इतिहासातून शिकणे - अशोकाची अहिंसा !

आजच्या भारताचं क्षेत्रफळ आहे - सुमारे ३३ लाख वर्ग किमी.

भारतीय उपखंडात सर्वात मोठं एकछत्री राज्य होतं मौर्यांचं. सम्राट अशोकाने उभं केलेलं. किती मोठं होतं हे साम्राज्य? तब्बल ५० लाख वर्ग किमी.

सम्राटाने ख्रिस्त पूर्व २६१ साली कलिंगाच्या प्रसिद्ध युद्धात साम्राज्य पूर्ण केलं. ह्या युद्धात झालेला प्रचंड नरसंहार (सुमारे एक लाख सैनिक आणि अगणित नागरिक) बघून व्यथित झालेल्या अशोकाने शस्त्र खाली ठेवले, ते कायमचेच. त्याने बौद्ध धम्म स्वीकारला आणि अहिंसेचा प्रचार केला असा इतिहास आम्ही वाचतो.

समस्या ही, की त्याने स्वतःची अहिंसा त्याच्या साम्राज्याचं धोरण म्हणून राबवली. "आणखी लढाया करणार नाही" हे धोरण ठीक, पण अंतर्गत सुरक्षेत कमालीची कपात, सीमांवरील सुरक्षेची नाममात्र सोय आणि नागरी सुविधा निर्माण करणं सोडता संपूर्ण लक्ष धार्मिक शिल्पं उभारण्यात. परिणाम - पुढच्या ५० वर्षात साम्राज्य कोसळलं.

भारतीय उपखंडात कायमस्वरूप एकछत्री अंमल निर्माण होऊन एक-राष्ट्र भावना वृद्धिंगत होण्याची शक्यता अशोकानंतर ५० वर्षसुद्धा टिकली नाही. आणि - तब्बल १७०० वर्षानंतर, युरोपात आलेल्या "Age of Discovery" च्या बळावर इवलंसं ब्रिटन, "ग्रेट ब्रिटन" चं महाकाय साम्राज्य उभं करतं झालं. जगावर सत्ता मिळवायला इंग्लंडला दोनशे वर्ष पुरली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.

इतिहासातून धडे घ्यायचे असतात ते असे.

"साम्राज्य जिंकणं" ही फक्त पहिली पायरी असते. जिंकल्या "नंतर" काय करायचं? "टिकवायचं" कसं, "वाढवायचं" कसं - हे इतिहासातून शिकायला हवं. शिकून झालं की त्यानुसार "आजच्या" काळाला हे धडे कसे लागू पडतात हा विचार करायला हवा.

इतिहासाचा भडक टाईमपास करण्याचं व्यसन लागल्यावर "आज" वरून लक्ष उडतं ते उगीचच नाही!