संघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारतसदर लेख महाराष्ट्र टाईम्सच्या दिनांक ७ सप्टेंबर २०१४ च्या रविवार विशेष - संवाद - ह्या पुरवणी मध्ये प्रसिद्ध झाला आहे. (लिंक) मूळ लेख कदाचित जागेच्या कमतरतेमुळे संपूर्ण प्रसिद्ध झाला नाही. म्हणून इथे ब्लॉगवर पोस्ट करत आहे.
= = =

१७ ऑगस्टच्या 'संवाद'मध्ये प्रकाशित झालेले विहिंपवरचे दोन लेख आणि त्यावर २४ ऑगस्ट रोजी आलेली प्रकाश बाळ ह्यांची प्रतिक्रिया गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या 'संघ आणि संघाच्या पुत्र संघटना' ह्यावर दोन्ही बाजूनी थोडक्यात प्रकाश टाकणाऱ्या आहेत. बाळसरांची प्रतिक्रीया म्हणजे संघाच्या 'हिंदू', 'हिंदूराष्ट्र', 'भारतीय म्हणजेच हिंदू' इ भूमिकांवर उत्तम टिपणी आहे. बाळ सरांचा लेख, त्याआधीचे सहस्रबुद्धे आणि पतंगेसरांचे लेख ह्यांचा ३ अंगाने विचार करायला हवा.

संघ आणि 'हिंदुराष्ट्र' व 'भारतीय = हिंदू' नावाचं गौडबंगाल
बाळ सरांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर, त्यांनी गोळवलकरगुरुजींच्या 'आम्ही कोण' पुस्तकातील उद्धृत केलेल्या प्रत्येक उतार्यावर उपस्थित केलेल्या प्रत्येक आपत्तीवर संघ, विहिंप आणि इतर संघटना ठरलेली दोन साचेबद्ध उत्तरं देतील. एक - 'हिंदुनी कधीही कुणावर अत्याचार केले नाहीत, आमची संस्कृती आक्रमकांची/हिंसेची कधीच नव्हती आणि आजही नाही, आम्ही नेहेमीच सर्वसमावेशक होतो आणि राहू' हा युक्तिवाद. हे सांगण्यामागे हेतू - 'आमचं हिंदुराष्ट्रदेखील असंच असेल' हे पटवून देणं. मुळात जर खरंच हिंदू नेहेमीच सहिष्णू होते आणि पुढेही राहणार असतील तर मग आजच्या भारतात, घटनेनुसार बांधल्या गेलेल्या सवर्समावेशकतेच्या चौकटीत राहायला काय हरकत आहे? सध्या भारतात अस्तित्वात असलेले स्युडो-सेक्युलरीझमचे अंग हे काही घटनेचा दोष नाहीत. व्यवस्थेतले कच्चे दुवे ओळखून राज्यकर्त्यांनी पोसलेले ते प्रश्न आहेत. ते केवळ नावापुरतं 'हिंदूराष्ट्र' उभारल्याने कसे सुटतील? आम आदमीच्या पोटापाण्याच्या समस्या भारतात आहेत तश्याच हिंदूराष्ट्रात राहणार नाहीत हे कशावरून? असल्या कुठल्याच प्रश्नांना ठोस उत्तर नं देता 'आपण सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली तर देश आणि राष्ट्र सशक्त होतील' अशी गोलमटोल उत्तरं दिली जातात. मग परत - आपापली जबाबदारी पार पाडायला भारतात कुणी अडवलंय? हिंदुराष्ट्र कशासाठी हवंय? असो. ह्या लेखाचा उद्देश 'हिंदुराष्ट्र' नाहीये त्यामुळे ह्यावर अधिक खोलात नं जाता इतकंच नमूद करायला हवं की सरतेशेवटी ह्या सगळ्या संकल्पना कट्टरवादावर म्हणजेच हिंदूधर्मियांच्या वर्चस्वाला प्रस्थापित करण्यावरच येऊन थांबतात.

दुसरं उत्तर आहे - 'आमच्या लेखी भारतीय हाच हिंदू आहे'. ही एक अत्यंत उत्कृष्ट खेळी आहे. जर आमच्या भाष्य, लेखन, कृती कश्यावरही प्रश्न विचारले गेले, धार्मिक कट्टरपंथीय असल्याचा आरोप झाला तर लगेचच - इथे धर्माचा नसून राष्ट्रीयत्वाचा संबंध आहे असं म्हणायचं. किंवा फारच झालं तर 'रिलीजन आणि धर्म ह्यात फरक आहे. क्रिश्चन, इस्लाम हे रिलीजन आहेत. सनातन हिंदू हा धर्म आहे' असलं काहीतरी गूढ ज्ञान समोर आणायचं. ह्यावरून, भारताला/हिंदुस्थानला पुण्यभू, पितृभू, मातृभू समजणारे सगळे हिंदूच हे सांगायचं. मग तुम्ही कितीही पापभीरु असा, कायद्याला मानणारे असा - हा हिंदुस्थान वंदनीय आहे असं माना - तसं नसेल तर तुम्ही हिंदू नाहीत. तसं नसेल तर इथल्या मातीशी, संस्कृतीशी तुमची बांधिलकी नाही. जेव्हा जेव्हा संघ, विहिंप इ वर धर्मांधतेचे आरोप होतात तेव्हा तेव्हा हेच उत्तर दिलं जातं. आणि मग 'आम्हाला स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचं नाहीये' असं म्हणायचा हिंदूराष्ट्रवासियांचा अधिकार संपुष्टात येतो. कारण तुमचं रिलीजन कुठलंका असेना - आम्ही तुम्हा हिंदूधर्मीय म्हटलं आहे! तुम्हाला ह्यावर इच्छा प्रदर्शित करायचा हक्क नाहीये. धर्म आणि रिलीजन ह्या गोष्टी भिन्न आहेत हे आम्हीच ठरवलंय. इस्लाम, क्रिश्चन हे साधे 'पंथ' म्हणजेच रिलीजन आहेत आणि हिंदू हा एक विशाल महान धर्म आहे हेही आम्हीच ठरवलं आहे. तुम्ही काहीही बोला...आम्ही असंच समजणार! मूळ गोम इथे आहे - नागरिकाला स्वतःचं रिलीजन की धर्म की आणखी काय ठरवण्याचा अधिकारच इथे अदृश्य होतो. तेही बेमालूमपणे! आणि म्हणूनच गांधींचा खरा सर्वसमावेशक हिंदूधर्म कट्टर भगवा होऊन जातो.

प्रकाश बाळ सरांचा लेखाचा शेवटी उपस्थित केले प्रश्न - हिंदुना "असा" देश हवा आहे काय?

असा कट्टर देश हिंदुना नेहेमी नकोच होता. आजही नकोच आहे. आणि ह्यापुढेही नकोच असेल. दुर्दैवाने हिंदुना असा देश नको असूनही भाजपला बहुमत द्यावं लागलं. ज्याच्या तीन प्रमुख कारणांपैकी एक कारण स्वतः बाळ सरांनीच सांगितलं आहे - 'हिंदुत्ववादाच्या विरोधकांची राजकीय दिवाळखोरी'. दुसरं कारण आहे - सेक्युलरीझमच्या नावाखाली चाललेला धार्मिक राज्यकारभार आणि तिसरं आहे - केवळ सदोष शासन यंत्रणेमुळे मोठे होत असलेले आतंकवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न. ह्या शेवटच्या दोन कारणांमुळेच हिंदुत्ववादाच्या विचाराची मूळं भारतात रुजली. तरुण हिंदू कट्टर होत गेले. सर्वसमावेशकतेपासून दूर हटले.

हिंदुत्व का रुजलं?

संघ आणि संघाच्या पुत्रसंघटना अनेक समाजोपयोगी कार्य करतात. देशासमोर उभी राहिलेली कुठलीही आपत्ती असो - संघ तिथे सर्वप्रथम पोहोचतो. आणि हे सगळं अगदी बिनबोभाट होतं. पण संघ ओळखला गेला, ओळखला जातो आणि रुजतो - तो 'हिंदुत्व' ह्या मुद्द्यावर. अनेक तरुण आजूबाजूच्या समस्यांचा डोंगर बघत लहानाचे मोठे होतात. जात-धर्मच्या आधारावर चालू असलेलं शासन बघतात. आणि त्याचवेळी पाकिस्तान, भारतात होत असलेले आतंकवादी कृत्य, ISISसारखा मधेच उभा राहणारा आंतरराष्ट्रीय राक्षस बघतात. शिवाय वाढत असलेला क्रिश्चनधर्म, मिशनरीसंस्थांकडून धर्मार्थ कार्याच्या जोडीने होणारा धर्मप्रसार, केरळसारख्या राज्यात दर २००-३०० मीटरवर दिसणारे चर्च, एका आदिवासी देवतेचा मदर मेरीसारखा केला जाणारा पेहराव...ह्याने देखील बिचकतात. माहिती तंत्रज्ञानामुळे जगभरात घडत असलेल्या घटना - घटनांची पार्श्वभूमी सहज कळायला लागली आहे. त्यामुळे "भारताचं पुढे कसं होणार?" हा प्रश्न आम्हा तरुणांना खूप सतावतोय. बांगलादेशी घुसखोर इथे येतात काय, बस्तान बसवतात काय, इथल्या हिंसक कृत्यांमध्ये सहभाग घेतात काय...सगळंच भयावह.

वास्तविक पाहता ह्या समस्या सरकार सोडवू शकतं. यंत्रणा सक्षम करून देश सुरक्षित आणि शांत केला जाऊ शकतो. धर्मप्रचाराच्या आडून इतर धर्मांवर वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतील - किंवा असे प्रयत्न होत आहेत असा आभास निर्माण केल्या जात असेल तर त्यावर लगाम लावता येऊ शकतो. पण सरकार हे करत नाहीये. त्यामुळे जखम चिघळत जाते आणि मग हताश मन कट्टर बनतं. कट्टर हिंदुत्व असं रुजतं.

देशाला संघ, हिंदुत्व आवश्यक आहे की नाही, ह्या संघटना, ही तत्व योग्य आहेत की नाहीत - हे चर्चेचे आणि वादाचे विषय ठरू शकतात. पण धर्मांधता - मग हिंदूंची असो की इतर कुणाची - ती ह्या देशात रुजू नये - ह्यावर एकमत व्हावं आणि विचारी, सुसंस्कृत नागरिकांनी योग्य तो मार्ग निवडावा. हाच उद्याचा सुदृढ, सशक्त आणि सर्वसमावेशक भारत बांधण्याचा मार्ग आहे.

No comments:

Post a Comment