श्री शिवछत्रपती प्रार्थना

शिवबा जन्म रे पुन्हा, व्यापुनि घे चराचारी
शिवबा जन्म घे पुन्हा, प्रकट माझिया ऊरी

दुमदुमली होती जेव्हा परकीय शस्त्रे
दुभंगली होती जेव्हा स्वकीय मनवस्त्रे
"आलो आलो" म्हणुनी राखिलीस तू लाज
तितुकीच निकड बा आहे स्वराज्यी आज
ये रे ये रे शिवबा वाचविण्या स्वदेशा
स्वकिंयांचेच गनीम बाटविती दशदिशा

सुखविण्या हा मावळ,  उंचविण्या सह्याद्री
शिवबा जन्म घे पुन्हा...प्रकट माझिया ऊरी

ऐक वर्तमान गाथा, सांगतो सांप्रत अवस्था
तरीच तुज कळेल तव बछड्याची व्यथा
'मराठे सैन्य' नं उरले, उरल्या फक्त जाती
तव ज्ञानामृत विरले, उरले फक्त पुतळे अन मूर्ती
'सुशासन' बदलून झाले 'समग्र राज्यकारण'
तरीच तव प्रजा, सदोदित पराभूत दारुण

साक्षात तूला देखील हे मूढ...जाती-धर्मात चिरी !
शिवबा जन्म घे पुन्हा...प्रकट माझिया ऊरी

चिडलास का राजसा? 'किती लढू?' पुससी मज!?
समजून घे की राजा...नको काढूस माझी लाज...
शरीराने नको जन्मूस बा...नको उचलूस तलवार
मी ते करीन शिवबा...फक्त आशिर्वाद दे अपरंपार
प्राशूदे तव ज्ञानामृत, हो स्थापित रक्तात
भिनु दे गनिमीकावा, ह्या कट्टर शिवभक्तात

तव तेजकण दे मज...बनूदे सेवेच्या 'लायक' तरी
नको जन्मूस शरीराने अन नको शेजाऱ्याच्या घरी
शिवबा जन्म रे पुन्हा, व्यापुनि घे चराचारी
शिवबा जन्म घे पुन्हा...प्रकट माझिया ऊरी

©ओंकार दाभाडकर

No comments:

Post a Comment