आणि गुजराल यांच्या अल्पकालीन मंत्री मंडळानंतर  १९९८ च्या निवडणुकीत आणि १९९९ च्या निवडणुकीत मतदाराने भाजपा आणि NDA ला दोन संधी दिल्या पण कोणावर ही भरोसा वाटत नसल्याने बहुमत कोणालाही दिले नाही. सामान्य माणसाला शेयर बझार आणि आर्थिक धोरणे, अणुस्फोट इ.शी काहीही मतलब नसतो. तो फक्त  भाकरी,महागाई, जुलूम, कायदा आणि सुव्यवस्था याच गोष्टी बघतो आणि भाजपा त्यात अयशस्वी नसला तरी अपेक्षाभंग करणारा ठरला. त्यामुळे २००४ ला भाजपाला बाहेरचा रस्ता दाखविला.
कांग्रेस आणि UPA याना २००४ आणि २००९ मध्ये निवडून तर दिले पण त्यांच्यावर पण फारसा भरोसा नसल्याने बहुमत त्यांनाही दिले नाही.

वरील विश्लेषणावरून हे दिसते की दारू,पैसा,ब्लान्केट इ. लोक घेतात पण जेंव्हा सरकारला बाहेरचा रस्ता दाखवायचा असतो तेंव्हा या गोष्टीने फरक पडत नाही. ही गोष्ट सुशिक्षित लोकाना कधीही कळत नाही. हेच विश्लेषण थोड्याफार फरकाने सर्व विधानसभाना ही लागू पडते जसे मोदीं आणि नितेशकुमार हे केवळ त्यांच्या कामाने मुख्यमंत्री पुन्हा निवडून आले. मोदींच्या विरुध्द इतकी कोल्हेकुई चालू असताना त्यांचे काम [हिंदुत्व नव्हे] बघून त्याना पुन्हा निवडून दिले.

वाढत्या महागाईने कांग्रेस २०१४ ची निवडणूक जबरदस्त  हारणार हे स्पष्टच होतं पण भाजपाला मोदीना नेता म्हणून २०१२ पासून मतदारापर्यंत पोचवावे लागलं. महात्मा गांधीनी भावी पंतप्रधान म्हणून प. नेहरुना १९४० पासून लोकांसमोर ठेवले तेच भाजपाला करणे जरुरी होते. आणि ते भाजपने व्यवस्थित केलं.

===

मूळ लेख श्री अजित पिंपळखरे सरांचा आहे. किरकोळ बदल करून इथे टाकत आहे. संपूर्ण श्रेय अजित सरांचं!

No comments:

Post a Comment