सलमान खान, न्याययंत्रणेचं "being human" आणि धर्मराज युधिष्ठीराचं न्यायदा

सलमान केसवर लिहायची अजिबात इच्छा/गरज नाही. पण एक सुचवावंसं वाटतं की झाल्या प्रकाराने फक्त व्यथित नं होता, ह्या प्रसंगाचा विचारी, सजग नागरिकांनी संधीसारखा उपयोग करावा. आपली न्याय यंत्रणा कशी आहे, परदेशांत कशी आहे - नेमका काय फरक आहे, कुठली अधिक लोकाभिमुख, अधिक पारदर्शक, अधिक न्यायी आहे ह्याचा अभ्यास करावा आणि आवश्यक ते बदल - हळू हळू का असेनात - भारतात कसे लागू करता येतील ह्यावर विचारविनिमय करावा. जे घडलंय, घडत आहे ते बघून मन विषण्ण होतंय. पण ही विषण्ण अवस्था झटकून बदल घडवून आणण्याची उर्मी मनात बाणवली तर पुढच्या पिढीचे (किंवा त्याही पुढच्या पिढीचे) असे हाल होणार नाहीत.

ही केस केवळ सलमान केस म्हणून नं बघता, अश्या केसेसमध्ये न्यायदान कुठल्या भूमिकेतून व्हावं, कायद्यांचा रोख कसा असावा ह्यावर आपण विचार करायला हवा. ह्या केसवर दोन विचार प्रामुख्याने व्यक्त होत आहेत -

१) सलमान निर्दोष असू शकतो. केवळ एका पोलिस बॉडीगार्डच्या साक्षीवर सलमानच गाडी चालवत होता असं गृहीत धरणं किती संयुक्तिक आहे ?
२) सलमान सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला वेगळे मापदंड, अधिक कडक शासनाची अपेक्षा कशी काय करू शकतात लोक ?

सर्वप्रथम - सलमान निर्दोष "अजिबात" नाही. Hit and run केस मधे "run" हा hit पेक्षा कितीतरी अधिक गंभीर गुन्हा आहे. सलमान "चालक" होता की नाही हा खरं तर वादाचा मुद्दाच नको ! अपघात घडल्यावर सलमान पळून गेला, तेव्हा गोंधळून जाउन पळाला असं मानलं तरी त्यानंतरसुद्धा पुढे आला नाही --- हा अपघातापेक्षा मोठा गुन्हा मानला जावा. तिथेच, Salman has failed in "being a human" हे सिद्ध होतं. आणि तिथेच तो आपल्या समोर गुन्हेगार ठरतो. पुढे १३ वर्ष केस ढकलणे, साक्षीदाराची कोंडी करणे, ब्लॉग लिहिणाऱ्याला धमकावून ब्लॉग पोस्ट काढायला लावणे --- ह्या गोष्टीसुद्धा निर्विवाद human being ला शोभणाऱ्या नाहीतच. आणि म्हणून गाडी कोण चालवत होतं, चालवणारा दारू पिऊन चावत होता की नाही हे फारच गौण मुद्दे ठरतात. किमान मानवतेच्या, humanityच्या न्यायासनासमोर तरी.

अश्या परिस्थितीत, न्याय यंत्रणा नेमकं काय बघून काम करत असावी? केवळ कागदावर छापलेल्या ओळींच्या interpretation वर न्याय व्हावा का? इथे "केस" चालवावी ती फक्त अपघातावरच नाही, तर अपघातानंतर लगेच पळून जाऊन केलेल्या आणि पुढे १३ वर्ष रोज जाणूनबुजून केलेल्या अगणित गुन्ह्यांवर. न्यायाधीश हे सगळं विचारात घेऊ शकत नाही का? हे सगळं आपल्यासारखा साधा माणूस विचारू शकतो तर उच्च विद्याविभूषित वकील विचारू शकत नाहीत का? --- आणि --- जर सामान्य माणसाचे हे प्रश्न विचारले जात नसतील, "मानवतेच्या" दृष्टीने न्यायदान होणार नसेल --- तर न्याय यंत्रणेला अधिक humanitarian करण्यासाठी आपण, सुजाण नागरिकांनी कुठला सनदशीर मार्ग अवलंबावा? हा विचार आपण सर्वांनीच ह्या निमित्ताने करायला हवा.

दुसरा प्रश्न - "सलमान खान"ची केस आहे म्हणून एवढा गहजब का केला जावा - तो सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला वेगळे मापदंड आणि इतर लोकांना वेगळे --- असं का असावं?
हा सुद्धा विचारवंतांसाठी चर्चेचा मुद्दा व्हावा ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. गुन्हेगार हा सामाजिक, राजकीय, आर्थिक दृष्ट्या जितका मोठा असेल तितकं जास्त कठोर शासन त्यावर व्हायला हवं. कारण ह्यातूनच सामाजिक संस्कार होत असतात. आपण जेवढे प्रगतीशील होऊ तेवढे जास्त जागरूक व जबाबदार व्हायला हवं हे प्रेशर ह्यातून येत असतं. आणि हे फार पूर्वीपासून असंच चालत आलं आहे. अलीकडे "समानता समानता" म्हणताना आपण अनेक समाजशास्त्रीय नियम विसरून गेलो आहोत. ह्या निमित्ताने महाभारतातील एक गोष्ट आठवली.

राजसभेत एक केस चालू आहे. चार वर्णाचे खूनी समोर आहेत, चौघेही खूनी आहेत हे नक्की आहे. फक्त चौघांना शिक्षा कुठली द्यावी ह्यावर निर्णय बाकी आहे. विदुर सुचवतात की पुढे जाऊन दुर्योधन किंवा युधिष्ठीर राज्य करणार आहेत, त्यांचं मत जाणून घेऊ, कळेल ते दोघं शासन करणं किती जाणतात. दुर्योधन चौघांना सारखीच शिक्षा करून मोकळा होतो. परंतु युधिष्ठीर - शूद्राला सर्वात कमी शिक्षा देतो, वैश्याला त्याहून अधिक, क्षत्रियाला आणखी जास्त तर ब्राह्मणाला - मृत्यूदंड ! ब्राह्मणाला एवढं कठोर शासन करण्याचं कारण सांगतो - ब्राह्मण ज्ञानी, आदरणीय आणि अनुकरणीय असायला हवा. हत्या हे महत्पाप तर आहेच शिवाय सामाजिक अस्थिरतेचं जन्मस्थान ही आहे. ब्राह्मण हे सगळं चांगलंच जाणून असतो. असं असूनही हत्येचं कृत्य त्याने केलं तर त्याला सर्वात कठोर शासन व्हायला हवं. ब्राह्मणाला समाजात एक मानाचं स्थान आहे, सर्व लोक त्याला ओळखतात. त्यामुळे त्याला दिल्या गेलेल्या शिक्षेतून सर्व समाजात एक कडक संदेश जातो --- हा संदेश फार महत्वाचा आहे.

आजच्या गुंतागुंतीच्या समाजव्यवस्थेमधे युधिष्ठीराचा निवाडा ततोतंत अमलात आणणं अशक्य आहे. पण न्याय निवाडा कसा व्हावा ह्यासाठी एक दिशादर्शक म्हणून हे उदाहरण वापरायलाच हवं.

सलमान खानसारख्या प्रकरणात अनेक कठोर निर्णय घेऊन समाजात सकारात्मक बदलांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती होऊ शकते. पाश्चात्य लोक किती शिस्तशीर आहेत ह्याचं कौतूक आपण नेहमी करतो/ऐकतो. ही शिस्त ज्या कठोर यंत्रणेमुळे लागते, त्या यंत्रणेचा अभ्यास करून योग्य आणि शक्य ते सर्वकाही भारतात लागू करणं ही पुढील पिढ्यांसाठी अधिक न्यायी व्यवस्था निर्माण करण्याची पहिली पायरी असेल.

ही पहिली पायरी चढण्याची तयारी आपण करुया का?

No comments:

Post a Comment