गणेशोत्सव का भरकटला?

आत्ताच आमच्या एरियातल्या गणेश मंडळाची टीम आली होती. "कमीत कमी" अमुक अमुक वर्गणी द्याच म्हणे. मी विचारलं नेमकी कुठली समाजकार्य करता आपण - नो आन्सर. तरी कंपल्सरी वर्गणी द्याच म्हणत होते. मी आणखी प्रश्न विचारले तर...'इतकी कीचकीच करणारे तुम्हीच पहिले आहात'...असं म्हणून निघून गेले !
गणपती बाप्पा मोरया!

गणेशोत्सवाच्या दरम्यान गणेश मंडळ जो काही असंस्कृत उच्छाद मांडतात, त्यात दरवर्षी भर पडत चालली आहे. ह्याने ना धर्माचं भलं होतंय, न समाजाचं...ना समाजाच्या अध्यात्मिक बैठकीचं. पण गणेशमंडळांना दोष देऊन, त्यांना नावं ठेऊन भागणार नाही. हे असं का होतंय, असं कसं झालं, कुठून सुरुवात झाली...ह्याचा विचार करून आपण सर्वांनी - विविध स्तरातल्या, विचारधारेच्या - सर्वानीच प्रयत्न करायला हवेत. मन लाऊन. सकारात्मक दृष्टीने.

स्वातंत्र्यापूर्वी टिळकांनी प्रखर राष्ट्रवादी हेतूने सुरु केलेला हा उत्सव स्वातंत्र्यानंतर आपोआपच राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या विळख्यात सापडला. सुरुवातीला देशप्रेमी, समाजसेवक असलेले राजकीय नेते हळूहळू "स्वयं"सेवक झाले. जिथे जिथे स्वतःची पकड मिळवता येईल, ताकद वाढवता येईल तिथे तिथे त्यांनी आपली मुळं रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव त्यातलाच एक बळी.

जिथे तरुणांनी एकत्र येऊन 'उद्याचा भारत कसा असायला हवा' ह्याची चर्चा करणं अपेक्षित होतं तिथे 'कोणता साहेब मोठा' आणि 'कुणी किती वर्गणी दिली' ह्यावर brainstorming व्हायला लागलं. --- खरंतर इथेच ह्या ग्रुप्सच्या म्होरक्यांनी दिशादर्शक बनून तरुणांना ताळ्यावर आणायला हवं होतं. पण म्होरक्यांनीच तरुण टाळकी भरकटवायची, असं ठरवल्यावर काय होणार?

जरा इतिहास बघितला, डोकं वापरलं तर घटनांचा हा सिक्वेन्स कुणाच्याही सहज लक्षात येईल. आणि मग - आज गणेशोत्सवाची जी काही वाताहत झालीये तिला नेमकं जबाबदार कोण, हा सगळा दोष तरुणांचाच आहे का, की तरुणांना सुसंस्कृत करण्यात - ठेवण्यात - आमची सिव्हील सोसायटी कमी पडलीये, आमच्या डोळ्यादेखत आमची पोरं वाया जात होती आणि आम्ही 'आमच्या काळी हे असं नव्हतं' एवढंच बोलण्यात धन्यता मानली --- ही प्रश्नावली जन्मेल. अश्या प्रश्नांना उत्तरं सहज मिळतात - पण ती पचवायला सहज नसतात. बोचरे असतात. कदाचित म्हणूनच केवळ गणेशोत्सवाला शिव्या घालून गप्प बसण्यातच लोक धन्यता मानतात. स्वतःची जबाबदारी टाळतात.

असो. हा लेखनप्रपंच दोषारोपणची पुढची पायरी गाठण्यासाठी नाही --- आता काय करायला हवं --- ह्यावर विचार करण्यासाठी आहे.

ज्यांना कुणाला गणपती मंडळांचा गोंगाट असह्य होतोय, ह्याने निर्माण होणारे सार्वजनिक सुरक्षिततेचे प्रश्न भेडसावताहेत, प्रदूषण-सांस्कृतीक हनन बेचैन करताहेत...त्यांनी सर्वांनी कंबरकसावी --- पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव चांगला करण्याची! आपल्या आजूबाजूचे १-२ गणेशमंडळ हेरून काढा, त्यांच्या संयोजक/देणगीदारांशी संपर्क साधा --- बदल घडवून आणा.

सार्वजनिक गणेशोत्सव आपल्या मूळ रस्त्यावरून भरकटला आहे हे सर्वाना माहित आहे. परत परत त्यावर आरडाओरडा करून, पोस्ट्स/कमेंट्स/tweets करून काहीच साध्य होत नाही. परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करा.

गणपती बाप्पा मोरया !

No comments:

Post a Comment