आर्यन इन्व्हेजन थेओरी आणि "जैन" पावभाजी

नुकतीच "भारत एक खोज" ही मालिका बघायला सुरुवात केलीये. तिसरा एपिसोड बघुन झालाय. दुसऱ्या भागापासून 'बाहेरून आलेल्या' लोकांनी सिंधू संस्कृती कशी अतिक्रमित केली, त्यांनी इथल्या काही प्रथा कश्या आत्मसात केल्या, त्यांच्या काही प्रथांचा पायंडा कसा पडला आणि त्यातून कश्या प्रकारे 'भारतीय संस्कृती' तयार झाली ह्यावर भाष्य सुरु आहे. हे भाष्य आरोप-प्रत्यारोपाच्या रुपात नसून केवळ इतिहास कथन करण्याच्या आणि आजच्या भारताची 'खोज' करण्याच्या हेतूने आहे. त्यामुळे हयात objectionable असं काही वाटत नाही.

माझा ह्या आर्यन इन्व्हेजन थेओरीचा अभ्यास फारसा नाही. अगदी 'अजिबात नाही' असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. मुळात इतिहासात मला असलेला रस खरं-खोटं करण्यापेक्षा 'धडा शिकण्या'च्या हेतूने जास्त आहे. त्यामुळे आर्य कुठले का असेनात - बाहेरून आलेले वा मूळचे इथलेच - त्यांचीच संस्कृती का टिकली/पसरली, कशी पसरली - ह्या अभ्यासातून "आज" आपल्या समाजासमोर असलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळावीत --- एवढाच माझा हेतू असतो.

दुर्दैवाने फेसबुकवर भरपूर फॉलोअर्स असणारे विचारवंत इतिहासात घडलेल्या घटनांवरुन वाद पेटवण्यातच धन्यता मानतात. वैदिक-अवैदिक, आर्य-द्रविड, शैव-वैष्णव, हिन्दू-अहिंदू अश्या अनेक बॅनरचे वाद सतत धुमसत ठेवले जातात आणि आमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा व्यवस्थित अपव्यय "मुद्दाम" केला जातो. असो.

भारत एक खोजच्या निमित्ताने एका सामाजिक सत्याची परत एकदा खात्री पटली. "पैसा बोलता है"!!! जी जमात, जो कबीला, जे लोक आर्थिक दृष्टया सुदृढ असतील ते टिकतील. समाजासाठी जर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत लावायचा असेल, तर "सर्वायवल ऑफ दी फिटेस्ट"च्या नियमात "फिटेस्ट" समाज कोण - तर तो, जो मोठ्या कालखंडासाठी श्रीमंत राहतो.

इथे "मोठ्या कालखंडासाठी श्रीमंत असणं" हा अनेक कठीण गोष्टी त्या समाजाने आत्मसात केल्याचा परिणाम आहे! समाज श्रीमंत किंवा सुखवस्तू आहे ह्याचा अर्थ शेती, व्यापार उदीम व्यवस्थित आहे. म्हणजेच एक बऱ्यापैकी सामाजिक/व्यापारी व्यवस्था अस्तित्वात आहे. लूट लबाडी नाहीये किंवा असली जरी, तरी अंदाधुंदी माजलेली नाहीये. समाजाचं ऐश्वर्य टिकवून ठेवल्या जातंय, म्हणजेच परचक्रापासून वाचवून स्थैर्य येण्यासाठी आवश्यक असलेलं सैन्य आहे. हे सगळं घडत आहे म्हणजे बऱ्यापैकी व्हिजन असणारी शासन व्यवस्था आहे !

असा समाज विकसित होणार आणि पसरणार - ह्यात नवल ते काय ? आर्य मूळचे भारतीय उपखंडातील होते की बाहेरून आलेले - हा वाद आज शून्य महत्वाचा आहे. त्यांचा वरील factors मुळे एवढा प्रसार झाला - हे आपल्याला इतिहास सांगतो. आणि ह्यातून आपण आजच्या सामाजिक प्रश्नांकडे अधिक सक्षमपणे बघू शकतो. उदाहरणार्थ --- जैन पावभाजी !

कांदा लसूण नसलेली भाजी काय फक्त जैन लोकच खातात असं नाही. पण अशी भाजी सगळे जैन लोक खातात आणि हे लोक मोठ्या प्रमाणावर हाय-क्लास रेस्टोरंट्समध्ये जातात. त्यामुळे कांदा लसूण नसलेली भाजी म्हणजे "जैन"भाजी हे नामाभिधान सहज होऊन गेलं.  ह्यात कुणी "सांस्कृतिक घुसखोरी किंवा दादागिरी" केल्याचा आरोप जैन लोकांवर केला तर तो कुणाला valid वाटेल तर कुणाला हास्यास्पद. पण असे प्रयत्न झाले जरी असतील तरी त्या प्रयत्नांना आर्थिक आयाम असल्याशिवाय ते यशस्वी झाले नसते - ह्यावर तरी कुणाचंच दुमत नको !

पूर्वी कुर्ता/सदरा-धोतर घालणारे आम्ही टी शर्ट-जीन्स घालायला लागलो आहोत - ही सांस्कृतिक घुसखोरी नसून वाढत्या consumerism चा परिणाम आहे हे आपण समजून घ्यायलाच हवं. Valentine's Day साजरा होतो, promote केला जातो - तो काही कुठली ठराविक संस्कृती पसरवायची म्हणून नव्हे - तर त्या निमित्ताने करोडोंचा माल विकला जातो म्हणून ! आणि आपण हे आर्थिक धागे-दोरे विसरून केवळ भावनिक अस्मिता मध्ये आणतो.

भारतीय समाज एकसंध, एकरूप होण्यासाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही तेवढी आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्याची गरज आहे. दुर्दैवाने आपल्या व्यवस्थेमध्ये तळागाळातील माणूस, स्वतःचं कौशल्य वापरून प्रगती करत "वर" जाणं दुरापास्त झालंय. कौशल्यापेक्षा "right contacts" असणं महत्वाचं झालंय. अश्याने ठराविक लोक, ठराविक गट विकासाच्या अश्वावर आरूढ झालेत आणि त्यांच्या मागे पायी चालणाऱ्या वाटसरूंची फरफट होतीये.

ह्या सगळ्या गोंधळात जातीय/वांशिक अस्मिता जोपासणारे, चेतवणारे आणि पेटवणारे आहेतच. वैदिक-अवैदिक, शैव-वैष्णव इ आजच्या काळाला अजिबात सुसंगत नसणारे वाद उकरून काढणारे "विचारवंत" आपल्या सगळ्यांना मूळ प्रश्नापासून दूर करतात आणि मग सुरु होते खरी गळचेपी.

विचारांच्या आणि विकासाच्या संस्कृतीची.
खरं इन्व्हेजन तर हे वाद निर्माण करणारे लोकच करत आहेत.
समरस, एकरूप भारतीय समाज निर्माण होण्याच्या शक्यतेवरचं इन्व्हेजन.

No comments:

Post a Comment