देश म्हणजे काय? - देशभक्ती म्हणजे काय? - भारतात देशभक्तीचा दुष्काळ का आहे?

सध्या सोशलमिडीयावर स्वयंघोषित देशप्रेमी अन आरोपी देशद्रोही ह्यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. त्या निमित्ताने - "देश", "देशप्रेम" ह्या गोष्टींचा केलेला उहापोह. त्याचबरोबर, भारतात देशभक्तीचा दुष्काळ का आहे, ह्याचं कारण.
१) भारत देश (Country) - भारत संघराज्य / राज्य (State) - भारत राष्ट्र (Nation) :
सर्व  सामान्य  माणसासाठी तिन्ही "संकल्पना" एकच असतात पण technically ह्या तिन्ही भिन्न गोष्टी आहेत.

देश-प्रदेश ही भौगोलिक संज्ञा आहे. भारत देश म्हणजे सीमारेषा आखून स्पष्ट केला गेलेला भूभाग. महाराष्ट्र देशा - म्हणजे महाराष्ट्राचा भूभाग. अनेक छोट्या छोट्या भूभागांना प्रदेश/देश म्हणतात - ते केवळ भौगोलिक ओळख म्हणून.

राज्य - State म्हणजे ४ गोष्टी असणारी गोष्ट - १) ठराविक सीमा २) स्वतंत्र राज्यव्यवस्था ३) Economy चं स्वावलंबन टिकवू शकेल एवढी लोकसंख्या आणि ४) Sovereignty म्हणजेच सार्वभौमत्व - म्हणजेच कुठल्याही परकीय state किंवा शक्तीच्या नियंत्रणात नसणं.

राष्ट्र - केवळ एका identity च्या भोवती बंधुभाव असणं. जो इस्लाम, क्रिश्चियन, ज्यू लोकांमधे असतो. मला नेहेमी वाटतं भारतात लोकांमध्ये "भारतीयत्व" नाहीये - ते  भारतीयत्व म्हणजेच हा सर्व भारतीयांमध्ये "केवळ भारतीय" म्हणून एकमेकांसाठी असणारा बंधुभाव. हेच राष्ट्रीयत्व.

आपण सर्व जण  "देश" हा शब्द "राज्य / state" आणि "राष्ट्र" ह्या दोन्हींच्या अनुषंगानेच वापरत असतो.

थोडक्यात, देश ह्या शब्दाचा आपल्याकडे प्रचलित अर्थ - एका राज्यसत्तेखाली असणारा भूभाग असा आहे. तसंच "एका देशात" राहणाऱ्या लोकांच्या मनात एकमेकांसाठी बंधुभाव असायला हवा ही अपेक्षा देखील आपल्याकडे गृहीत धरल्या गेली आहे.

--- वरील विवेचन "काय चूक - काय बरोबर" ह्या अर्थाने नसून काय "आहे" ह्या अर्थाने आहे. ह्या संकल्पनांमधे तसंच प्रचलित मतांमध्ये चूक-बरोबर असं काहीच नाहीये. आहे हे असं आहे. बास.

===

२) देशभक्ती म्हणजे काय?

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी तसंच भारतीय क्रिकेट टीम - ह्यांच्या पुढे जाणारी देशभक्ती - ही काय चीज आहे, हे ह्या प्रश्नात अभिप्रेत आहे. तसंच - मला माझ्या देशाचा "अभिमान" वाटतो, देशाच्या इमेजची फिकीर आहे - ह्या भावनिक गुंतवणूकीच्या पुढे देशभक्ती असणं गृहीत आहे. इथे देशहितासाठी काही कृती अपेक्षित आहे.

मग अशी देशभक्ती म्हणजे काय?

ह्याची उत्तरं ३ प्रकारे दिली जातात.

पाहिलं आहे: आपापली नागरी कर्तव्य पार पाडणं म्हणजे देशभक्ती. रहदारीचे नियम पाळणे, रस्त्यावर नं थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा नं फेकणे, राष्ट्रगीताचा - राष्ट्रध्वजाचा अन अश्याच राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे इ.

चांगला, जबाबदार नागरिक = देशभक्त - असं हे समीकरण आहे. म्हणजे, तुम्ही तुमची "कर्तव्य" पार पाडली म्हणजे तुमची देशभक्त होता - अशी खूप साधी व्याख्या आहे ही.

देशभक्तीचा पहिला प्रकार - माझ्या मते - देशभक्ती फारच सोपी करून टाकतो. तो एका फटक्यात भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अनेक कार्यकर्ते, अनेक RTI activists, बाबा आमटे, अर्थक्रांतीचे मिलिंद बोकील, "नाम" मधे दान देणारे अनेक दानशूर आणि "नाम" उभं करणारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे - ह्या सर्वांना - "फक्त नागरी कायदे पाळणाऱ्या व्यक्तीसोबत" आणून ठेवतो. हे चुकीचं वाटतं. देशभक्ती म्हणजे देशासाठी काहीतरी विशेष करणं. प्रत्येक जबाबदार नागरिक हा आपल्या रोजच्या दिनचर्येत अपेक्षेबाहेरचं काही करत असतोच असं नाही. नागरी कायदे पाळणं हे तर प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. कर्तव्य पाळणारा देशभक्त असेलच असं नाही.

दुसरं उत्तर आहे: पहिल्या उत्तराच्या चाकोरी बाहेर जाऊन, समाजासाठी काहीतरी करणारी व्यक्ती म्हणजे देशभक्त. खूप दान करत असाल, गरिबांना शिकवत असाल, अनाथांची काळजी वहात असाल, पर्यावरणाच्या सुधारणेवर काही करत असाल --- असं काही करत असाल तर तुम्ही देशभक्त आहात.

ह्या उत्तरात, "मानवता" ह्या वैश्विक मूल्याला "देशभक्ती" चं रूप मिळालं आहे.

तिसरं उत्तर: आपण "देश" म्हणून जी काही व्याख्या मानतो, त्या देशासमोर असलेल्या समस्यांवर काम करणारे. इथे "देशासमोरील समस्या" म्हणजे तो देश ज्या व्यवस्थेच्या रूपाने रहातो - त्या व्यवस्थेमधील दोष किंवा व्यवस्थेसमोरील संकटं.

दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारात फार धूसर फरक आहे. पण ह्या दोन्ही कार्यांमधील result मधे प्रचंड फरक आहे. उदाहरणार्थ - गरिबी. ह्या प्रश्नावर २ प्रकारे काम होऊ शकतं - पाहिलं, स्वतः दानधर्म करा, गरिबांच्या शिक्षण/व्यवसायात त्यांना मदत करा इ. हे वैश्विक मानवतेच्या दृष्टीतून होईल. दुसरं - गरिबी ही "भारतासमोरील" मोठी समस्या आहे असं समजून भारतातून गरिबी कमी कशी होईल ह्यावर काही अभ्यासपूर्ण सोल्युशन शोधणं आणि ते implement करण्यासाठी प्रयत्न करणं. दुसरा प्रकार instant result देतो, तिसरा प्रकार permanent solution च्या शोधत असतो.

दुसरा आणि तिसरा प्रकार देशभक्तीचे २ वेगळे प्रकार म्हटले जाऊ शकतात. फक्त फरक हा, की काही असे लोक असतात जे international कार्य करतात. त्यांचं कार्य जेव्हा केवळ मानवतेने प्रेरित असतं तेव्हा देशभक्तीच्या पलीकडे जातं. आणि "मानवता" हे मूल्य "देशहित" च्या समोर आव्हान स्वरूप उभं राहिलं तर dilemma निर्माण होतो.

===

भारतात देशभक्तीचा दुष्काळ का आहे?

२ स्पष्ट कारणं आहेत.

पाहिलं - हा देश "माझा" आहे, हे लोक "माझे" आहेत - ही भावना निर्माण होणं - देश ज्या विवीध formal आणि informal यंत्रणांच्या बळावर उभा असतो, त्यांच्यावर अवलंबून असतं. ज्या देशांमध्ये ह्या यंत्रणा कुचकामी आहेत, गुन्हेगारांच्या हातचं बाहुलं बनल्या आहे, तिथे लोक देशाशी बांधिलकी ठेवत नाही. कारण शेवटी "देश" म्हणजे ह्या यंत्रणांचा वेगवेगळा परिणाम असतो. त्यामुळे ह्या यंत्रणाच जर त्रासदायक असतील तर सामान्य माणूस त्या यंत्रणांना विटतो आणि पर्यायाने देशभक्तीपासून दुरावतो.

दुसरं - वरील पाहिला factor ज्यांच्यावर अवलंबून आहे - त्या civil society च्या निष्क्रियतेमुळे भारतात देशभक्तीची वानवा आहे. इथे निष्क्रियता म्हणजे समस्या-समाधानावर कार्य नं करणं - हे अपेक्षित आहे. आपली सिव्हील सोसायटी एकतर कुठल्यातरी पक्षाची बाजू लावून धरते किंवा केवळ आणि केवळ दोषारोपण करते. ज्यात सामान्य जनतेलाच बरेच दोष दिले जातात. आपल्याकडे victim लाच culprit करण्याची अजब खोड आपल्या civil society मधे आहे, ज्यामुळे सामान्य माणूस ह्या "फंदात" पडत नाही आणि नामानिराळा रहातो.

===

"भारतात लोकांना देशाबद्दल काहीच का वाटत नाही?" ह्या प्रश्नाचं उत्तर वरील दोन कारणं आहेत.
लोकांमधे देशभक्ती चेतवायची असेल तर ह्या दोन समस्या सोडवाव्या लागतील.

4 comments:

 1. छान लिहिलंय. सर्वच व्याख्या पटतात
  एक विनंती आहे - तुझ्या ब्लॉग मार्फत आपल्या प्रतिज्ञे चा नक्की आशय आजच्या भारताला समजावून सांगशील का,म्हणजे आजच्या काळात ते relate करून सांगावे, असे वाटते.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद! नक्की प्रयत्न करतो.

   Delete
 2. अप्रतिम सुंदर.... गरज आहे याची...

  ReplyDelete
 3. छान लिखाण. civil society म्हणजे नक्की कोण ते समजलं नाही

  देशभक्तीसाठी माझ्या मते प्रत्येक नागरिकाची "आपले लोक" "आपली माणसे"ची व्याख्या सर्व भारतीय अशी असली पाहिजे. आज तसे दिसत नाही. बरेच जण ज्या जातीत जन्मलेले आहेत त्या जातीचे आपले, त्या मातृभाषेचे आपले अशा संकुचित स्तरावर आहेत. संविधानात आर्टिकल १५ असून चालणार नाही तर ते आपल्या प्रत्येक भारतीयाच्या जीवनात असणे आवश्यक आहे.

  ReplyDelete