मोदीसरकार स्वतः Start-Up India साठी तयार आहे का?

टायबेरियस ह्या रोमन सम्राटाकडे एक तंत्रज्ञ आला. त्याने न फुटणारी काच बनवली होती. रोमन राज्यात नवनवीन शोधांना प्रोत्साहन दिलं जायचं. त्यामुळे आपला हा शोध राजाला दाखवून मोठं बक्षीस मिळवण्याची त्याची स्वाभाविक आणि साहजिक इच्छा होती. सम्राटाने त्याला प्रश्न केला - अजून कुणाला ह्या शोधाबद्दल बोलला आहेस का? नकारार्थी उत्तर मिळताच राजाने त्या तंत्रज्ञाला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा दिली. "चिखलाला किंमत मिळण्यासाठी सोन्याचा ध्वंस आवश्यक असतो".

राणी एलिझाबेथ पहिली - हिच्या कारकिर्दीत विल्यम ली ने शिवणयंत्र बनवलं आणि राणीला पेटंट मागितलं. राणीने तात्काळ नकार दिला - तुमच्या ह्या यंत्रामुळे माझी गरीब प्रजा आणखी गरीब होऊन भिकेला लागेल --- असा राणीचा प्रतिवाद होता.

पुढे, ह्या "प्रो-प्रजा" रोखाचं स्वरूप "प्रो-प्रस्थापित उद्योग" असं झालं. आणि हे सगळीकडेच झालंय. नवनवीन शोध नेहेमी बदलाचे वारे घेऊन येतात. ह्या बदलाच्या वाऱ्यांच्या झंझावातात प्रचंड उलथापालथ घडून येते. ह्यालाच अर्थतज्ञ जोसेफ शंपटर "creative destruction" म्हणतात. हे destruction प्रस्थापित, जुन्या युक्त्या आणि पद्धतींचं असतं. अर्थात असे बदल हे प्रस्थापितांना नकोसे असतात. कारण त्याने नवीन रक्ताकडे मदार जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तेव्हा प्रस्थापितांचा दबाव सत्तेवर पडतो, सत्ता झुकते आणि बदलाचे वारे थांबवले जातात.
इंग्लंडमधील वूलन टेक्स्टाईलचा धंदा इम्पोर्टेड लोकरीमुळे धीमा होत होता. म्हणून टेक्स्टाईल लॉबीने १६६६ आणि १६७८ मध्ये इम्पोर्टविरोधी कायदेच करायला लावले होते !

एवढं सगळं पुराण कशासाठी, तर मोदी सरकार स्वतः अश्या दबावाच्या वेळी तग धरेल का - ह्याकडे आपलं लक्ष असावं - ह्यासाठी.

सद्ध्याचं चित्र फारसं दिलासादायक नाही. प्रस्थापिताना धक्का देणाऱ्या ओला आणि उबर ह्या taxi सर्व्हिसेसला त्रास होत आहे. जागतिक बँकेच्या Ease of Doing Business Rankingमध्ये, १८९ देशांत भारत १५८वा आहे. त्याच्याही पुढे - दक्षिण आशियाई देशांत भारत सर्वात शेवटी - आठवा आहे. हे भयावह आहे. हे बदलायलाच हवं.

त्यामुळे Start-Up India, Stand-Up India हा केवळ मार्केटिंग यल्गार नसून खरोखर बदल घडवून आणणारी साद असेल तर त्या सादेला creative destructionचा प्रतिसाद मिळणारच. सरकार अश्या creative destructionच्या झंझावातात नवोदित उद्योगांसोबत उभं राहील की हितसंबंध जपण्यासाठी प्रस्थापिताना जपेल, ह्याकडे आपण लक्ष ठेऊन रहायला हवं.

No comments:

Post a Comment