जातीभेदाच्या अंताकडे – दुसरं पाउल

“सत्यमेव जयते”च्या पहिल्या सिझन मध्ये, स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात कुठला तरी एपिसोड होता. त्यात एक कार्यकर्त्या महिला आल्या होत्या. त्यांनी आमीर खानला विचारलं:

“पितृसत्ताक च्या विरुद्ध काय?”
आमीर म्हणतो, “मातृसत्ताक!”

“इथेच तर आपण गल्लत करतो!”, त्या महिला म्हणाल्या. “पितृसत्ताक पद्धतीचा विरोध करणारे, समानतावादी लोक मागणी करताहेत ती “समानतेची”. म्हणजेच “कुणाचीच सत्ता नसणं”, “दोघेही समान असणं” ! म्हणून “पितृसत्ताक”च्या विरुद्ध “मातृसत्ताक” नसून “समानता” हे आहे.”

सुपर्ब थॉट होता !

आपल्या देशातली समानतेची “लढाई” असंच काहीसं रूप घेतीये. कालचे नाडले गेलेले “आता आमची पाळी!” असं म्हणू लागले तर हरलो आम्ही ही लढाई ! “सगळे दलित निकृष्ट” हा विचार जितका हिणकस आणि किळसवाणा आहे तितकाच “सगळे सवर्ण वाईट” हा विचार धोकादायक आहे. ह्याने एक विषमता जाऊन दुसर्या विषमतेची सुरुवात होते.

जातीभेद, अस्पृश्यता हा आमच्या कडचा खूप मोठा दुर्गुण आहे. ह्याचा इतिहास, भूगोल बर्यापैकी सर्वाना माहित आहे. स्वातंत्र्य संग्रामात, त्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय धुरंधर ह्यावर बोलते झाले, त्याविरुद्ध जमेल तसं लढले. डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना तयार झाली, आरक्षण सारख्या उपायांची अमलबजावणी झाली आणि हळू हळू फरक पडायला लागला - किमान पिचलेल्या, दुर्लक्षित लोकांना संधी मिळणं सुरु झालं. प्रश्न हा होता/आहे की एवढं पुरेसं आहे का? सरकारने काही नियम/कायदे करून हे सगळं मिटेल का? तथाकथित "उच्च" जाती स्वतःच्या मनातला अहंगंड केवळ सरकारी बडग्यामुळे सोडतील का? रंजल्या-गांजल्या लोकांच्या मनातला विद्रोही डोह केवळ ह्यानेच शमेल का? --- की आणखी काही करायला हवं?

मी गेली ३-४ वर्ष राजकीय आणि सामजिक विचारवंत/कार्यकर्ते इ शी चर्चा करतोय...जमेल तसं त्यांच्याकडून समजाऊन घेतोय. समस्येचं इतिहासातलं भीषण स्वरूप आणि आजचं त्याचं नवीन स्वरूप - ह्यात बरीच तफावत आहे. तेव्हाची समस्या जटील होती - पण त्यातले दोषी स्पष्ट होते, त्यामुळे उपाय करणं शक्य होतं. आज समस्या निर्माण करणारे दोन्ही बाजूचे आहेत - आणि म्हणून "खर्या" समानता-वादी लोकांची तारेवरची कसरत आहे!

आज "आम्हांस माज आहे अमुक अमुक असल्याचा" ही भावना केवळ तथाकथित सवर्ण वर्गापुरती राहिली नाहीये. "जातीय अस्मिता" समाजाच्या तळागाळातील वर्गापर्यंत पोहोचली आहे. आणि हे लोकांनी नाही, तर स्वार्थी नेत्यांनी शिस्तशीर रित्या घडवून आणलं आहे. सार्वजनिक जीवनात जातीचा प्रभाव पूर्वी जेवढा स्पष्ट आणि रोखठोक होता तेवढा आता राहिला नाहीये ही पहिली मोठी झेप आपण घेतली आहे. पण जात अजूनही छुपा प्रभाव टिकवून आहे. आणि हे तथाकथित "वरचे" आणि तथाकथित "खालचे" दोघेही करताहेत. अजूनही "मारवाडी म्हणजे कंजूष", "बामन म्हणजे कपटी" छाप stereotyping घराघरातून, कट्ट्यावरून चालूच आहे. तसंच "रिझर्वेशन आल्यापासून शिक्षण, आरोग्य सेवांची पार वाट लागली बघा! ह्या खालच्यांना घ्यायलाच नको होतं!" अशी वाक्यही ऐकू येतातच. म्हणजेच आज वणवा जरी नसला तरी जातीय-भेदभावाचा अंगार दोन्हीकडे आहे. त्याला कुणी केवळ फुंकर घालायचा अवकाश - आणि भडका उडेल !

ह्यावर उपाय काय?
आपल्या समाजाला जातीयवादाने पोखरलं आहे - ही काळजी व्यक्त करणारे अनेक आहेत. त्यातले बहुतांश, विशेषतः 'सवर्ण', केवळ काळजीच व्यक्त करतात असा माझा अनुभव आहे. अर्थात, फक्त काळजी व्यक्त करतात म्हणजे ती काळजी खोटी आहे किंवा ते लोक केवळ बोलण्यापुरतेच जातीयवादाचे विरोधक आहेत अन मनातून जातीयवादी - असंही नाही. ते ठरवणारा मी कोण?! माझा मुद्दा वेगळा आहे.
जातीयवाद - मग तो कुणी का करेना - केवळ बोलण्याने, प्रबोधनाने थांबेल? संपेल? हा खरा प्रश्न आहे. 'आपण अमुक अमुक थांबवूया, आपल्यापुरतं अमुक अमुक करूया' हा अप्रोच जातीयवाद कमी करण्यास लाभदायक कसा ठरू शकतो?

आज जातीयवाद 'दोन्ही'कडून होतोय हे सत्य आहे. त्या मागे कारण आहे दोन्हीकडील "पुढारी" त्या त्या बाजूच्या जनतेवर टाकत असलेला नकारार्थी प्रभाव. ह्या प्रभावामुळे दोन्हीकडील जनतेमध्ये दरी पडत जातीये - वाढत जातीये. आजच्या जातीवादाचं हे मूळ जरी नसलं - जातीवादाचं मूळ "भ्रष्ट आणि भाऊ-बंदकी असलेली यंत्रणा" हे जरी असलं तरी त्याचं व्यक्त/अव्यक्त स्वरूप हेच आहे.

सगळ्याच जणांना सध्याच्या व्यवस्थेविरुद्ध लढणं शक्य नाही - पण जर आजचा जातीवाद कमी व्हावा असं - खरंच - वाटत असेल तर दोन्ही बाजूंमधील अंतर कमी करायचे, दोन्ही बाजूंच्या मध्ये एक दुवा तयार करण्याचे, एखादा सुसंवादरुपी पूल बांधण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. हे करायची इच्छा आमच्या लोकांची आहे का?

जितके जास्त मराठा, ब्राह्मण, मारवाडी, जैन इ लोक आंबेडकरी चळवळीत सहभागी होतील, जितके जास्त बहुजन नेते (खऱ्या अर्थाने नेते) 'सवर्ण' लोकांशी त्यांच्या समस्यांबद्दल संवाद साधायला लागतील आणि - ह्या विषयांवर जितका स्पष्ट, मनमोकळा संवाद ऑफिस, कॉलेज, चहाच्या टपऱ्या इ ठिकाणी व्हायला लागेल --- तितक्या गतीने हा विषय, हा लढा सर्वांच्या आत्मीयतेचा विषय बनेल...जातीयवाद हा वाद नं राहता सलोखा बनेल.

फक्त प्रश्न "सोडवायची" इच्छा तेवढी हवी...चिघळत ठेवून आपापली पोळी भाजण्याची नव्हे !

म्हणूनच - वर म्हटल्याप्रमाणे - समानतेच्या लढवय्यांची आज खरी कसरत आहे ! आजूबाजूला माजलेल्या भ्रष्टाचार, सुमार दर्जाच्या सरकारी सुविधा, सगळीकडे माजलेला सावळागोंधळ हा "आरक्षण"मुळे झालाय असा समझ मुद्दाम पसरवला जातोय - तो आपण थांबायला हवा. हे सगळं होतंय कारण “सिस्टीम” कमकुवत आहे, किंबवूना सिस्टीम कमकुवत ठेवली गेलीये – हे लोकांना नीट कळायला हवं. आपण ते सांगायला हवं. तसंच “आरक्षण”आजही फार आवश्यक आहे – अजूनही अनेक लोकांना “सामाजिक समानता” मिळायची आहे. आरक्षणाचे लाभ खर्या गरजूंना मिळत नाहीयेत, ते मिळण्यासाठी काही सुधारणा आवश्यक आहेत खर्या पण जाती-आधारित आरक्षण ही खरोखर गरज आहे, हेही “सर्वाना” समजावून सांगायला हवं. एकीकडे हिंदू धर्माचा किंवा “भारतीय”असल्याचा अभिमान आहे असं म्हणणारे आपल्याच हिंदू/भारतीय बांधवांवर 'ह्यांची लायकीच नाही' अशी डूख धरून बसलेले असतील तर त्यांचं हिंदू-प्रेम कसं दुटप्पी आहे हे - सौम्यपणे, समजेल अश्या स्वरुपात सांगणं आणि त्याचवेळी, तितक्याच पोटतिडकीने "सगळे बामन हरामखोर" छाप प्रचाराला लगाम घालत - "इतिहास बाजूला ठेऊया,'आज' कोण वाईट आहे?", "आज कुठे जातीभेद चालू आहे का?", "चला आपण सगळे मिळून जातिभेदाचा नायनाट करू" अशी भूमिका घेत रहाणं - हे आजच्या समानतेच्या पुरस्कर्त्यांनी करणं आवश्यक आहे.

अनेक दशकांपूर्वी जातीभेद कसा होता, भट-ब्राह्मण कसे वाईट होते, जहागीरदार-वतनदार कसे निष्ठुर आणि क्रूर होते, त्यांनीच कशी पाटीलकी गाजवली हा इतिहास अभ्यासायला काही हरकत नाही. पण तो "इतिहास" आहे हे उमगून घेतलं आणि - त्या इतिहासातल्या समस्येचं वर्तमानात स्वरूप कसं आहे - हे समजून घेतलं तर आणि तरच भविष्यात कुठली गफलत होणार नाही.
अन्यथा एक विषमता संपून दुसर्या विषमतेला आपण जन्म घालू. आग विझवायला पाणीच लागतं - दुसरी आग नाही !

No comments:

Post a Comment